साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक न घेता ज्येष्ठ साहित्यिकाची निवड करण्यात यावी, यासंबंधीचा लेखी अभिप्राय पाठविण्याच्या अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या आवाहनाला अत्यल्प प्रतिसाद लाभला आहे. या संदर्भात राज्यभरातील साहित्यिक आणि साहित्य संस्थांना मिळून शंभर पत्रे पाठविण्यात आली असून, आतापर्यंत केवळ चार लेखकांनी आपले लेखी मत महामंडळाकडे कळविले आहे.
साहित्य संमेलनाध्यक्षपदासाठी निवडणूक हा पारंपरिक मार्ग सध्या अवलंबला जात आहे. मात्र, या पद्धतीमुळे ज्येष्ठ साहित्यिकांना हा बहुमान मिळू शकलेला नाही. संमेलनाध्यक्ष हे सन्मानाचे पद असून ते सन्मानानेच प्रदान केले जावे अशी भूमिका मांडली जाते. त्यामुळे छत्तीसगढ येथे साहित्य महामंडळाच्या वर्धापनदिन कार्यक्रमात संमेलनाध्यक्षपदी निवडणूक घेण्याऐवजी नियुक्ती करावी का याविषयीची प्राथमिक चर्चा झाली होती. आता महामंडळाची शनिवारी (३१ मे) महाराष्ट्र साहित्य परिषद येथे बैठक होत असून, त्यामध्ये केवळ अध्यक्षाची नियुक्ती करणे या विषयावर चर्चा होणार आहे.
महामंडळाने एक महिन्यापूर्वी प्रा. द. मा. मिरासदार, डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, डॉ. द. भि. कुलकर्णी, राजेंद्र बनहट्टी, डॉ. आनंद यादव, उत्तम कांबळे या माजी संमेलनाध्यक्षांसह प्रा. फ. मुं. शिंदे या विद्यमान संमेलनाध्यक्षांना अभिप्राय पाठविण्यासाठी पत्र पाठविले आहे. त्याचप्रमाणे भारत सासणे, शंकर सारडा, भानू काळे, किशोर सानप, डॉ. अनिल अवचट, मंगला आठलेकर, बाबा भांड, डॉ. रावसाहेब कसबे, आसावरी काकडे, अंजली कुलकर्णी, रमेश इंगळे-उत्रादकर, प्राचार्य रा. रं. बोराडे, किशोर पाठक, अशोक पवार, स्वाती कर्वे, डॉ. अश्विनी धोंगडे, सदानंद देशमुख, लक्ष्मीकांत देशमुख, प्रवीण दवणे, डॉ. अरुणा ढेरे, डॉ. न. म. जोशी, अरुण जाखडे, मंगला गोडबोले, नीलिमा गुंडी, सिसिलिया काव्र्हालो, सुधीर गाडगीळ, डॉ. मंदा खांडगे, मोनिका गजेंद्रगडकर यांना १० दिवसांपूर्वी पत्र पाठविण्यात आले आहे. त्यापैकी डॉ. न. म. जोशी, आसावरी काकडे, नीलिमा गुंडी आणि स्वाती कर्वे यांनी लेखी अभिप्राय कळविला आहे. अन्य काही साहित्यिकांची मते येण्याची शक्यता आहे. त्यामुळे शनिवारच्या बैठकीमध्ये केवळ चर्चाच होणार असल्याचे वैद्य यांनी सांगितले.