इंडिया आघाडीकडून ऑक्टोबर महिन्यात भोपाळ येथे आयोजित करण्यात आलेली सभा रद्द करण्यात आल्याची घोषणा मध्यप्रदेश काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कमलनाथ यांनी शनिवारी (दि. १६ सप्टेंबर) केली. त्यानंतर मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी यावर निशाणा साधत सांगितले की, द्रमुकच्या नेत्यांनी सनातन धर्मावरून केलेल्या टीकेमुळे जनतेचा आक्रोशाला घाबरून इंडिया आघाडीने आपली सभा रद्द केली. मागच्या आठवड्यातच काँग्रेसप्रणीत इंडिया आघाडीने भोपाळ येथे जाहीर सभा होणार असल्याची घोषणा केली होती.
मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कमलनाथ माध्यमांशी बोलताना म्हणाले की, जाहीर सभा रद्द करण्यात आलेली आहे. आता सभा होणार नाही. काँग्रेसचे सरचिटणीस रणदीप सुरजेवाला या विषयावर बोलताना म्हणाले की, पक्षाच्या वरिष्ठांनी अद्याप भोपाळमधील जाहीर सभेबाबत निर्णय घेतलेला नाही. ज्यावेळी आमचा निर्णय होईल, तेव्हा माध्यमांना याबाबत कळवले जाईल, असेही सुरजेवाला म्हणाले.
या आठवड्याच्या सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी इंडिया आघाडीतील घटक पक्षांची बैठक संपन्न झाली होती. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात भोपाळ येथे इंडिया आघाडीची पहिली संयुक्त जाहीर सभा घेण्याचे आघाडीचे ठरविले होते.
कमलनाथ यांनी इंडिया आघाडीची जाहीर सभा पुढे ढकलल्याची घोषणा केल्याबाबत मुख्यमंत्री शिवराज चौहान यांना प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले की, इंडिया आघाडीतील नेत्यांनी सनातन धर्मावरून जी वक्तव्ये केली होती, त्याबद्दल जनतेच्या मनामध्ये रोष आहे. त्याला घाबरूनच त्यांनी जाहीर सभा रद्द केली असावी. “द्रमुकच्या नेत्यांनी सनातन धर्माला डेंग्यू, मलेरियाची उपमा दिली. त्याबद्दल जनतेच्या मनात रोष खदखदत आहे. सनातन धर्माचा अवमान मध्यप्रदेशची जनता कधीही सहन करणार नाही. इंडिया आघाडीच्या नेत्यांनी केलेले वक्तव्य हे आमच्या श्रद्धांना धक्का पोहोचवणारे आहे, हे त्यांना कळले पाहीजे”, अशी टीका शिवराज चौहान यांनी केली.
सनातन धर्मावरील टीकेमुळे मध्यप्रदेशच्या जनतेला राग आणि तीव्र दुःख वाटत आहे. हा राग त्या जाहीर सभेत व्यक्त होऊ शकतो, याची खात्री पटल्यामुळेच इंडिया आघाडीने आपली सभा रद्द केली असावी, असा दावा शिवराज चौहान यांनी केला.
काही दिवसांपूर्वीच तमिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचा मुलगा आणि तमिळनाडूचा क्रीडा मंत्री उदयनिधी स्टॅलिन आणि द्रमुकचे दुसरे नेते ए. राजा यांनी सनातन धर्मावर टीका केली होती. सनातन धर्मामुळे समाजात विभाजन होत असून त्याचे निर्मूलन करायला हवे. ज्याप्रमाणे डेंग्यू, मलेरिया आणि करोना विषाणू आजार पसरवतात, त्याप्रमाणे सनातन धर्माने समाजासमाजात भेद निर्माण केले आहेत, असे विधान उदयनिधी स्टॅलिन यांनी केले होते. स्टॅलिन यांच्या विधानानंतर देशपातळीवर त्यांच्या विधानाची दखल घेऊन त्यांच्यावर टीका सुरू झाली.