प्रत्येक गुन्ह्य़ाचा तपास हा लागतच असतो. त्याप्रमाणे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाचा तपास लागणारच आहे, तपास पूर्ण होताच त्याची माहिती दिली जाईल, असे राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी रविवारी सांगितले. या गुन्ह्य़ाच्या तपासाचा वरिष्ठ स्तरावर आढावा घेतला जात आहे. या गुन्ह्य़ाचा तपास हे एक आव्हान असून पोलीस अहोरात्र प्रयत्न करत आहेत. त्यामध्ये यश लवकरच मिळेल, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.
सातव्या अखिल भारतीय पोलीस नेमबाज क्रीडा स्पर्धांचा समारोप पाटील यांच्या उपस्थितीत पुण्यात झाला, या वेळी ते बोलत होते. नेमबाजी स्पर्धेत पदक विजेत्या खेळाडूंना पाटील यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. या प्रसंगी पोलीस महासंचालक संजीव दयाळ, आयबीचे सहसंचालक मलय सिन्हा, पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ, प्रशासन विभागाचे सहसंचालक प्रकाश पवार, पुण्याचे सह पोलीस आयुक्त संजीव सिंघल, क्रीडापटू गगन नारंग, पवन सिंग, अंजली भागवत, तेजस्विनी सावंत, राही सरनोबत आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
‘पोलिसांच्या बदल्यांबाबत लवकरच निर्णय’
पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत पाटील म्हणाले, की पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांसंदर्भात राज्यात ‘ट्रान्सफर अॅक्ट’ आणि ‘पोलीस अॅक्ट’ असे दोन कायदे आहेत. त्यातील एका कायद्यानुसार पोलीस अधिकाऱ्यांची दोन वर्षांत, तर दुसऱ्या कायद्यानुसार तीन वर्षांनंतर बदली केली जाते. पण, दोन वर्षांनंतर बदल्या केल्यानंतर काही आयपीएस अधिकारी मॅट आणि न्यायालयात गेले आहेत. त्यामुळे या कायद्यात बदल करण्यासाठी आठ मंत्र्यांची उपसमिती नेमण्यात आली होती. या समितीने बदल्यासंदर्भातील नियमांचा अहवाल तयार करून दहा दिवसांपूर्वीच मंत्रिमंडळाकडे सादर केला आहे. आता लवकरच मंत्रिमंडळात बदल्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल. पुण्यातील सीसीटीव्हीबाबत पाटील यांनी सांगितले की, पुण्यातील सीसीटीव्हीची निवादा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. हे काम करण्यास उशीर झाला आहे, मात्र कोणतेही काम करताना सर्व नियमानुसार झाले पाहिजे, अशी अधिकाऱ्यांची भावना झाली आहे.