परभणी : उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने विद्यमान खासदार संजय जाधव यांची अधिकृतपणे जाहीर झालेली उमेदवारी अपेक्षितच असून या निमित्ताने ते आता खासदारकीसाठी तिसऱ्यांदा रिंगणात उतरत आहेत. दोन दशके सत्तापदावर राहूनही कोणत्याही आंदोलनात सदैव रस्त्यावर उतरण्याची तयारी हे खासदार जाधव यांचे ठळक वैशिष्ट्य मानता येईल.

२००४ च्या निवडणुकीत अशोक देशमुख यांचा तर २००९ च्या निवडणुकीत विखार अहमद खान यांचा पराभव करीत खासदार जाधव यांनी दोन वेळा परभणी विधानसभा मतदारसंघातून विजय संपादन केला. विधानसभा निवडणुकीत परभणीत होणाऱ्या ‘खान हवा की बाण’ या धार्मिक ध्रुवीकरणाच्या विभागणीचेही या विजयामागे एक प्रमुख कारण आहे. दोन वेळा मिळालेल्या आमदारकीनंतर खासदार जाधव यांना पक्षाने बढती दिली. २०१४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत विजय भांबळे यांचा पराभव करून ते निवडून आले तर २०१९ साली झालेल्या निवडणुकीत त्यांनी राजेश विटेकर यांना पराभूत केले. कट्टर शिवसैनिक असलेल्या खासदार जाधव यांची सुरुवात शाखाप्रमुख, शहरप्रमुख, जिल्हाप्रमुख झालेली आहे. राजे संभाजी मित्र मंडळाची स्थापना करत या मंडळाच्या माध्यमातून क्रिकेट स्पर्धा, नवरात्र उत्सव आणि विविध उपक्रमांच्या माध्यमातून त्यांनी तरुणांची मोठी फळी निर्माण केली. जो खासदार निवडून येतो तो पक्षाशी द्रोह करतो अशी परभणी लोकसभा मतदारसंघाची ख्याती असताना खासदार जाधव मात्र ठामपणे उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहिले. पक्षाने त्यांना काही महिन्यांपूर्वीच उपनेतेपदी स्थान दिले आहे.

हेही वाचा… वंचितची तिसरी आघाडी भाजपच्या पथ्थ्यावर? महाविकास आघाडीची चिंता वाढली

परभणी जिल्ह्यात राष्ट्रवादी आणि शिवसेना हे खरे तर एकमेकांचे कट्टर राजकीय शत्रू पण महाविकास आघाडीच्या सरकारमुळे या दोन्ही पक्षांना एकत्र आणले तरीही स्थानिक पातळीवर या पक्षांमधला सत्तासंघर्ष अलीकडे पर्यंत उफाळून येत असे. त्यातूनच एकदा खासदार जाधव यांनी राजीनाम्याचेही अस्त्र बाहेर काढले. जिंतूरला राष्ट्रवादीचा आमदार नसताना त्यांच्या कार्यकर्त्यांचे प्रशासक मंडळ बाजार समितीवर नियुक्त करण्यात आले. यामुळे खासदार जाधव नाराज झाले होते. कार्यकर्त्यांना न्याय देऊ शकत नसेल तर मला खासदार म्हणून राहण्याचा नैतिक अधिकार उरलेला नाही असे पत्र त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठवले. आणखी एका कार्यक्रमात त्यांनी राष्ट्रवादीवर जाहीर टीका केली होती. ‘प्रत्येक गोष्टीत राष्ट्रवादीकडून आम्हाला खाजवाखाजवी सुरू आहे. आमच्या सुद्धा भावना अनावर होतात. कुठवर शांत बसायचं. माकडीन सुद्धा स्वतः बुडायची वेळ आल्यावर लेकराला पायाखाली घेते. राष्ट्रवादीला आम्ही कधीही बुडवू.’ असा इशारा खासदार जाधव यांनी दिल्यानंतर महाविकास आघाडीत बरीच खळबळ उडाली होती.

हेही वाचा… ठाण्यात राजन विचारे यांचे शिंदे गटासमोर आ‌व्हान, कल्याणमध्ये उमेदवाराचा शोध सुरूच

कोणताही आड पडदा न ठेवता खासदार जाधव हे बेधडकपणे व्यक्त होतात. पक्षफुटीच्या काळात अनेक वावड्या उठत असतानाही त्यांनी अत्यंत ठामपणे आपली अविचल अशी निष्ठा राखली. मात्र जे मनात येईल ते स्पष्टपणे बोलणे हा त्यांचा स्वभाव आहे. ‘तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं होतं तर मग मुलाला मंत्री का केलं?’ असे उद्गार हिंगोलीतल्या एका जाहीर सभेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविषयी त्यांनी काढले होते. या पद्धतीने त्यांचा स्पष्टवक्तेपणा अनेकदा दिसून आला आहे. एक दशक आमदार तर एक दशक खासदार राहूनही परभणीत महत्त्वाकांक्षी प्रकल्प साकारणे, बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या संधी देणे किंवा कृषी, औद्योगिक प्रकल्पांची उभारणी करणे या बाबी खासदार जाधव यांच्या कार्यकाळात अजूनही झाल्या नाहीत ही वस्तुस्थिती आहे तर तरुणाईशी थेट संपर्क, शिवसेनेला हवी असणारी हिंदुत्ववादी प्रतिमा, गावपातळीपर्यंत संपर्काचे जाळे आणि पक्षापलीकडे जपलेल्या हितसंबंधातून होणारी मदत या खासदार जाधव यांच्या जमेच्या बाजू आहेत.