पुणे : शहराच्या मध्यवर्ती भागातील ‘कसबा’ मतदारसंघ पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. या मतदारसंघात सर्व पक्षांतर्गत जोरदार घडामोडी घडत असून, उमेदवारीवरून महाविकास आघाडीत बंडखोरी, तर महायुतीमध्ये नाराजीनाट्य सुरू झाले आहे. ‘कसब्या’तून ब्राह्मण उमेदवार द्यावा, अशा मागणीनंतरही ब्राह्मण उमेदवार न दिल्याने या मतदारसंघातील इच्छुक भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे नाराज झाले आहेत. तर, काँग्रेसने डावलल्याने माजी महापौर कमल व्यवहारे यांनी बंडखोरी केली आहे.

दोन वर्षांपूर्वी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपला या पारंपरिक मतदारसंघात पराभव पत्करावा लागला होता. त्या वेळी ब्राह्मण उमेदवार न दिल्याचा फटका बालेकिल्ल्यात बसल्याची चर्चा होती. त्यामुळे विधानसभा निवडणुकीचे वातावरण तापण्यास सुरुवात झाल्यानंतर ब्राह्मण समाजाला प्रतिनिधित्वाचा मुद्दा पुढे आला. भाजपकडून या मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी धीरज घाटे इच्छुक होते. त्यांना उमेदवारी दिली जाईल, अशी चर्चा होती. दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे चिरंजीव कुणाल, दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या स्नुषा स्वरदा यांच्याही नावाचा विचार होईल, अशी शक्यता होती. मात्र, भाजप नेतृत्वाने स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने यांना पुन्हा संधी देत असल्याचे जाहीर करताना त्यांच्या नावाची घोषणा काहीशा विलंबाने केली.

हेही वाचा : आघाडीत बिघाडी, त्यावर ‘आघाडी’चीच कुरघोडी! हडपसरमध्ये ‘मविआ’च्या उमेदवाराला ‘मविआ’मधूनच विरोध, खासदारांकडे गाऱ्हाणे

रासने यांचे नाव जाहीर झाल्यानंतर घाटे यांची नाराजी लपून राहिली नाही. ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर उमेदवार हा मुद्दा पुन्हा चर्चेत येण्याची शक्यता असल्यामुळे सकल ब्राह्मण समाजाने सावध भूमिका घेऊन भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार) आणि शिवसेना (शिंदे) पक्षाच्या महायुतीला पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले. मात्र, त्यानंतरही घाटे यांची नाराजी कायम राहिल्याने भाजपपुढील डोकेदुखी वाढणार आहे. येत्या दोन दिवसांत घाटे राजकीय भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे.

भाजपमध्ये नाराजी नाट्य असताना महाविकास आघाडीमध्येही बंडखोरीचे वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. काँग्रेसकडून अपेक्षेप्रमाणे विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. मात्र, धंगेकर यांना पक्षांतर्गत विरोध सुरू झाला. काँग्रेसच्या माजी महिला प्रदेशाध्यक्ष, माजी महापौर कमल व्यवहारे यांना तिकीट नाकारण्यात आले. त्यामुळे नाराज झालेल्या व्यवहारे यांनी थेट बंडखोरीचा रस्ता स्वीकारला आहे. स्वराज्य पक्षाचे संस्थापक-अध्यक्ष संभाजी महाराज छत्रपती यांची त्यांनी भेट घेतली. त्या स्वराज्य पक्षाकडून निवडणूक लढविण्याची शक्यता आहे. त्या सोमवारी (२८ ऑक्टोबर) उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

हेही वाचा : पुणे: राष्ट्रवादी शरद पवार पक्षात तात्पुरते संघटनात्मक बदल, अंकुश काकडे यांच्याकडे प्रभारी शहराध्यक्षपद

महाविकास आघाडी ‘कसब्या’चा गड राखणार, की भाजप बालेकिल्ला पुन्हा मिळविणार, याबाबत चर्चा सुरू असतानाच ‘कसब्या’तील नाट्यमय घडामोडींमुळे येथील निवडणूक पुन्हा चर्चेत आली असून, ती रंगतदार ठरण्याची शक्यता आहे.

तुम्हाला हिंदुत्ववादी सरकार हवे आहे. पण, ३० वर्षे हिंदुत्वासाठी देणारा कार्यकर्ता उमेदवार म्हणून नको आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
धीरज घाटे (शहराध्यक्ष, भाजप)

तीस वर्षे सलग नगरसेविका म्हणून निवडून आल्यानंतरही पक्ष विचार करत नाही. सतत डावलण्यात येत असल्याने काँग्रेसचा राजीनामा देणार आहे.

कमल व्यवहारे (माजी महिला प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस)