News Flash

अन्नसुरक्षा कायद्यामुळे काम करण्याची प्रवृत्ती उद्ध्वस्त होऊ नये – शरद पवार

अन्नसुरक्षा महत्त्वाची असली तरी त्यामुळे काम करण्याची प्रवृत्ती उद्ध्वस्त होणार नाही हे पाहावे. अन्नधान्य पिकविणारा शेतकरी प्रथम जगवा. त्याच्या मालाला योग्य किंमत मिळाली नाही, तर

| August 12, 2013 03:00 am

अन्नसुरक्षा कायद्यासाठी संसदेमध्ये मांडण्यात येणाऱ्या विधेयकाला माझा विरोध नाही. मात्र, त्याबाबत चिंता वाटते. अन्नसुरक्षा महत्त्वाची असली तरी त्यामुळे काम करण्याची प्रवृत्ती उद्ध्वस्त होणार नाही हे पाहावे. अन्नधान्य पिकविणारा शेतकरी प्रथम जगवा. त्याच्या मालाला योग्य किंमत मिळाली नाही, तर उत्पादनावर परिणाम होईल व असे कायदे राबविता येणार नाहीत, अशी भीती व्यक्त करीत केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी रविवारी केंद्राच्या धोरणावर अप्रत्यक्षपणे ताशेरे ओढले.
महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्या वार्षिक अधिवेशनात ते बोलत होते. पवार म्हणाले, गोरगरिबांच्या भुकेचा प्रश्न सोडविण्याची नैतिक जबाबदारी सत्ताधाऱ्यांची असतेच. त्याबरोबरच अन्नधान्य निर्माण करणारा शेतकरी जगला पाहिजे. तो नाउमेद झाला, तर धान्याच्या उत्पादनावर परिणाम होईल. फूड व अ‍ॅग्रिकल्चर ऑर्गनायझेशनच्या अहवालात देशातील ७४ टक्के मुलांना पूर्ण अन्न मिळत नसल्याचे म्हटले आहे. पूर्ण अन्नामध्ये धान्यासह भाजीपाला, फळे, दूध, अंडी, मांस आदी असते. ही शोभादायक बाब नाही. त्यासाठी अन्नसुरक्षा महत्त्वाची असली, तरी लोकांची काम करण्याची प्रवृत्त उद्ध्वस्त होऊ नये. शेतीच्या कामांना महत्त्व दिले पाहिजे. त्यासाठी हंगामाच्या कालावधीत रोजगार हमीची कामे थांबविली पाहिजेत.
कमाल जमीन धारणा कायद्याबाबत ते म्हणाले, केंद्राच्या वतीने जमीन सुधारणाविषयक कायद्याचा मसुदा मांडण्यात आला असला, तरी जमीन धारणेची कमाल मर्यादा (सीलिंग) कमी होणार नाही. त्याउलट दोन हेक्टरखालील शेतकरी कुटुंबांना वर कसे नेता येईल, याचे प्रयत्न आहेत. काही विचारवंतांनी सीिलगचा हा विचार मांडला आहे. तो आमच्यासारखे ‘अडाणी’ लोक कधीच मान्य करणार नाहीत.
‘कोणत्याही शेतीमालाला निर्यात बंदी नाही’
कोणत्याही शेतीमालाला निर्यात बंदी करणार नसल्याचे स्पष्ट धोरण घेण्यात आले आहे, अशी माहिती केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी दिली. ते म्हणाले, कांद्याच्या भावावर संसदेत चर्चा झाली तेव्हा कांद्याची निर्यात बंद करण्याची मागणी झाली. मी त्याला विरोध केला. कांद्यामुळे लोकांच्या डोळ्यात पाणी आल्याचे मत काहींनी मांडले. मात्र कांद्याचे भाव पडल्यानंतर शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी येत नाही का, असा प्रश्न मी केला. विदर्भासारख्या भागातील शेतकऱ्याला आत्महत्येपासून परावृत्त करायचे असेल, तर शेतकऱ्यांवरील बंधने काढली पाहिजेत. त्यांच्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 12, 2013 3:00 am

Web Title: sharad pawar speech about food security bill
Next Stories
1 लोकसंख्येचे शक्ती आणि संपत्तीमध्ये रुपांतर करण्यासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण हाच पाया – शरद पवार
2 स्वाईन फ्लूचे शहरात ३३ बळी
3 शिल्पकार खेडकर यांना ‘पद्म’ पुरस्कार मिळाल्यास राज्याचा गौरव-शिवाजीराव अढळराव पाटील
Just Now!
X