उत्तर प्रदेशातील जौनपूर लोकसभा मतदारसंघात भाजपाचे कृपाशंकर सिंह आणि समाजवादी पक्षाचे बाबू सिंह कुशवाह यांच्यात थेट लढत होणार होती. परंतु, बहुजन समाज पक्षाने (बसप) श्रीकला रेड्डी सिंह यांना उमेदवारी जाहीर केल्याने आता जौनपूरमध्ये तिहेरी लढत रंगणार आहे. श्रीकला रेड्डी सिंह या उत्तर प्रदेशमधील बाहुबली नेते धनंजय सिंह यांच्या पत्नी आहेत. त्यांचे पती धनंजय सिंह सध्या तुरुंगात आहेत. बसपने त्यांना तिकीट का दिले? श्रीकला रेड्डी सिंह नक्की कोण आहेत? यावर एक नजर टाकू या.

कोण आहेत श्रीकला रेड्डी सिंह?

श्रीकला या जौनपूरच्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी आहेत. २०२२ मध्ये त्यांची या पदावर निवड करण्यात आली होती. त्यांचे पती धनंजय सिंह खंडणी आणि अपहरणाच्या प्रकरणात तुरुंगात आहेत. श्रीकला म्हणतात, “माझे पती राजकीय वैमनस्याचे बळी आहेत. निवडणुकीपूर्वी त्यांना ज्या पद्धतीने लक्ष्य करण्यात आले, त्यामुळे त्यांना जौनपूरच्या लोकांचा असणारा पाठिंबा कमी होणार नाही. त्याशिवाय इतर दोन उमेदवार बाहेरचे असल्याने ते निवडून येणार नाहीत. आम्ही जौनपूर आणि आमच्या लोकांसाठी कायम असू.”

श्रीकला या मूळच्या तेलंगणातील आहेत. त्यांचे शालेय शिक्षण चेन्नईमध्ये पूर्ण झाले आणि व्यवसायाने त्या आर्किटेक्ट आहेत. राजकारणात नवीन नसल्याचे त्यांचे सांगणे आहे. श्रीकला म्हणतात, “माझे लोकसभा निवडणुकीत हे पदार्पण असले तरी मी लोकांसाठी फार पूर्वीपासून काम करीत आले आहे. मी माझ्या आईला आणि माझ्या वडिलांना काम करताना पाहिले आहे. माझी आई गावप्रमुख होती; तसेच माझे वडील हुजूरनगर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष आमदार होते. मी माझ्या पतीला रात्रंदिवस मतदारसंघातील लोकांसाठी झटताना पाहिले आहे. तसेच मी तीन वर्षे जिल्हा परिषदेची अध्यक्ष म्हणूनही लोकांसाठी काम केले आहे.” त्या पुढे म्हणाल्या की, उत्तर प्रदेश आणि दक्षिणेतील राजकारण बरेच वेगळे आहे. “उत्तरेमध्ये जातीसह अनेक घटक आहेत; जे विकासकामांमध्ये मोठी भूमिका बजावतात.

जेव्हा त्यांना भाषेच्या अडथळ्यासंदर्भात विचारले गेले, तेव्हा त्या म्हणाल्या, “हिंदी समझ और बोल लेती हूं. तीन साल हो गये. वैसे भी, भाव अगर सही होते हैं, तो लोग भाषा समझ लेते हैं (मला आता हिंदी बोलता येते आणि समजतेसुद्धा. मला निवडून येऊन तीन वर्षे झाली आहेत. त्याशिवाय तुमचा हेतू योग्य असेल, तर लोक तुम्हाला समजून घेतात.)” जौनपूरमध्ये त्यांना पतीची लोकप्रियता, तसेच त्यांचा स्वतःचा राजकीय अनुभव यांच्या आधारावर लोक मते देऊ शकतात.

जौनपूर मतदारसंघावर ठाकूरांचे वर्चस्व

उल्लेखनीय बाब म्हणजे पती धनंजय १५ वर्षांपूर्वी म्हणजे २००९ मध्ये जौनपूरमधून लोकसभा निवडणुकीत बसपाच्या तिकिटावर विजयी झाले होते. तेव्हापासून ही जागा भाजपा आणि बसपने प्रत्येकी एक वेळा जिंकली आहे. २०१४ मध्ये भाजपाचे कृष्ण प्रताप सिंह यांनी बसपच्या सुभाष पांडे यांचा दोन लाखांपेक्षा अधिक मतांनी पराभव केला होता. धनंजय सिंह यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. त्यांचा पराभव झाला असला तरी ६४ हजार मते त्यांच्या खात्यात पडली होती.

हेही वाचा : Prestige fight: आसाममधल्या या लढतीकडे सगळ्यांचे लक्ष

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत बसपचे श्याम सिंह यादव यांनी पाच लाख मतांनी विजय मिळविला होता. बसपने सपासोबत युती केली होती; तर भाजपाचे कृष्ण प्रताप सिंह ४.४० लाख मते मिळवून दुसऱ्या क्रमांकावर होते. मुस्लीमबहुल लोकसंख्या असलेल्या जौनपूरवर आतापर्यंत यादव किंवा ठाकूर यांचे वर्चस्व राहिले आहे. कृपाशंकर सिंह यांच्याप्रमाणे धनंजय सिंह हेदेखील ठाकूर आहेत. त्यामुळे पत्नी श्रीकला रेड्डी इतर दोन उमेदवारांसाठी आव्हान ठरू शकतात.