समाजवादी पक्षाने बदायूमधून अखिलेश यादव यांचे काका शिवपाल यादव यांना उमेदवारी दिली आहे. मात्र, या जागेवरून आता शिवपाल यादव यांचा मुलगा आदित्य निवडणूक लढविणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे या जागेवरून नेमके कोण निवडणूक लढविणार, असा गोंधळाची स्थिती निर्माण करणारा प्रश्न उभा आहे. तसेच समाजवादी पक्षातील उमेदवारांच्या सततच्या फेरबदलामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. त्यावरून आता विविध राजकीय चर्चाही रंगू लागल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मंगळवारी संभल येथे झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात शिवपाल यादव यांचे पुत्र आदित्य यांना बदायूमधून उमेदवारी देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. त्यानंतर शिवपाल यादव यांनी याबाबतचा प्रस्ताव अखिलेश यादव यांच्याकडे पाठविण्यात येईल, असे सांगितले. या संदर्भात बोलताना आदित्य यादव म्हणाले, बदायूमधून मी निवडणूक लढवावी, अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. मात्र, यावेळी त्यांनी हेही स्पष्ट केले, की आम्ही सर्व सध्या शिवपाल यादव यांचा प्रचार करीत आहोत. कारण- ते पक्षाचे अधिकृत उमेदवार आहेत.

हेही वाचा – तोट्यात असणाऱ्या ३३ कंपन्यांकडून ५४२ कोटी रुपयांचे रोखे दान, एकट्या भाजपाला मिळाले तब्बल…

बदायूच्या जागेवरून सुरू असलेल्या या गोंधळाच्या परिस्थितीबाबत शिवपाल यादव यांना विचारले असता, “उमेदवारीबाबत कोणीही मागणी करू शकतो. मात्र, रणनीतीचा एक भाग म्हणून पक्षाच्या नेतृत्वाने यादी जाहीर केली आहे. त्यामुळे या जागेवरून सध्या मीच निवडणूक लढविणार आहे” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

बदायूप्रमाणेच इतर मतदारसंघांतही अशाच प्रकारचा गोंधळ बघायला मिळतो आहे. काही दिवसांपूर्वीच मुरादाबादमधील दोन उमेदवारांनी आपल्याला समाजवादी पक्षाचे तिकीट मिळाल्याचा दावा केला होता. मात्र, निवडणूक आयोगाने रुची वीरा यांची उमेदवारी अंतिम मानली. मुरादाबादच्या जागेसाठी समाजवादी पक्षाचे विद्यमान खासदार एस. टी. हसन यांनीही अर्ज दाखल केला होता.

एवढेच नाही, तर विद्यमान खासदार एस. टी. हसन हे अधिकृत उमेदवार म्हणून घोषित व्हावेत, अशी मागणी करणारे पत्रही अखिलेश यादव यांनी लिहिले होते. मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे पत्र रिटर्निंग ऑफिसरपर्यंत वेळेत पोहोचू शकले नाही. त्यामुळे रुची वीरा यांना अधिकृत उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले.

या संदर्भात द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना, मला उमेदवारी मिळू नये, यासाठी आझम खान यांनी षडयंत्र रचले होते, असा आरोप हसन यांनी केला होता. “मुरादाबामधून मी निवडणूक लढवावी, अशी अखिलेश यादव यांची इच्छा होती. त्यानुसार त्यांनी इतर नामांकने रद्द करण्यासाठी पत्र लिहिले होते. मात्र, हे पत्र योग्य त्या वेळेत अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचू शकले नाही“, असेही ते म्हणाले होते.

हेही वाचा – काँग्रेसला ‘ठोसा’ देत ऑलिम्पिक पदकविजेत्या बॉक्सरचा भाजपाच्या तिकीटावर निवडणुकीच्या ‘रिंग’मध्ये प्रवेश; कारण काय?

एस. टी. हसन हे मुरादाबाद लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार असून, त्यांनी २०१९ मध्ये त्यांनी भाजपाच्या सर्वेश कुमार सिंह यांचा पराभव केला होता. तर, रुची वीरा या समाजवादी पक्षाच्या बिजनौर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार आहेत.

मुरादाबाप्रमाणचे रामपूर मतदारसंघातूनही दोन उमेदवारांनी समाजवादी पक्षाचे तिकीट मिळाल्याचा दावा केला होता. त्यानुसार दोघांनी अर्जही दाखल केले होते. मात्र, अखेर मौलवी मोहिबुल्ला नदवी यांना समाजवादी पक्षाचे उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले आणि आझम खान यांच्या जवळचे मानले जाणाऱ्या असीम राजा यांचा अर्ज बाद ठरविण्यात आला.

त्याशिवाय गौतम बुद्ध नगरच्या जागेवर समाजवादी पक्षाने प्रथम डॉ. महेंद्र नागर यांना उमेदवारी दिली. मात्र, नंतर त्यांची उमेदवारी रद्द करून, राहुल अवाना यांना उमेदवारी देण्यात आली. पण, पुन्हा अवाना यांची उमेदवारी रद्द करून नागर यांना उमेदवारी देण्यात आली. या जागेवर २०१९ मध्ये भाजपाच्या डॉ. महेश शर्मा यांचा विजय झाला होता.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Reshuffle of samajwadi party candidates create confusion among workers spb