राजकारणात काही ठिकाणी नाती निर्माण होतात, तर काही तुटतात. काही राज्यांमध्ये पूर्वीचे प्रतिस्पर्धी असलेले लोक जवळ येतात, तर काही राज्यांमध्ये पूर्वीपासून असलेले सौहार्दपूर्ण संबंध अधिक गोड होतात. असेच काहीसे काँग्रेस नेते राहुल गांधी आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्याबरोबर घडत आहे. त्यामुळेच राहुल गांधी त्यांचा मोठा ‘भाऊ’ आणि डीएमके प्रमुख एमके स्टॅलिन यांच्यासाठी म्हैसूर पाकची मिठाई खरेदी करताना दिसले. राहुल गांधी यांनी बुलेटप्रूफ गाडीतून उतरून पायीच दुभाजक ओलांडून सिंगनाल्लूरमधील विघ्नेश्वरा स्वीट्स अँड बेक्सला भेट दिली. त्या मिठाईच्या दुकानातून त्यांनी म्हैसूर पाक आणि १ किलो गुलाबजाम खरेदी केले. दुकानातील एका कर्मचाऱ्याने मिठाई कोणासाठी घेताय असे विचारले असता राहुल गांधी यांनी माझा मोठा भाऊ स्टॅलिनसाठी मिठाई घेत असल्याचं सांगितलं. त्याच वेळी काँग्रेसच्या अधिकृत हँडलवरून शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये राहुल दुभाजक ओलांडून म्हैसूर पाक खरेदी करण्यासाठी दुकानात जात असल्याचं पाहायला मिळत आहे. राहुल गांधी दुकान मालक आणि तिथे काम करणाऱ्या कामगारांनाही भेटले. यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी तिथल्या कर्मचाऱ्यांना म्हैसूर पाकच्या विविधतेबद्दल प्रश्न विचारले आणि नंतर काही मिठाईचादेखील आस्वाद घेतला. व्हिडीओच्या शेवटी ते पैसे देऊन मिठाई खरेदी करीत असल्याचे दिसले. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याबरोबर दुकानात काम करणाऱ्या महिलेनंही फोटोही काढले.

निवडणूक प्रचारासाठी तामिळनाडूतील कोईम्बतूरमधील मेगा मतदान रॅलीला संबोधित करण्यासाठी पोहोचलेले राहुल गांधी शुक्रवारी आपल्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून अचानक म्हैसूर पाक खरेदी करण्यासाठी मिठाईच्या दुकानात पोहोचले. कोईम्बतूर, पोल्लाची, इरोड आणि करूर मतदारसंघांतील आघाडीच्या उमेदवारांच्या समर्थनार्थ रॅलीला संबोधित करताना राहुल गांधी यांनी स्टॅलिन यांना मोठा भाऊ म्हटले. काँग्रेसने त्यांचा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर शेअर केला. काँग्रेस नेते राहुल गांधींनी हा व्हिडीओ इंस्टाग्रामवरही टाकला. त्यांच्या कॅप्शनमध्ये राहुल गांधींनी लिहिले की, “तामिळनाडूमधील मोहिमेला गोडवा देत त्यांचा भाऊ स्टॅलिनसाठी म्हैसूर पाक मिठाई विकत घेतली.

हेही वाचाः मैसूर पाक; ‘ही’ एक वस्तू वापरून बनवा परफेक्ट हलवाई स्टाईल जाळीदार मैसूर पाक

स्टॅलिन राहुलबद्दल काय म्हणाले?

तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांनीही राहुल गांधी यांच्या माध्यमातून शेअर केलेल्या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “माझा भाऊ राहुल गांधी यांच्या या सुंदर भेटवस्तूनं मी भावुक अन् प्रभावित झालो आणि भारावून गेलो आहे. इंडिया आघाडी त्यांना ४ जूनला नक्कीच गोड विजय मिळवून देणार आहे, असंही त्यांनी अधोरेखित केले. प्रादेशिक अभिमान आणि राष्ट्रीय अस्मितेला हात घालून काँग्रेस नेते राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना भारतीय संस्कृतीतील विविधतेत एकी असल्याचं कथितपणे दाखवून त्यांच्यावर हल्लाबोल केला. एकच भाषा का असावी? तमीळ, बंगाली, कन्नड आणि मणिपुरी या भाषांना भारतात का स्थान मिळू नये? असं म्हणत राहुल गांधींनी भाजपावर टीकास्त्र डागलं. पश्चिम तामिळनाडूची लढाई सर्व पक्षांसाठी महत्त्वाची मानली जाते, जो भाजपासाठी महत्त्वपूर्ण मतांचा आधार असण्याबरोबरच पारंपरिक AIADMK चा बालेकिल्ला आहे. कोईम्बतूरला दक्षिण भारताचे मँचेस्टर म्हटले जाते. स्टॅलिन यांनी आपल्या भाषणात राहुल गांधी यांना “भारताचे भविष्य आणि आमच्या आशेचा नायक, माझा प्रिय भाऊ…,” असे संबोधले आहे.

हेही वाचाः रसगुल्ल्यानंतर आता म्हैसूर पाकावरुन दक्षिणेतील दोन राज्यं आमनेसामने

कोईम्बतूर लोकसभा जागेवर द्रमुकचे गणपती पी राजकुमार आणि एआयएडीएमकेचे सिंगाई जी रामचंद्रन आणि राज्य भाजपाचे प्रमुख के अन्नामलाई अशी तिरंगी लढत होत आहे. स्टॅलिन म्हणाले की, निवडणुकीचा नायक हा काँग्रेसचा जाहीरनामा होता, सामाजिक न्यायावर लक्ष केंद्रित करणारी अनेक आश्वासने वाचून दाखवली, ज्यात गरीब महिलांसाठी प्रतिवर्षी मदत, केंद्र सरकारच्या नोकऱ्यांमध्ये महिलांसाठी ५० टक्के आरक्षण, NEET मधून सूट, देशव्यापी जात-आधारित जनगणना आणि इतर आश्वासनांसह SC, ST आणि OBC साठी ५० टक्के आरक्षण मर्यादा वाढवण्यासाठी घटनादुरुस्ती करणार असल्याचे नमूद आहे.

कोणीही राजकारणात येऊ शकतो. कुणालाही थेट अधिकृत पद मिळत नाही. निवडणुकीत उभे राहिल्यानंतर लोकांना भेटत राहिले पाहिजे. त्यांच्या कृतीतून चांगले कार्य झाल्यानंतरही माणसाला पद मिळते. पंतप्रधान मोदींनी केवळ आमच्यावर घराणेशाहीचे राजकारण केल्याचा आरोप करून आमचा अपमान केला नाही, तर त्यांनी आम्हाला निवडून दिलेल्या लाखो लोकांचाही अपमान केला आहे,’ असा आरोपही स्टॅलिन यांनी केला.

भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरूनही स्टॅलिन यांनी मोदींवर जोरदार टीका केली. भाजपावाल्यांनी ईडी, आयटी आणि सीबीआय यांसारख्या एजन्सींचा कथितपणे वापर करून विरोधकांना धमकावण्यासाठी आणि निवडणूक प्रक्रियेत फेरफार करण्याचा प्रयत्न चालवला आहे. तसेच भाजपाच्या संबंधित असलेल्या नेत्यांविरुद्ध समान कारवाई होत नसल्याबद्दलही त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. पंतप्रधान मोदीजी तुम्ही भ्रष्टाचारावर बोलू शकता का? तुम्ही ‘मेड इन बीजेपी’ वॉशिंग मशिन उपलब्ध करून देत भ्रष्टाचाराने डागाळलेल्यांना साफ केले. स्टॅलिन यांनी भाजपा सरकारवर नोटाबंदी आणि जीएसटी धोरणांमुळे कोइम्बतूरच्या अर्थव्यवस्थेचे कथित नुकसान केल्याचा आरोप केला. इथल्या ३५ टक्के कापड गिरण्या बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. भाजपाच्या दबावाखाली एक औद्योगिक प्रकल्प कोईम्बतूरहून गुजरातला हलवण्यास भाग पाडले गेले, असा आरोपही त्यांनी केला. तामिळनाडूमधील एका मोठ्या औद्योगिक कंपनीने कोईम्बतूरमधील हजारो लोकांना रोजगार देणारी ६५०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यासाठी राज्य सरकारशी सर्व चर्चेला अंतिम रूप दिल्यानंतर त्या कंपनीला घाबरवण्यात आले आणि औद्योगिक प्रकल्प गुजरातला नेण्यात आला. ही भाजपाची कोईम्बतूरबद्दलची खोटी ओढ आहे. तसेच सेमीकंडक्टर उद्योग प्रकल्प, ज्यामुळे मोठ्या संधी मिळतील, त्याला भाजपाने धमकावून बळजबरीने गुजरातला नेले,” असंही ते म्हणालेत. तामिळनाडूच्या सर्व ३९ जागांसाठी पहिल्या टप्प्यात १९ एप्रिल रोजी मतदान होत आहे. तर ४ जून रोजी निकाल जाहीर होणार आहेत. डीएमके हा काँग्रेसबरोबरच्या विरोधी इंडिया आघाडीचा भाग आहे.