पुण्यातील लोकसभा लढतीची तयारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सुरू केली असून पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी बैठक घेऊन ‘पुण्यात आपल्याला सोन्यासारखी संधी आहे. प्रामाणिकपणे काम करा. पुण्यात मनसेचाच खासदार होणार,’ असा विश्वास गुरुवारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना दिला.
मनसेचे पुण्यातील नगरसेवक आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची व्यापक बैठक गुरुवारी बोलावण्यात आली होती. आगामी लोकसभा निवडणूक, नगरसेवकांची कामगिरी, पक्षाची संघटनात्मक बांधणी तसेच आगामी कार्यक्रम या मुद्यांवर ठाकरे यांनी बैठकीत मार्गदर्शन केले. पुण्यातून आपल्याला आपल्या पक्षाचा उमेदवार लोकसभेत निवडून आणायचा आहे. त्यासाठी चांगले काम करा. प्रामाणिकपणे काम करा. पुण्यात पक्षाला सोन्यासारखी संधी आहे. उमेदवार मीच ठरवीन आणि पुण्यातून मनसेचाच खासदार होईल, असे ठाकरे यांनी या वेळी सांगितले.
नगरसेवकांच्या कामगिरीबाबत काहीसे असमाधान व्यक्त करून, ज्या वेळी आठ नगरसेवक होते, त्या वेळी जो आवाज पुण्यात होता तसा आता अठ्ठावीस नगरसेवक झाल्यानंतर दिसत नाही. तो आवाज कुठे गेला अशी विचारणा या वेळी ठाकरे यांनी केली. लोकांनी आणि पक्षाने जो विश्वास तुमच्यावर टाकला आहे तो सार्थ करा. पुणेकरांसाठी आंदोलने करा आणि पक्षाला कमीपणा येईल असे काम करू नका, असेही आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.
ज्याला पक्षाची ध्येय-धोरणे मान्य नाहीत त्याला पक्षाचे दरवाजे खुले आहेत. पण कोणी चुकीचे वागणार असेल, तर मला त्याची हकालपट्टी करावी लागेल, असेही ठाकरे यांनी या वेळी सांगितले. त्याबरोबरच, वाईट मार्गाने पैसे कमावलेले चालणार नाहीत. चांगल्या मार्गाने पैसे कमवा, असेही राज यांनी उपस्थितांना बजावले. महापालिकेत पक्षाची बैठक जेव्हा बोलावली जाते, तेव्हा नगरसेवकांची उपस्थिती शंभर टक्के असली पाहिजे. त्या बैठकीत पक्षाची म्हणून जी भूमिका ठरेल तीच भूमिका सर्वानी सभागृहात घेतली पाहिजे, असेही ते म्हणाले.
दीपक पायगुडे अनुपस्थित
पक्षाचे प्रदेश सरचिटणीस दीपक पायगुडे पक्षकार्यात सक्रिय झाले असून गेल्या महिन्यात त्यांची आणि राज यांची चर्चा झाली होती. तेव्हापासून पायगुडे यांच्या नावाची चर्चा लोकसभेचे उमेदवार म्हणून सुरू झाली होती. दोनच दिवसांपूर्वी त्यांनी रास्ता पेठेतील कार्यालय नूतनीकरणाच्या निमित्ताने पूजेचा कार्यक्रम आयोजित केला होता. या वेळी त्यांचे कार्यकर्ते आणि समर्थक मोठय़ा संख्यने उपस्थित होते. या पाश्र्वभूमीवर गुरुवारी झालेल्या पक्षाच्या बैठकीत मात्र ते अनुपस्थित होते.