देशातील सर्वच पक्ष २०२४ साली मार्च-एप्रिल महिन्यात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. सत्ता कायम राखण्यासाठी भाजपाकडून प्रयत्न केला जात आहे. भाजपा वेगवेगळ्या राज्यांतील प्रादेशिक पक्षांना राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये (एनडीए) सामील करून घेण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून भाजपाने कर्नाटकमधील जेडीएस पक्षाशी युती केली आहे. दुसरीकडे तामिळनाडूतील एआयएडीएमके पक्षाने भाजपाशी असलेली युती तोडली आहे. असे असतानाच आता ओडिसा राज्यात भाजपा आणि सत्ताधारी पक्ष बिजू जनता दल (बीजेडी) या पक्षांत युती होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

नवीन पटनाईक यांनी दिले १० पैकी ८ गुण

बीजेडी पक्षाने मोदी सरकारच्या धोरणाला यापूर्वी अनेकवेळा पाठिंबा दिलेला आहे. बीजेडी पक्षाचे सर्वेसर्वा तथा ओडिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी मोदी सरकारला परराष्ट्र धोरण आणि भ्रष्टाचारावरील नियंत्रण या बाबतीत १० पैकी आठ गुण दिले आहेत. तसेच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तुती केली आहे. याच कारणामुळे भविष्यात भाजपा आणि बीजेडी हे दोन्ही पक्ष एकत्र येणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. रविवारी ‘द न्यू इंडियन एक्स्प्रेस’ने एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात बोलताना नवीन पटनाईक यांनी मोदी यांची स्तुती केली.

Sharad Pawar criticism that Narendra Modi has no moral right to demand the power of the country again
नरेंद्र मोदींना देशाची सत्ता पुन्हा मागण्याचा नैतिक अधिकार नाही; शरद पवारांचा हल्लाबोल
AAP leader Atishi accused the central government of a conspiracy of President rule in Delhi
दिल्लीत राष्ट्रपती राजवटीचा कट! ‘आप’च्या नेत्या आतिशी यांचा केंद्र सरकारवर आरोप; भाजपचे प्रत्युत्तर
Eknath Shinde, Eknath Shinde group
सरकारच्या कामांचा लेखाजोखा मांडत शिंदे गटाचा प्रचार
Parakala Prabhakar criticism of the government development work Pune news
केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या पतीचे सरकारवर टीकास्र, म्हणाले, ‘विकास होत असल्याचे दाखवण्याची सरकारला घाई’

दोन पक्षांत होती ११ वर्षे युती

बीजेपी आणि बीजेडी या दोन्ही पक्षांत साधारण ११ वर्षे युती होती. मात्र, २००९ सालच्या निवडणुकीआधी पटनाईक यांनी ही युती तोडली होती. २६ डिसेंबर १९९७ रोजी स्थापन झालेल्या बीजेडी या पक्षाने १९९८, १९९९, २००४ सालची लोकसभा; तर २००० आणि २००४ सालची विधानसभा निवडणूक भाजपाला सोबत घेऊन लढवली होती. २००८ सालच्या ऑगस्ट महिन्यात कंधमाल येथे दंगल झाली होती. याच दंगलीनंतर बीजेडीने भाजपाशी असलेली युती तोडली होती. यावेळी २००९ सालची लोकसभा निवडणूक जवळ आलेली असताना भाजपाचे नेते लालकृष्ण आडवाणी यांचे प्रतिनिधी चंदन मित्रा यांच्याशी नवीन पटनाईक यांची युतीसंदर्भात चर्चा झाली होती. या चर्चेनंतर त्यांनी भाजपाशी असलेली युती तोडली होती.

काडीमोड केल्यामुळे भाजपाला तोटा

नवीन पटनाईक यांनी युती तोडल्यामुळे ओडिसा राज्यात भाजपाला फटका बसला होता. ही युती तुटल्यानंतर २००९ सालच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला एकही जागा जिंकता आली नव्हती; तर विधानसभा निवडणुकीत ६ जागांवर भाजपाचा विजय झाला होता. २००४ सालच्या विधानसभा निवडणुकीत युतीत असताना भाजपाचा ३२ जागांवर, तर लोकसभेच्या निवडणुकीत ७ जागांवर विजय झाला होता.

“युती तोडण्याचा निर्णय मास्टरस्ट्रोक होता”

भाजपा आणि बीजेडी यांच्यातील अगोदरच्या युतीबाबत बीजेडी पक्षाच्या एका नेत्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर प्रतिक्रिया दिली. “नवीन पटनाईक यांनी भाजपाला सोडण्याचा निर्णय मास्टरस्ट्रोक होता. ही युती तोडल्यामुळे पटनाईक यांची राष्ट्रीय पातळीवर प्रशंसा करण्यात आली होती. युती तुटल्यानंतर २००९ सालच्या निवडणुकीत बीजेडीने १२९ जागांपैकी एकूण १०३ जागांवर विजय मिळवला होता; तर लोकसभा निवडणुकीत एकूण २१ पैकी १४ जागा या बीजेडी पक्षाने जिंकल्या होत्या. २०१४ आणि २०१९ सालच्या लोकसभा निवडणुकीतही बीजेडी पक्ष अधिक मजबूत झाला”, अशी प्रतिक्रिया या नेत्याने दिली.

नवीन पटनाईक यांची भूमिका भाजपाला पूरक

२०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीआधी २०१३ साली नवीन पटनाईक यांनी आमचा पक्ष मोदी यांना पाठिंबा देणार नाही, असे जाहीर केले होते. मात्र, २०१४ साली भाजपाचा विजय झाला. त्यानंतर मात्र पटनाईक यांनी यू टर्न घेतला. तेव्हापासून नवीन पटनाईक यांची तसेच त्यांच्या पक्षाची भूमिका ही भाजपासाठी पूरकच राहिलेली आहे. पटनाईक यांनी मोदींनी केलेल्या नोटबंदीला पाठिंबा दिला होता. तसेच पाकिस्तानवर केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर त्यांनी केंद्र सरकारचे अभिनंदन केले होते. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीतही त्यांनी एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा दिला होता. तीन तलाक, कलम ३७० रद्दबातल करण्याचा निर्णय, दिल्लीसाठीचे एनसीटी विधेयक अशा वेगवेगळ्या क्षणी बीजेडी पक्षाने भाजपाला पाठिंबा दिलेला आहे. विरोधकांनी नुकतेच दाखल केलेल्या अविश्वास ठरवावेळी बीजेडी पक्षाच्या खासदारांनी भाजपाच्या बाजूने मतदान केले होते.

दोन्ही पक्ष एकत्र येणार का?

दरम्यान, बीजेडीने युती तोडल्यामुळे ओडिसा राज्यात भाजपाला तोटाच झाला आहे. सध्या नवीन पटनाईक यांची भूमिका ही भाजपा आणि एनडीएसाठी पूरकच राहिलेली आहे. आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आली आहे. त्यामुळे आगामी राजकीय फायदा लक्षात घेता हे दोन्ही पक्ष अधिकृतपणे एकत्र येणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.