अनुसूचित जातींना (एससी) आजही देशभरात भेदभावाचा सामना करावा लागत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचाही अपमान केला जात आहे, कारण ते दोघेही अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीतील आहेत, असा आरोप काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी भाजपा सरकारवर केला. ते म्हणाले की, मुर्मू यांना अयोध्येतील राम मंदिर अभिषेक आणि संसदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनासाठी आमंत्रित करण्यात आले नव्हते, तर दुसरीकडे कोविंद यांना नवीन संसद भवनाची पायाभरणी करण्याची परवानगी नव्हती. ‘इंडियन एक्स्प्रेस आयडिया एक्स्चेंज’ कार्यक्रमादरम्यान खरगे यांनी राम मंदिर, भाजपाने दिलेला ‘४०० पार’चा नारा, जातीय भेदभाव अशा अनेक मुद्द्यांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखलील भाजपा सरकारवर टीका केली.

“मोदींचे तिसऱ्या टर्मचे स्वप्न पूर्ण होणार नाही”

राम मंदिरावरून भाजपाने काँग्रेसवर केलेले सर्व आरोप मल्लिकार्जुन खरगे यांनी फेटाळून लावले. ते म्हणाले की, अनेक मंदिरांमध्ये आजही अनुसूचित जातींना प्रवेश दिला जात नाही. “मी अयोध्येला गेलो असतो तर त्यांना हे सहन झाले असते का?” असा प्रश्न त्यांनी केला. खरगे यांनी मोदींच्या ‘अब की बार ४०० पार’च्या घोषणेवरदेखील टीका केली. मोदींचे तिसऱ्या टर्मचे स्वप्न पूर्ण होणार नाही, कारण लोकांना परिवर्तन हवे आहे. भाजपाचे नेते आधीच संविधान बदलण्याविषयी बोलत आहेत, असे ते म्हणाले.

हेही वाचा : ब्राह्मण ते ठाकूर, दलित ते मुस्लिम; उत्तराखंडमध्ये जातीय समीकरणावरच निकालाचे गणित

राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्यातील काँग्रेसच्या सहभागाबद्दल बोलताना खरगे म्हणाले, “ही वैयक्तिक श्रद्धा आहे, ज्याची इच्छा असेल तो त्या दिवशी, दुसऱ्या दिवशी किंवा इतर कोणत्याही दिवशी जाऊ शकतो. ते (मोदी) पुजारी नाहीत. राम मूर्तीची स्थापना त्यांनी का करावी. ते केवळ राजकीय हेतूनेच करण्यात आले. मंदिराचा एक तृतीयांश भागही पूर्ण झालेला नाही. हे राजकीय कार्य आहे की धार्मिक कार्य? राजकारणात धर्माला का आणले जात आहे? असा प्रश्न त्यांनी केला.

“दलितांना आजही मंदिरात परवानगी नाही”

मल्लिकार्जुन खरगेदेखील अनुसूचित जातीतील आहेत. ते म्हणाले, “माझ्या लोकांना आजही सर्व मंदिरांमध्ये प्रवेश नाही. राम मंदिर तर सोडा, इतरही कुठे गेले तरी मंदिर प्रवेशासाठी वाद होत असतो. गावागावातील छोट्या मंदिरांमध्येही त्यांना परवानगी दिली जात नाही. तुम्ही त्यांना पिण्याचे पाणी देत ​​नाही, शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश देत नाही, त्यांना मारहाण केली जाते. त्यामुळे जर का मी मंदिरात गेलो असतो, तर त्यांनी हे सहन केले असते का.” ते पुढे म्हणाले, “माझे कोणाशीही वैर नाही. आपल्याकडे ३३ कोटी देवदेवता आहेत. जर त्यांनी माझ्या लोकांना पूजा करण्याची परवानगी दिली तर आम्ही सर्व ३३ कोटी देवी-देवतांची पूजा करू”, असे खरगे म्हणाले.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा अपमान केल्याचा आरोप

“राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना प्राणप्रतिष्ठेसाठी पंतप्रधानांसह परवानगी का दिली गेली नाही? त्या या देशाच्या पहिल्या नागरिक आहेत. तुम्ही त्यांना परवानगी दिली नाही. नवीन संसद इमारतीच्या उद्घाटनासाठीही त्यांना आमंत्रित केले गेले नाही. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद अनुसूचित जातीतून येतात, पण त्यांनाही नवीन संसदेची पायाभरणी करू दिली नाही. जर इतर समाजाचे लोक त्या स्थानी असते तर तुम्ही या नियमांचे कधीही उल्लंघन केले नसते. एकीकडे तुम्ही अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीतील लोकांच्या हक्कांबद्दल खूप बोलता आणि दुसरीकडे त्यांचा अपमान करता”, असा आरोप त्यांनी पंतप्रधान मोदींवर केला.

खरगे म्हणाले, काँग्रेसने आपल्या लोकांना सांगितले होते की, “जिसकी आस्था है, जरूर जाओ. हम जिस वक्त जाना हैं, उस वक्त जाएंगे (ज्यांना विश्वास आहे त्यांनी जरूर जावे. आम्हाला जेव्हा जायचे असेल, तेव्हा आम्ही जाऊ). पण माझी अडचण अशी आहे की, माझ्या लोकांना कुठेही परवानगी नाही. माझ्या लोकांचा अपमान केला जात आहे, ते शोषित आहेत. जोपर्यंत त्यांना खरे स्वातंत्र्य मिळत नाही, तोपर्यंत मी कसा जाऊ?

“मोदीजींवर विश्वास ठेवणे कठीण”

पंतप्रधान मोदींच्या ‘४०० पार’ मोहिमेवर खरगे म्हणाले, “मोदीजी जे काही बोलतात त्यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. त्यांच्या आधीच्या पंतप्रधानांनी कधीच खोटे बोलून अशी अतिशयोक्ती असणारी आकडेवारी दिली नाही. ते आता ‘४०० पार’ म्हणत आहेत, बरं आहे ते ‘६०० पार’ म्हणाले नाही, कारण आपल्या संसदेचे (लोकसभेचे) संख्याबळ ५४३ आहे; अन्यथा त्यांनी ‘६०० पार’ही म्हटले असते.”

मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, ते बोलत असले तरीही त्यांचे स्वप्न पूर्ण होणार नाही. त्यासाठी आम्ही आमचे संख्याबळ मजबूत करत आहोत आणि आम्ही त्यांना दाखवून देऊ की, विरोधी पक्षाला नाही तर देशातील जनतेला बदल हवा आहे. जनता नाखूष आहे. ते म्हणाले की, मोदी आधी एका राज्यात एक-दोन सभा घ्यायचे, पण आता त्यांना रस्त्यावर उतरावे लागले आहे. एखाद्या नगरसेवकाला पुष्पहार घालायला आणि स्वागत करायलाही ते हजर असतात. एकेकाळी त्यांनीच भ्रष्टाचाराचा आरोप केलेल्या नेत्यांना ते एकत्र करत आहेत, अशी टीका त्यांनी भाजपातील नेत्यांच्या पक्ष प्रवेशावर केली. खरगे म्हणाले, यावरून भाजपाच्या अस्वस्थतेची कल्पना तुम्ही करू शकता. मोदी स्वतः घाबरले आहेत. इंडिया आघाडीला यंदा मोठ्या संख्येने मत मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

हेही वाचा : Election 2024: राजकीय पक्षांसाठी काम करणारे पगारी कार्यकर्ते

मोदींच्या तिसऱ्या टर्मबद्दल विरोधकांमध्ये भीती आहे का? यावर उत्तर देताना खरगे म्हणाले, “एक धोका आहे. सत्तेत येण्यापूर्वीच ते आम्हाला दोन तृतीयांश बहुमत द्या, म्हणजे आम्ही संविधान बदलू’ असे म्हणत आहेत. हे मी म्हणत नाही, तर त्यांचे खासदार अनंतकुमार हेगडे, आरएसएसप्रमुख, उत्तर प्रदेशातील अनेक खासदार म्हणत आहेत. या विधानांवर पक्षातील इतर नेते त्यांची वकिली करत आहेत आणि मोदीजी गप्प आहेत. ते या नेत्यांवर कारवाई का करत नाहीत? या लोकांना पक्षातून बाहेर का काढले जात नाही? त्यांना तिकीट का नाकारले जात नाही? असे प्रश्न त्यांनी केले. खरगे म्हणाले की, जर कोणी संविधानाच्या विरोधात बोलत असेल, तर तुम्ही त्यांना देशद्रोही समजता. पण, जे लोक संविधान बदलण्याची भाषा करतात त्यांच्यावर मोदीजी कारवाई करत नाहीत