मोबाइल व ईमेल एसएमएस आणि सोशल नेटवर्किंग साइटवरून त्रास देणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत असून त्रास देणाऱ्यांमध्ये सर्वाधिक व्यक्ती या जवळच्या नातेवाईक, मित्र आणि परिचित असल्याचे तपासात पुढे येते. हे माहिती झाल्यानंतर तक्रारदार व्यक्ती त्या परिचित व्यक्तीविरुद्ध तक्रारी देण्यास तयार होत नाहीत. त्यामुळे सायबर शाखेकडे आलेल्या तक्रारअर्जापैकी फक्त ३३ टक्केच अर्जावर गुन्हे दाखल होत असल्याचे दिसून आले आहे.
शहरात गेल्या काही वर्षांत दाखल होणाऱ्या सायबर गुन्ह्य़ात वाढ होत आहे. सायबर शाखेकडे साधारण वर्षांला सहाशे तक्रारअर्ज येतात. मात्र, त्यापैकी दोनशेच गुन्हे दाखल केले जातात. एखाद्याने तक्रारअर्ज दिल्यानंतर त्याचा तपास केला जातो. तक्रारदाराचा नातेवाईक, मित्र किंवा परिचित संशयित असल्याचे दिसून येते. त्यामुळे नंतर तक्रार दाखल केली जात नाही, असे सायबर शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. संजय शिंदे यांनी सांगितले.
मोबाइल एसएमएस पाठवून तुम्ही अमुक कंपनीची विमा पॉलिसी घ्या. भरलेल्या पॉलिसीवर ९० टक्के कर्ज मिळेल, असे सांगून नागरिकांची फसवणूक केल्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे नागरिकांनी अशा एसएमएस आले तर त्याला बळी पडू नये. फसवणूक करणारे काही मोबाइल क्रमांक मिळाले आहेत. टेलिकॉम रेग्युलेटरी अॅथॉरिटी मार्फत त्यांच्यावर कारवाई करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे शिंदे यांनी नमूद केले.
‘वॉट्स अप’ हे गुन्ह्य़ांचे नवे माध्यम
सध्या एक हजार सोशल नेटवर्किंग साइट आहेत. मात्र, अलिकडेच आलेल्या वॉट्स अप वरून गुन्हे केल्याची दोन प्रकरणे सायबर सेलकडे आली आहेत. वॉट्स अप वर संवेदनशील माहिती टाकल्याची ही प्रकरणे असून त्याचा तपास सुरू आहे, असे पोलीस उपायुक्त डॉ. संजय शिंदे यांनी सांगितले.