यंदाच्या लोकसभा निवडणुकीत बहुजन समाज पक्षाने (बसप) आतापर्यंतची सर्वात वाईट कामगिरी नोंदवली. लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्याच्या आठवडाभरानंतरच पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी रविवारी (२३ जून) त्यांचा पुतण्या आकाश आनंद यांना त्यांचा एकमेव राजकीय वारसदार आणि पक्षाचा राष्ट्रीय समन्वयक म्हणून नियुक्त केले आणि पक्षातील नेत्यांना “त्याला पूर्वीपेक्षा जास्त आदर द्या” असे आवाहन केले.

मायावतींनी २०१९ मध्ये आकाशची पक्षाचे राष्ट्रीय समन्वयक म्हणून नियुक्ती केली होती. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये मायावती यांनी आकाश आनंद यांना आपला उत्तराधिकारी म्हणून घोषित केले होते. मात्र, लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी आपला निर्णय बदलून आकाश आनंद यांना उत्तराधिकारी आणि पक्षाच्या राष्ट्रीय समन्वयक पदावरून हटवले. बसप नेत्यांनी आनंदला पुन्हा नियुक्त केले जाईल याची खात्री असल्याचे सांगितले. परंतु, हा निर्णय इतक्या लवकर घेतला जाईल, याची शक्यता कमी होती. पक्षातील काहींनी असा अंदाज लावला की, उत्तर प्रदेशातील नगीना लोकसभा मतदारसंघातून चंद्रशेखर आझाद यांचा विजय मायावतींच्या या यूटर्नचे कारण आहे. आकाश आनंद परत आल्याने, पक्षासाठी विशेषत: पोटनिवडणूक आणि २०२७ मध्ये होणाऱ्या राज्यातील विधानसभा निवडणुकांचे स्वरूप बदलण्याची शक्यता आहे.

मायावती यांनी रविवारी (२३ जून) त्यांचा पुतण्या आकाश आनंद यांना त्यांचा एकमेव राजकीय वारसदार आणि पक्षाचा राष्ट्रीय समन्वयक म्हणून नियुक्त केले. (छायाचित्र-पीटीआय)

हेही वाचा : समलैंगिक अत्याचारप्रकरणी प्रज्ज्वल रेवण्णाच्या भावाला अटक; कोण आहे सूरज रेवण्णा?

आकाश आनंद यांची उचलबांगडी का करण्यात आली होती?

“पक्ष आणि चळवळीच्या व्यापक हितासाठी ते परिपक्व नाहीत,” असे सांगत ७ मे रोजी, मायावतींनी आकाशला या जबाबदारीतून मुक्त केले होते. उत्तर प्रदेशच्या सीतापूरमधील पोलिसांनी आकाशवर द्वेष आणि शत्रुत्वाला प्रोत्साहन दिल्याबद्दल गुन्हा दाखल केला होता. त्यांनी भाजपा सरकारचा ‘आतंकवादीयो की सरकार (दहशतवाद्यांचे सरकार)’ असा उल्लेख केला होता. त्यानंतरच हा निर्णय घेण्यात आला.

मायावतींच्या यूटर्नचे कारण काय?

पदावरून आकाश आनंद यांची हकालपट्टी झाल्यानंतर त्यांनी लोकसभा निवडणुकीचा प्रचार मध्यभागीच थांबवला. निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांनी आपली नाराजी व्यक्त करत सांगितले की, आकाश आनंद यांनी आपली मोहीम सुरू ठेवली असती तर जाटव दलित आणि मुस्लीम मतदारांनी समाजवादी पार्टी (सपा) – काँग्रेस आघाडीला पाठिंबा दिला नसता. मायावतींनी आपल्या प्रचारसभांमध्ये प्रामुख्याने सपा आणि काँग्रेसवर आरोप केले; तर आकाश यांनी शिक्षण, गरिबी, अर्थव्यवस्था, कायदा आणि सुव्यवस्था या मुद्द्यांवरून सातत्याने भाजपावर टीका केली. त्यांच्या जाण्याने दलित आणि मुस्लिमांना संदेश गेला की, मायावती भाजपाच्या दबावाला बळी पडल्या आहेत.

“त्यांच्या पुनर्नियुक्तीमुळे बसपवर भाजपाची बी-टीम असल्याचा टॅग हटवण्यास मदत होईल. त्यामुळे जाटव आणि इतर दलित मतदारांचा विश्वास पुनर्संचयित करण्यात मदत होईल आणि लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर निराश झालेल्या आमच्या केडरला पुन्हा नवी ऊर्जा मिळेल,” असे पक्षाच्या एका नेत्याने सांगितले. “बसपकडे आता लोकसभेचा एकही खासदार नाही. आता आझाद देशभरातील दलित आणि मुस्लिमांचे प्रश्न सभागृहात मांडतील. यामुळे ते दलित नेता म्हणून उदयास येतील, तर मायावतींकडे केवळ एक पर्याय म्हणून पाहिले जाईल; ज्यामुळे बसपा आणखी कमकुवत होईल. हे नुकसान आटोक्यात आणण्यासाठी आनंदचे पुनरागमन महत्त्वाचे होते,” असे बसपच्या दुसर्‍या एका नेत्याने सांगितले.

बसपकडे लोकप्रिय चेहरा नसल्यामुळे बसपला लोकसभा निवडणुकीच्या स्पर्धेत फटका बसला हे स्पष्ट आहे. मायावती या पक्षाचा एकमेव प्रमुख चेहरा राहिल्या आहेत. लालजी वर्मा, आर. के. चौधरी, राजा राम पाल, स्वामी प्रसाद मौर्य, नसीमुद्दीन सिद्दीकी, रामचल राजभर, इंद्रजीत सरोज आणि बाबूसिंह कुशवाह यांसारख्या दलित, ओबीसी आणि मुस्लीम नेत्यांनी एक तर आपली निष्ठा बदलली किंवा पक्षातून त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.

आकाश आनंदच्या पुनरागमनाचा काय परिणाम होणार?

राष्ट्रीय समन्वयक म्हणून २०१९ पासून आकाश आनंद यांचे पक्षातील अधिकार मर्यादित होते. त्यांना बाजूला करण्यात आले होते आणि लोकसभा निवडणुकीसाठी तिकीट वाटपातही त्यांना फारसे महत्त्व दिले गेले नाही. २०२७ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बसपाच्या एका नेत्याने सांगितले की, पक्षाला एका तरुण नेत्याची गरज आहे जो राज्यभर फिरू शकेल, जिल्हावार बैठका घेऊ शकेल आणि थेट मैदानात उतरून काम करू शकेल.

मायावतींच्या निर्णयाचा आणि चंद्रशेखर आझाद यांच्या विजयाचा काही संबंध आहे का?

आझाद समाज पक्षाचे (कांशीराम) नेते चंद्रशेखर आझाद यांच्या नगीना लोकसभा मतदारसंघातून विजयानंतरच मायावतींचे हृदयपरिवर्तन झाल्याचे पक्षातीलच काही नेत्यांनी सांगितले. बसपने २०१९ मध्ये नगीना ही जागा जिंकली होती, तेव्हा बसपने सपा आणि राष्ट्रीय लोक दल (आरएलडी) बरोबर युती करून निवडणूक लढवली होती.

हेही वाचा : भाजपाच्या लोकसभा निवडणुकीतील कामगिरीवरून अयोध्येच्या महंतांचा जिल्हाधिकार्‍यांशी वाद; कोण आहेत महंत राजू दास?

मात्र, बसपला २०२४ च्या निवडणुकीत एकही जागा जिंकता आलेली नाही. आझाद यांच्यासारख्या तरुण आणि लोकप्रिय दलित नेत्याच्या उदयाने उत्तर प्रदेशमध्ये बसपच्या मतांचा वाटा १९.३ टक्क्यांवरून ९.३ टक्क्यांपर्यंत घसरला आहे. आझाद यांनी सपा किंवा काँग्रेसच्या मदतीशिवाय नगीना मतदारसंघ १.५३ लाख मतांनी जिंकला आहे. सूत्रांनी सांगितले की, आनंद यांना पदावरून हटवण्यापूर्वी त्यांनी विधानसभा निवडणुकीची रणनीती आखण्यास सुरुवात केली होती. पक्षाच्या पुनरुज्जीवनासाठी रोडमॅप तयार करण्याच्या कामाला आता गती मिळेल, असेही ते म्हणाले. “ते या वर्षाच्या अखेरीस आणि २०२५ मध्ये विधानसभा निवडणुका होणाऱ्या इतर राज्यांमध्येही जातील,” असे बसपाच्या एका सूत्राने सांगितले.