Rajasthan Loksabha Election २०१४ आणि २०१९ मध्ये भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएने राजस्थानमधील सर्व २५ जागांवर विजय मिळवला होता. शुक्रवारी (१९ एप्रिल) पहिल्या टप्प्यात राजस्थानमधील १२ जागांसाठी मतदान होणार आहे. पुन्हा निकालाची पुनरावृत्ती होणार नाही, असा दावा काँग्रेसने केला आहे. या निवडणुकीत काँग्रेस जाट समुदायातील नाराजी, सत्ताविरोधी जनता आणि युतीवर अवलंबून आहे, तर भाजपा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता, राम मंदिर, जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रद्द करणे यावर अवलंबून आहे.

राजस्थामध्ये सुरुवातीला १२ जागांसाठी मतदान होणार आहे. त्यातील चुरू, नागौर आणि दौसा या तीन जागांवर भाजपा आणि काँग्रेसमध्ये चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे. तसेच जयपूर शहर, बिकानेर, गंगानगर, झुंझुनू या उर्वरित जागांवर भाजपाचा विजय निश्चित असल्याचा अंदाज आहे.

भाजपावरच्या नाराजीचा काँग्रेसला फायदा?

चुरू आणि नागौरमध्ये दोन्ही पक्षांनी जाट उमेदवार उभे केल आहेत. चुरूमध्ये राजपूत राजेंद्र राठोड यांच्या सांगण्यावरून विद्यमान खासदार राहुल कासवान यांना तिकीट नाकारल्याने जाटांचा एक गट भाजपावर नाराज असल्याचे चित्र आहे. याचा फायदा काँग्रेसला होण्याची शक्यता आहे. भाजपाने या जागेवरून पॅरालिम्पियन देवेंद्र झाझरिया यांना उमेदवारी जाहीर केली; ज्यानंतर कासवान यांनी भाजपाला सोडचिठ्ठी दिली. आता ते काँग्रेसचे उमेदवार आहेत. कासवान विरुद्ध राठोड अशी ही निवडणूक लढत पाहायला मिळत आहे. आपल्या उमेदवाराला प्रकाशझोतात आणण्याचा प्रयत्न करणार्‍या भाजपाने ‘दिल्ली में नरेंद्र, चुरू में देवेंद्र’ असा नारा दिला आहे. मोदींनीदेखील या भागातील एका सभेत बोलताना झाझरिया यांच्याबरोबरचे त्यांचे जुने संबंध असल्याचे सांगितले.

हेही वाचा : New challenge for BJP: भाजपाच्या अधिकृत उमेदवाराविरोधात आमदाराने मुलाला उतरवले निवडणूक रिंगणात

जाट समुदायाच्या नाराजीचे कारण काय?

राज्यातील प्रमुख तीन पदांमध्ये जाट नेत्यांचा समावेश नसल्याने भाजपावर जाट समुदाय नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे. समुदायाची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न पक्षाकडून सुरू आहे. भाजपाने राष्ट्रीय लोकदलाशी युती केली आहे. तसेच राजस्थानच्या जाट नेत्यांना अनेक प्रमुख पदांवर नियुक्त केले आहे; ज्यात उपाध्यक्ष म्हणून जगदीप धनखड़ आणि केंद्रीय मंत्री म्हणून कैलाश चौधरी यांचा समावेश आहे. तसेच भाजपाने काँग्रेसमधून येणार्‍या विजय पाल मिर्धा आणि आलोक बेनिवाल व गेल्या वर्षी ज्योती मिर्धा आणि रिचपाल मिर्धा यांसारख्या जाट नेत्यांनाही पक्षात प्रवेश दिला आहे.

भाजपाने नागौरमधून ज्योती मिर्धा यांना उमेदवारी दिली आहे, तर काँग्रेसने राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्षाचे (आरएलपी) प्रमुख हनुमान बेनिवाल यांना उमेदवारी दिली आहे. गेल्या निवडणुकीतसुद्धा दोघेही एकमेकांच्या विरोधात उभे होते, मात्र तेव्हा चित्र वेगळे होते. त्या निवडणुकीत बेनिवाल यांनी एनडीए उमेदवार म्हणून जागा जिंकली होती आणि काँग्रेसकडून उभ्या असलेल्या मिर्धा यांचा पराभव केला होता. दौसा या जागेवर काँग्रेस नेते सचिन पायलट यांची विशेषत: तरुण आणि गुज्जरांवर पकड आहे. भाजपाने काँग्रेसच्या मुरारी लाल मीणा यांच्या विरोधात कन्हैया लाल मीणा यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे दौसा जागेवरील लढत अतिशय रंजक असणार आहे. झुंझुनूमध्ये काँग्रेसचे ब्रिजेंद्र ओला यांच्या विरुद्ध भाजपाने शुभकरन चौधरी यांना उमेदवारी दिली आहे. ते आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आहेत. भाजपाला मतदान करत नाही तो देशद्रोही (देशद्रोही), असे वक्तव्य त्यांनी अलीकडेच केले होते.

जयपूरमध्ये भाजपाचा बोलबाला

जयपूर शहरात भाजपा बहुमताने विजयी होण्याची शक्यता आहे. इथे भाजपाचा प्रभाव इतका आहे की, काँग्रेसचे प्रताप सिंह खाचरियावास यांच्या उमेदवारीची घोषणा होताच ते निराश असल्याचे पाहायला मिळाले. जयपूरमधून उमेदवारी मिळालेले भाजपाचे राव राजेंद्र सिंह हे भलेही भक्कम उमेदवार नसतील, परंतु येथील पक्षाचा कार्यकर्ता मजबूत आहे.

सीकरमध्ये भाजपाने स्वामी सुमेधानंद सरस्वती आणि बिकानेरमध्ये केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांना उमेदवारी दिली आहे. सीकरमध्ये काँग्रेसने सीपीआय (एम) उमेदवार अमरा राम यांना ही जागा दिली आहे. गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीत अमरा राम यांनी दंता रामगढमधून काँग्रेस आणि भाजपाच्या उमेदवारांना मागे टाकून २० हजार मतांनी विजय मिळवला होता.

भाजपासाठी प्रतिष्ठेची जागा

भरतपूरमध्येही काँग्रेसला जाट समुदायाच्या नाराजीचा फायदा होऊ शकतो. मुख्यमंत्री भजनलाल शर्मा या भागातील असल्याने भाजपासाठीदेखील ही प्रतिष्ठेची जागा आहे. त्यामुळे ही जागा राखण्यासाठी भाजपाने सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत. भरतपूर आणि ढोलपूरचे जाट केंद्रीय ओबीसी यादीत समाविष्ट करण्याची मागणी करत आहेत. राज्य या विषयाचा पाठपुरावा करत असल्याची शर्मा यांनी ग्वाही दिली असून, त्याचे सकारात्मक परिणाम होतील, असे संकेत दिले आहेत. डिसेंबर विधानसभा निवडणुकीत अवघ्या ४०९ मतांनी पराभूत झालेल्या २५ वर्षीय संजना जाटव यांना काँग्रेसने भरतपूरमधून उमेदवारी दिली आहे.

अलवरमध्ये काँग्रेसने ललित यादव यांना उमेदवारी दिली आहे. त्यांची भाजपाचे भूपेंद्र यादव यांच्याशी थेट लढत रंगणार आहे. परंतु, ललित यादव यांच्या उमेदवारीवरून काँग्रेसला बंडखोरीचा सामना करावा लागला आहे. दोन वेळा खासदार राहिलेल्या करणसिंह यादव यांसारख्या अनेक नेत्यांनी पक्ष सोडून भाजपामध्ये प्रवेश केला आहे.

करौली-धोलपूरमध्ये काँग्रेसने भजनलाल जाटव यांना उमेदवारी दिली आहे. ते मुळचे भरतपूरचे आहेत. काँग्रेसच्या धोलपूरच्या विद्यमान आमदार शोभाराणी कुशवाह यांनी पक्षाच्या कार्यक्रमांपासून दूर राहून पक्षाच्या अडचणीत भर घातली आहे. गंगानगरमध्ये भाजपाने पाच टर्म विद्यमान खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री निहाल चंद मेघवाल यांच्या जागी प्रियंका बालन यांना उमेदवारी दिली आहे. यापूर्वी विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेले सचिव कुलदीप इंदोरा यांना काँग्रेसने या जागेवरून निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे.

जाटांच्या नाराजीचा काँग्रेसला फायदा नाही – राजकीय विश्लेषक

राजकीय विश्लेषकांनी याकडे लक्ष वेधले की, जाटांमध्ये भाजपाविरोधात नाराजी असली तरी काँग्रेसला त्याचा फायदा घेता येणार नाही. काँग्रेसच्या प्रचाराच्या तुलनेत येथील भाजपाची पकड मजबूत आहे. छोट्याहून छोटा कार्यकर्ता प्रचारात अग्रेसर आहे; ज्याचा फायदा भाजपाला होईल, असे राजकीय विश्लेषक सांगतात.

भाजपामध्ये किंवा त्याच्या मित्रपक्षांमध्ये सुरू असलेली प्रवेशाची मालिका अद्याप थांबलेली नाही. महेंद्रजीत मालवीय, करणसिंह यादव, लालचंद कटारिया, राजेंद्र यादव, खिलाडी लाल बैरवा, रिचपाल मिर्धा आणि विजयपाल मिर्धा यांच्यासह काही काँग्रेस माजी खासदार आणि आमदारांनी आधीच भाजपामध्ये प्रवेश केला आहे. मंगळवारी राजस्थानच्या बसपच्या दोन आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला.

हेही वाचा : बॉलीवूड रॅपर, सापाच्या तस्करी प्रकरणात नाव आणि आता लोकसभेची उमेदवारी

काँग्रेसने गेल्या वर्षी अनेक विधानसभा क्षेत्रांत चांगली कामगिरी केली होती, परंतु मतदारांना राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार पाहायचे असले तरी ते केंद्रात मोदींना पसंती देऊ शकतात. त्यामुळेच २०१८ मध्ये राज्यात सरकार स्थापन केल्याच्या काही महिन्यांनंतर, २०१९ मध्ये काँग्रेसने भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएकडून लोकसभेच्या सर्व २५ जागा गमावल्या होत्या.