छत्रपती संभाजीनगर : खासदार निधीतील तरतूद खर्च करण्यात बीडच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे मराठवाड्यात मागच्या बाकावर असल्याचे चित्र दिसून येत आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यास दीड- दोन महिन्यांचा कालावधी राहिलेला असतानाही बीडच्या खासदारांनी त्यांच्या पाच कोटींच्या निधीतून केवळ दोन कोटी ८४ लाखांच्या कामांना मंजुरी दिली असून, त्यातील दोन कोटी १३ लाख रुपये खर्ची पडले असल्याची माहिती प्रशासनाकडे उपलब्ध आहे. मराठवाड्यातील आठ लोकसभा मतदारसंघांत एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील व लातूरचे खासदार सुधाकर श्रृंगारे हे दोघे आघाडीवर असून, खासदार शृंगारे यांनी जुन्या निधीसह १० कोटी ४२ लाख रुपयांचा निधी खर्च केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

करोना विषाणूचा प्रादूर्भाव वाढल्याने लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे निर्माण झालेल्या आर्थिक आणिबाणीच्या स्थितीमध्ये दोन वर्षे निधी मिळाला नव्हता. छत्रपती संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील म्हणाले, की हा कमालीचा अपुरा निधी आहे. एक किलोमीटरचा रस्ता करायचा म्हटले, तरी एक कोटी रुपये लागतात. सर्वसाधारणपणे मंदिर, बुद्धविहारांमध्ये जाणाऱ्या रस्त्यावर सिमेंटचे गट्टू बसवणे, सभागृह बांधणे अशाच कामाची मागणी असते. जेवढी मागणी होती तेवढा निधी आता खर्च झाला आहे. धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी पाच कोटी ३५ लाख रुपयांच्या कामांना मंजुरी दिली आहे. मात्र, वितरित निधी केवळ १ कोटी ९९ लाख रुपये खर्च झाले आहे. मंजूर कामे आणि खर्च याच्या पोर्टलमध्येही काही नोंदी चुकीच्या असू शकतात असे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा – बारामतीचा गड शरद पवार की अजित पवार कायम राखणार ?

सर्वाधिक निधी परभणीचे उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव यांच्या नावावर शिल्लक होता. १७ कोटी रुपयांपैकी त्यांनी केवळ सहा कोटी २० लाखांच्या कामांनाच मंजुरी दिली. त्यामुळे अजूनही अर्धा निधी शिल्लक असल्याचे दिसून येत आहे. राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी पाच कोटी रुपयांपैकी तीन कोटी ५० लाख रुपयांच्या कामांना मंजुरी दिली असून, ती सर्व रक्कम खर्च झाली आहे. हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी सात कोटी १० लाख रुपयांच्या निधीसाठी १० कोटी ४३ लाखांच्या कामांना मान्यता देण्याची शिफारस केली. त्यांपैकी पाच कोटी ३८ लाख रुपये खर्ची टाकण्यात आलेले आहेत. खासदार निधीतून केलेल्या कामांचे कधीही विशेष लेखा परीक्षण होत नाही. त्यामुळे निधी खर्चातील टक्केवारीची चर्चा राजकीय वर्तुळात नेहमी सुरू असते. मराठवाड्यातील आठ खासदारांच्या ६६ कोटी ८१ लाख रुपयांच्या उपलब्ध निधींपैकी ४४ कोटी ५६ लाख रुपयांचा खर्च नोंदविण्यात आला आहे.

हेही वाचा – अधिवेशन फक्त दहा दिवसांचे , विदर्भाच्या प्रश्नांना किती स्थान मिळणार ?

खासदार निधी खर्च होत नसल्याबद्दल खासदार प्रीतम मुंडे यांच्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यांना लघूसंदेशही पाठविण्यात आला. पण दोन दिवसांत त्यांच्याकडून काहीच प्रतिसाद मिळाला नाही.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pritam munde behind in mp fund spending in marathwada print politics news ssb
First published on: 02-12-2023 at 12:26 IST