पिंपरी महापालिकेचे नवे अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे यांच्या मोटारीला असलेला अंबर दिवा हा सध्या चर्चेचा विषय आहे. क वर्ग दर्जा असलेल्या पिंपरी महापालिकेत आयुक्तांशिवाय अन्य अधिकाऱ्यांना दिव्याची मोटार वापरता येत नाही. त्यामुळेच आतापर्यंतचे अतिरिक्त आयुक्त दिव्याचा वापर करत नव्हते. मात्र, शिंदे यांच्या मोटारीला असलेला दिवा त्यांनी हौसेखातर ठेवला की काय, अशी चर्चा आहे.
केंद्रीय मोटार वाहन कायद्यानुसार वाहनांवर दिवा बसवण्याविषयी स्पष्ट तरतुदी आहेत. शासनाचे काही अधिकारी विनापरवाना मोटारीवर अंबर दिवे लावतात, अशी प्रकरणे उघड होऊ लागल्यानंतर शासनाने विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आदींना याबाबतचे स्पष्ट आदेश दिले आहेत. अलीकडेच ४ जून २०१३ ला शासनाने याबाबतचे परिपत्रक काढले. त्यानुसार, ज्यांना दिवा वापरण्याची परवानगी आहे, अशा अधिकाऱ्यांनीच तो वापरायचा आहे. एखादा अधिकारी परवानगी नसताना दिवा वापरेल, तो तातडीने काढून टाकण्याची कारवाई त्या-त्या पालिका आयुक्तांनी करावी. आपल्या अधिपत्याखाली किती जण दिवे वापरतात, अशा अधिकाऱ्यांची व त्यांच्या वाहनांची माहिती गृह (परिवहन) विभागास कळवावी, असे आदेशात नमूद आहे.
राज्यातील सर्व ‘ब’ आणि ‘क’ वर्ग दर्जा असलेल्या महापालिका आयुक्तांना अंबर दिवा वापरण्याची परवानगी आहे. याशिवाय, अ वर्गातील महापालिकांचे अतिरिक्त आयुक्त, ड वर्ग दर्जा असलेल्या महापालिकांचे आयुक्त तसेच महापालिका-नगरपालिकांची अग्निशमन वाहने तसेच महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालयाच्या सर्व वाहनांना अंबर दिवा वापरण्याची मुभा आहे. पिंपरी पालिका ‘क’ वर्गात मोडत असल्याने या नियमानुसार अतिरिक्त आयुक्तांना अंबर दिवा वापरता येत नाही. मात्र, तानाजी िशदे दिव्याच्या मोटारीत वावरत आहेत. अग्निशमन विभाग अतिरिक्त आयुक्तांच्या अखत्यारित येत असल्याने प्रमुख या नात्याने त्यांच्या मोटारीला अंबर दिवा असल्याचा युक्तिवाद केला जातो. मात्र, अग्निशमन दलाकडून अशाच प्रकारे अंबर दिव्याची मोटार वापरली जाते. त्यामुळे एकाच नावाखाली दोन ठिकाणी अंबर दिव्याची मोटार वापरते येते का, असा मुद्दाही उपस्थित करण्यात येतो. त्याचप्रमाणे, शिंदे मोटारीतून खाली उतरले की दिवा काढून ठेवण्यात येतो, त्याचेही आश्चर्य व्यक्त करण्यात येते.