कात्रज घाटातील जुन्या बोगद्यापासून पुढे काही अंतरावर अचानक एसटी बसने पेट घेतला. या दुर्घटनेत एसटी बस संपूर्ण जळाली असून बसमधील ५७ प्रवाशांना त्वरित उतरविण्यात आल्यामुळे अनर्थ टळला. बुधवारी दुपारी ही दुर्घटना घडली.
स्वारगेट ते गुंजवणी या मार्गावरील एसटी बस दुपारी कात्रज घाटातून साताऱ्याच्या दिशेने निघाली होती. बोगदा ओलांडल्यानंतर अचानक एसटी बसच्या चालकाच्या केबीनमधून धूर येऊ लागला. प्रसंगावधान राखत बसमधील प्रवाशांना चालक आणि वाहकाने उतरवले आणि बस रिकामी करण्यात आली. काही मिनिटांत बसने पेट घेतला आणि संपूर्ण बस जळाली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. पाण्याचा मारा करुन आग आटोक्यात आणली.
अग्निशमन दलाचे तांडेल भाऊ शिंदे, रामदास शिंदे, महादेव तांगडे, किरण पाटील, नीलेश लोणकर, गणपत भंडारी यांनी पाण्याचा मारा करुन आग आटोक्यात आणली. बोगद्यात आग लागली असती तर मोठी दुर्घटना घडली असते, अशी माहिती अग्निशमन दलाच्या जवानांनी दिली. दरम्यान, एसटी बसला आग लागण्याचे कारण समजू शकले नाही. सुदैवाने बसमधील इंधनाच्या टाकीला आगीची झळ बसली नाही.