Benny Prasad Verma Granddaughter Shreya Verma आगामी लोकसभा निवडणुकीसाठी समाजवादी पक्षाने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. या यादीत ११ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली. या यादीत अनेक जुन्या चेहर्‍यांसह नवीन चेहर्‍यांचाही समावेश आहे. या नवीन चेहर्‍यात एका नावाची सध्या चर्चा होत आहे, ते नाव आहे श्रेया वर्मा. उत्तर प्रदेशातील गोंडा मतदारसंघातून समाजवादी पक्षाचे प्रमुख कुर्मी नेते दिवंगत बेनी प्रसाद वर्मा यांची नात ३१ वर्षीय श्रेया वर्मा यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

समाजवादी पक्षाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक असलेले बेनी प्रसाद वर्मा पाच वेळा खासदार आणि केंद्रीय मंत्रीदेखील राहिले आहे. २००९ मध्ये त्यांनी बाराबंकी शेजारील गोंडा येथून शेवटची लोकसभा निवडणूक लढवली होती आणि जिंकलीही होती. त्यांची नात श्रेया वर्मा सपा महिला शाखेच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा आहेत. श्रेया यांचा राजकीय प्रवास आजोबांच्या राजकीय कारकीर्दीशी साधर्म्य साधणारा आहे. १९ फेब्रुवारीला सपा ने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली, यात त्यांचे नाव होते. मात्र मतदारसंघात जनसंपर्क त्यांनी फार पूर्वीच सुरू केला. सपाच्या महिला शाखा प्रमुख जुही सिंहदेखील त्यांच्या प्रचारात सामील झाल्या होत्या.

श्रेया वर्मा सपा महिला शाखेच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा आहेत. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

श्रेयाने त्यांचे शालेय शिक्षण उत्तराखंडमधील वेल्हम गर्ल्स स्कूलमधून पूर्ण केले. दिल्लीतील रामजस कॉलेजमध्ये अर्थशास्त्र ऑनर्ससह पदवीचे शिक्षण पूर्ण केले. शिक्षण क्षेत्रातील विविध स्वयंसेवी संस्थांशी त्या जोडल्या आहेत. त्यांच्या आई सुधा राणी वर्मा यांचे बाराबंकी येथे पदवी महाविद्यालय आहे. त्या म्हणाल्या की, श्रेया विद्यार्थी राजकारणात सक्रिय असायची, परंतु तिने यापूर्वी कधीही निवडणूक लढवली नव्हती. ती मला कॉलेजच्या अनेक प्रशासकीय कामात मदत करते, असे त्यांनी सांगितले.

दोन वर्षांपूर्वी सपामध्ये प्रवेश

श्रेयाचे वडील राकेश कुमार वर्मादेखील सपा नेते आहेत. ते २०१२-१७ मध्ये अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखालील सपा सरकारमध्ये मंत्री होते. राकेश कुमार २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत बाराबंकीच्या कुर्सीमधून भाजपाच्या सकेंद्र प्रताप यांच्याकडून ५२० मतांनी पराभूत झाले. श्रेया यांनी आजोबा आणि वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत, दोन वर्षांपूर्वी सपामध्ये प्रवेश केला. तेव्हापासून त्या पक्षाच्या कार्यात सक्रिय सहभाग घेत आल्या आहेत. “गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी माझ्या प्रचारात महत्त्वाची भूमिका बजावली होती,” असे वडील राकेश कुमार यांनी सांगितले. गेल्या वर्षी श्रेया यांनी एका व्यावसायिकाशी लग्न केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

राकेश कुमार हे सपा नेते आणि कार्यकर्त्यांच्या बैठका घेत आहेत. मुलीला पाठिंबा मिळवून देण्यासाठी ते गोंडामधील मतदारांपर्यंत पोहोचत आहेत. प्रतिस्पर्ध्यांकडून त्यांच्यावर अनेक आरोप केले जात आहेत. परंतु श्रेया आजोबा बेनी प्रसाद आणि समाजवादी पक्षाच्या विचारसरणीशी तिची वचनबद्धता दाखवत आली आहे. गोंडासोबतच्या तिच्या कुटुंबाचे असलेले जुने संबंधदेखील तिने जनतेपुढे ठळकपणे मांडले आहे. मुलायम यांच्यानंतर पक्षातील मोठे नेते म्हणून बेनी प्रसाद यांच्याकडे पाहिलं जाते. बेंनी प्रसाद यांचे मार्च २०२० मध्ये निधन झाले. २००९ च्या निवडणुका वगळता, त्यांनी सर्व लोकसभा निवडणूका कैसरगंज मतदारसंघातून लढवल्या आणि जिंकल्या होत्या. कैसरगंज मतदारसंघ आता भाजपाचे प्रबळ नेते ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याकडे आहे. ब्रिजभूषण शरण सिंह भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष राहिले आहे.

एसपीचे बाराबंकी जिल्हाध्यक्ष ए.अहमद म्हणाले की, बेनी प्रसाद यांनी बाराबंकी येथून कधीही लोकसभा निवडणूक लढवली नाही, कारण ही जागा राखीव आहे. इतर कोणत्याही पक्षाने आतापर्यंत गोंडा जागेवरून आपला उमेदवार घोषित केलेला नाही. हा मतदारसंघ सध्या भाजपाचे कीर्ती वर्धन सिंह यांच्याकडे आहे. कीर्ती वर्धन सिंह पूर्वी सपामध्ये होते. आगामी निवडणुकीसाठी भाजपाकडून कीर्ती यांनाच उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे.

गोंडा हा ब्रिजभूषण शरण सिंह यांचा गड मानला जातो. ब्रिजभूषण शरण सिंह कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषण आरोपांप्रकरणी वादाच्या भोवऱ्यात आहेत.त्यांचा मतदारसंघ कैसरगंज शेजारच्या बहराइच जिल्ह्यात येतो. अयोध्येपासून जेमतेम ५० किलोमीटर अंतरावर असलेल्या गोंडामध्येही राम मंदिराच्या मुद्द्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. गोंडा येथील रहिवाशांशी संवाद साधताना, श्रेयाने राम मंदिराचे महत्त्व मान्य केले आणि प्रत्येकाच्या हृदयात प्रभू रामाचे विशेष स्थान आहे यावर भर दिला.

भाजपाच्या पराभवाची तयारी

श्रेया तिच्या प्रचारात बेरोजगारी, महागाई आणि महिलांशी संबंधित मुद्द्यांवर भर देतांना दिसत आहे. निवडणूक प्रचार सुरू झाल्याचं श्रेयाने सांगितले. राकेश कुमार म्हणाले, “निवडणुकीत पीडीए (पिछडे, दलित आणि अल्पसंख्याक) या सूत्रावर आम्ही चालणार आहोत. सुमारे १३ लाख मतदार असलेल्या गोंडामध्ये गोंडा सदर, मेहनौन, उत्रौला, मानकापूर आणि गौरा या पाच विधानसभा क्षेत्रांचा समावेश आहे. २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत या सर्व जागा भाजपाच्या उमेदवारांनी जिंकल्या होत्या.

हेही वाचा : हरियाणामध्ये गोळ्या झाडून हत्या झाली ते आयएनएलडी प्रदेशाध्यक्ष नफेसिंह राठी कोण होते?

गोंडा सदर, उत्रौला आणि मेहनौनमध्ये मुस्लिम आणि कुर्मी मतदारांची संख्या जास्त आहे, तर मानकापूर आणि गौरा येथेही कुर्मी मतदार आहेत. मुस्लिम आणि कुर्मी मतदार वर्ग श्रेयाच्या उमेदवारीला पाठिंबा देतील, असा आशावाद सपा नेते व्यक्त करत आहेत. सपाचे गोंडा जिल्हाध्यक्ष अर्शद हुसैन म्हणाले की, जर पक्षाच्या रणनीतीनुसार मतदान झाले तर श्रेयाचा विजय निश्चित आहे. श्रेयाच्या प्रचारात पक्षाने बेनी प्रसाद वर्मा यांच्या काळात गोंडा येथे केलेल्या विकासकामांवर प्रकाश टाकला जात आहे. .

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sp gave gonda loksabha seat to newcomer shreya verma who is she rac