Loksabha Election 2024 लिंगायतबहुल धारवाड लोकसभा मतदारसंघ हा उत्तर कर्नाटकातील भाजपाचा बालेकिल्ला आहे. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी या मतदारसंघातून २००४ पासून सलग चार वेळा निवडून आले आहेत. मात्र, यंदाच्या निवडणुकीत प्रल्हाद जोशी यांच्यासह भाजपासमोर लिंगायत समाजाचे मोठे आव्हान आहे. लिंगायत समाजाच्या नाराजीमुळे गेली दोन दशके धारवाडचे प्रतिनिधित्व करणारे जोशी यंदा अडचणीत येतील, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

काँग्रेसने यंदा युवा उमेदवार उभा केला आहे. त्यामुळे जोशींसमोर कोणतेही आव्हान नसल्याचे मानले जात होते. परंतु, आता भाजपाला लिंगायत समाजाच्या नाराजीचा फटका बसण्याची शक्यता आहे. ओबीसी नेते ३४ वर्षीय विनोद आसुती यांना काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. काँग्रेसने १९९८ मध्ये दयामप्पा कल्लाप्पा नायकर यांना उमेदवारी दिली होती. त्यानंतर काँग्रेसने प्रथमच धारवाडमध्ये बिगरलिंगायत उमेदवार उभा केला आहे.

हेही वाचा : मोदींच्या मायभूमीत क्षत्रिय समाजाच्या नाराजीमुळे भाजपाचा विजय कठीण?

हत्या प्रकरणाला लव्ह जिहादचे वळण

एप्रिलमध्ये हुबळी-धारवाड महानगरपालिकेचे काँग्रेस नगरसेवक निरंजन हिरेमठ यांची मुलगी नेहा हिरेमठ हिची तिच्याच विद्यापीठ परिसरात हत्या करण्यात आली होती. माजी वर्गमित्र फैयाज खोंडूनाईक याला घटनेनंतर अटक करण्यात आली. नेहा हिरेमठ हिच्या हत्येनंतर मतदारसंघातील परिस्थिती बदलली. भाजपाने या घटनेचे वर्णन लव्ह जिहाद म्हणून केले आणि निवडणुकीत हा मुद्दा उचलून धरला. संपूर्ण परिसरात नेहासाठी न्याय मागणारे फलक लावण्यात आले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह भाजपाचे प्रमुख नेते जोशी यांनी हिरेमठ यांच्या निवासस्थानी भेट दिली. दुसरीकडे, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यासह काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनीही हिरेमठ कुटुंबाची भेट घेतली.

काँग्रेस सरकारने या घटनेची सीआयडी चौकशी करण्याचे आदेश दिले आणि भाजपाचा लव्ह जिहादचा दावा फेटाळून लावत, ही हत्या वैयक्तिक कारणावरून झाल्याचे म्हटले. धारवाडस्थित मुस्लीम संघटना अंजुमन-ए-इस्लामने नेहाला न्याय मिळावा यासाठी निदर्शनेही केली आणि त्यांनीही लव्ह जिहादचा आरोप नाकारला. हुबळी येथील रहिवासी रमेश कुलकर्णी म्हणाले की, हे प्रेमाचे प्रकरण आहे. ते म्हणाले, “आम्हाला देशासाठी मजबूत सरकार हवे आहे आणि आम्ही त्यासाठी मतदान करू.”

प्रचारसभेतील मुद्दे

प्रल्हाद जोशी यांनी आपल्या निवडणूक सभांमध्ये कलम ३७० रद्द करणे, काँग्रेसचे अल्पसंख्याक तुष्टीकरण व मोदींचे कर्तृत्व यांसारखे मुद्दे केंद्रस्थानी ठेवले आहेत. त्यात दुष्काळ आणि महादयी नदी वाद यांसारख्या प्रादेशिक समस्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यात आता लव्ह जिहादचाही उल्लेख केला जात आहे. काँग्रेसचा प्रचार जिल्हा प्रभारी संतोष लाड यांच्याकडे आहे. आसुती यांचा मतदारसंघावर फारसा प्रभाव नाही आणि त्यामुळे जोशींसाठी कुठे न कुठे ही सकारात्मक गोष्ट आहे.

मुस्लीम मतदारांचा झुकाव काँग्रेसकडे

परंतु, काँग्रेसच्या एका नेत्याचे म्हणणे आहे, “आमच्या पक्षाला नवलगुंड, शिगगाव व कल्हाटगी यांसारख्या ग्रामीण भागात मते मिळविण्याची संधी आहे. हुबळी पूर्वेला ५० टक्क्यांपेक्षा जास्त मुस्लीम मतदार आहेत; ज्यांचा झुकाव काँग्रेसकडे आहे.” परंतु, ज्येष्ठ प्रादेशिक नेते विनय कुलकर्णी यांचा एका हत्या प्रकरणात सहभाग असल्याची माहिती समोर आल्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. त्यांना धारवाड जिल्ह्यात येण्यापासून रोखण्यात आले आहे.

धारवाड मतदारसंघात लिंगायत आणि मुस्लिमांना ‘गेम चेंजर’ मानले जाते. या मतदारसंघात २५ टक्के लिंगायत, तर २३ टक्के मतदार मुस्लीम आहेत. शिरहट्टी फकिरेश्वर मठातील प्रमुख दिंगलेश्वर स्वामी यांनी लिंगायत चेहरा आणण्याची मागणी केली होती. त्यामुळेही जोशी अडचणीत आले होते. जोशी हे ब्राह्मण आहेत. दिंगलेश्वर स्वामी यांनी जोशी यांच्यावर लिंगायत समाजाच्या समस्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला होता. दिंगलेश्वर स्वामी यांनी अपक्ष म्हणून या मतदारसंघातून लढण्याची तयारी दाखविली होती. मात्र, भाजपा आणि काँग्रेसच्या विनंतीनंतर त्यांनी माघार घेतली असली तरी त्यांनी जोशींच्या विरोधातील मोहीम सुरूच ठेवली आहे.

जोशी यांच्याविरोधात स्थानिकांची नाराजी

भाजपाच्या एका नेत्याने मान्य केले की, जोशी यांच्यावर स्थानिक नागरिक विशेषत: लिंगायत समाज नाराज आहे. त्यांनी धारवाडचे भाजपाचे दिग्गज लिंगायत नेते व माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांचे उदाहरण दिले. त्यांनी मे २०२३ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्ष सोडला; परंतु चार महिन्यांपूर्वी ते पक्षात परतले आणि आता बेळगावमधून भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवीत आहेत. “धारवाड भागात जगदीश शेट्टर आणि इतर काही लिंगायत नेत्यांना भाजपामधून ज्या प्रकारे बाजूला करण्यात आले, तीच समस्या बनली आहे,” असे भाजपा नेते म्हणाले.

माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचे नातू, जेडी (एस)चे हसन खासदार व उमेदवार प्रज्वल रेवण्णा यांच्यावर आता लैंगिक शोषणाच्या आरोपांमुळे भाजपाला पेच सहन करावा लागत आहे. पक्षाने जरी या प्रकरणापासून स्वतःला दूर ठेवले असले तरी हे प्रकरण भाजपाला लोकसभा निवडणुकीत अडचणीचे ठरू शकते.

हेही वाचा : संविधान आणि आरक्षणाचा मुद्दा प्रचार सभांमध्ये केंद्रस्थानी, दावे-प्रतिदावे नेमके काय?

१९९६ पासून धारवाड जागेवर भाजपाचे वर्चस्व

स्वातंत्र्यापासून काँग्रेसचा बालेकिल्ला असलेली धारवाडची जागा १९९६ च्या निवडणुकीत भाजपाने जिंकली होती. त्यात हुबळी येथे इदगाह मैदानावर राष्ट्रध्वज फडकवल्यानंतर उसळलेल्या दंगलीमुळे लोकांमध्ये हिंदुत्वाची भावना जागृत झाली; ज्यामुळे भाजपाचे वर्चस्व वाढत गेले. धारवाडमध्ये ७ मे रोजी मतदान होत आहे. २०२३ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपाने धारवाड लोकसभा मतदारसंघातील प्रत्येकी चार विधानसभा जागांवर विजय मिळविला होता. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत जोशी यांनी या मतदारसंघातून काँग्रेसच्या विनय कुलकर्णी यांचा दोन लाखांहून अधिक मतांनी पराभव केला होता.