राजर्षी शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या भूमीतील मी रहिवासी आणि खासदार आहे. या समाजसुधारकांचे विचार माझ्यात रुजले असल्याने मी अजून वाया गेलो नाही. वाया गेलो असे वाटेल त्यावेळी मी निवडणूक लढविणार नाही, असे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी केले.  क्रांतिज्योती पुणे संस्थेतर्फे राजू शेट्टी व ज्येष्ठ समाजवादी विचारवंत भाई वैद्य यांच्या हस्ते महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कोशाध्यक्षा सुनीताराजे पवार आणि शहर पोलीस दलाच्या गुन्हे शाखेतील कर्मचारी गणेश जगताप यांना पुणे भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष उमेश चव्हाण, अभिनेते सिद्धेश्वर झाडबुके, भारिप-बहुजन संघाच्या प्रदेशाध्यक्षा वैशाली चांदणे, कलादिग्दर्शक संतोष संखद आदी या वेळी उपस्थित होते. उद्योजक श्रीरत्न चांदणे, अ‍ॅड. दीपक म्हस्के, अजय डोंगरे यांना पुणे कृतज्ञता सन्मानाने गौरविण्यात आले.

भाई वैद्य म्हणाले, महिला पुढे जात असल्याने पुरुषांचा अहंकार दुखावत आहे. त्यामुळे पुरुषांकडून स्त्रियांना त्रास दिला जात आहे, पण त्या चवताळल्यास पुरुषांची काही खैर नाही. या वेळी सुनीताराजे पवार व गणेश जगताप यांनी आपले मनोगत व्यक्त केले.