२०१४ मध्ये, हरियाणा-राजस्थान सीमेवर असलेल्या झारसा या छोट्याशा गावात राहणारा राहुल यादव फाजिलपुरिया ‘चुल’ या रॅप गाण्याने प्रसिद्ध झाला होता. दोन वर्षांनंतर, हेच गाणे सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि आलिया भट्ट अभिनीत ‘कपूर अँड सन्स’ या चित्रपटासाठी चित्रित करण्यात आले. तेव्हापासून फाजिलपुरिया हरियाणवी लोकसंगीत आणि बॉलीवूडमध्ये त्याच्या रॅप गाण्यांसाठी प्रसिद्ध आहे. त्याने आतापर्यंत अनेक प्रसिद्ध गाणी आणि संगीत अल्बम प्रदर्शित केले आहेत.

१६ एप्रिल ला हरियाणाचे माजी उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांच्या नेतृत्वाखालील जननायक जनता पक्षाने (जेजेपी) राहुल यादव फाजिलपुरिया याला गुरुग्राम लोकसभा जागेवरून उमेदवारी जाहीर केली. पाच वेळा खासदार आणि भाजपाचे दिग्गज नेते राव इंद्रजीत सिंह यांच्याशी त्याची थेट लढत असणार आहे. गुरुग्राममध्ये २५ मे रोजी पाचव्या टप्प्यात मतदान होणार आहे.

हेही वाचा : नवरा तुरुंगात, बायको निवडणुकीच्या रिंगणात; कोण आहेत श्रीकला रेड्डी?

कोण आहे रॅपर फाजिलपुरिया ?

१० एप्रिल १९९० मध्ये फाजिलपुरिया याचा जन्म झाला. त्याने गुडगावमधून बीटेकचे शिक्षण पूर्ण केले. तो एका व्यावसायिक कुटुंबातील आहे. त्याला त्याच्या गायन आणि अभिनयसाठी ओळखले जाते. फाजिलपुरिया याने हिंदी आणि हरियाणवीसह विविध भाषांमध्ये अनेक हिट गाणी आणि अल्बम प्रदर्शित केले आहेत. त्याच्या हिट गाण्यांमध्ये मस्ती माई, बिल्लो रानी आणि हाय रेटेड गब्रूसारख्या गाण्यांचा समावेश आहे. खामोशियां आणि मस्तीजादेसह अनेक बॉलिवूड चित्रपटांसाठी त्यानी संगीतही दिले आहे. फाजिलपुरिया त्याच्या जीवनशैलीसाठीही ओळखला जातो. तो हमर आणि लॅम्बोर्गिनीसारख्या गाड्यांमध्ये फिरतो, हार्ले डेव्हिडसन गाडी चालवतो आणि सोन्याने जडलेली रोलेक्स घड्याळे व सोन्याच्या जड चेन परोधान करतो. तो अनेकदा वादाच्या भोवर्‍यात अडकला आहे.

एल्विश यादव – साप विष तस्करी प्रकरण

नोव्हेंबर २०२३ मध्ये ‘बिग बॉस ओटीटी’ विजेता एल्विश यादववर सापाच्या विषाचा वापर करणाऱ्या रेव्ह पार्टीचे आयोजन केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान त्याने दावा केला की, सापांची व्यवस्था फाजिलपुरिया यानी केली होती. परंतु, फाजिलपुरिया याने सर्व दावे फेटाळले होते आणि रेव्ह पार्टीमध्ये कोणताही सहभाग नसल्याचे सांगितले होते. सापांची व्यवस्था त्याच्या प्रॉडक्शन टीमने केवळ एक व्हिडिओ शूटसाठी केली होती, असेही स्पष्ट केले होते.

साप विष प्रकरणात यादवला जामीन मिळाला असला, तरी गुडगाव पोलिसांनी ३० मार्च रोजी त्याच्याविरुद्ध आणखी गुन्हा नोंदवला. विशेष म्हणजे आरोपींमध्ये फाजिलपुरियाच्या नावाचाही समावेश आहे. प्राणी हक्क कार्यकर्ते सौरभ गुप्ता यांनी दाखल केलेल्या याचिकेनंतर गुडगाव न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले होते. त्याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी ही कारवाई केली. गुप्ता यांनी गेल्या वर्षी गुडगावच्या सेक्टर ७१ मधील अर्थ आयकॉनिक मॉलमधील एल्विश यादवचा चित्रीकरणाचा एक व्हिडिओ पुराव्या स्वरुपात सादर करून याचिका दाखल केली.

मेनका गांधी यांच्या पीपल फॉर ॲनिमल्स या संस्थेबरोबर काम करणाऱ्या गुप्ता यांनी त्यांच्या याचिकेत आरोप केला आहे की, ‘बिग बॉस ओटीटी २’ चे विजेते आणि इतर ५० जण एका व्हायरल म्युझिक व्हिडिओमध्ये विविध सापांचा वापर करताना दिसत आहे, जे वन्यजीव (संरक्षण) कायदा १९७२ चे उल्लंघन आहे. याचिकाकर्त्याने दावा केला आहे की, व्हिडिओ एका मॉलमध्ये रेकॉर्ड केला गेला होता आणि तिथे इतर चुकीच्या गोष्टीही सुरू होत्या.

अनेक गुन्ह्यांची नोंद

यादव आणि फाजिलपुरिया या दोघांवर भारतीय दंड संहितेच्या कलम २९४ (अश्लील कृत्ये आणि गाणी) आणि ३४ (सामान्य हेतू) , तसेच प्राण्यांवर क्रूरता प्रतिबंधक कायद्याच्या कलम ११ आणि वन्यजीव संरक्षण कायद्याच्या कलम ५१ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. फाजिलपुरिया यानी गायलेले आणि एल्विश यादव अभिनीत ‘३२-बोरे’ गाण्याच्या चित्रीकरणादरम्यान अपमानास्पद भाषा वापरणे आणि सापांचा वापर करणे याविरोधात गुडगावमधील बादशाहपूर पोलिस स्थानकात हे गुन्हे दाखल करण्यात आले.

हेही वाचा : नवरा तुरुंगात, बायको निवडणुकीच्या रिंगणात; कोण आहेत श्रीकला रेड्डी?

जेजेपीशी असलेल्या त्यांच्या संबंधाविषयी बोलताना पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले की, “फाजिलपुरिया हे युवा प्रतीक आहेत. तरुणांमधील त्यांची लोकप्रियता आणि अनेक सामाजिक कार्यांमध्ये सहभाग असल्यामुळे ते पहिल्यांदा पक्षाचे ज्येष्ठ नेते दिग्विजय चौटाला यांच्या संपर्कात आले आणि अखेरीस २०२० मध्ये जेजेपीमध्ये सामील झाले. तेव्हापासून ते जेजेपीचा भाग आहेत. त्यांना राजकारणात आणि पक्षाच्या युवक-कल्याण कार्यक्रमांमध्ये खूप रस आहे.”