पुणे : राष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेची (एफटीआयआय) माजी विद्यार्थिनी पायल कपाडियाच्या ‘ऑल वी इमॅजिन ॲज लाइट’ या चित्रपटाने जगप्रसिद्ध कान महोत्सवात ‘ग्रां प्री’ पुरस्कार पटकावला आहे. विद्यार्थिदशेत व्यवस्थेविरुद्ध आंदोलन ते प्रतिष्ठित पुरस्कारविजेती आणि प्रतिष्ठित पुरस्कार मिळाल्यावर ज्या व्यवस्थेविरुद्ध आंदोलन केले, त्यांच्याकडूनच प्रशंसा, असा पायलचा प्रवास लक्षवेधी ठरला आहे.

पायलला मिळालेला हा पुरस्कार चित्रपट क्षेत्रात जागतिक स्तरावर प्रतिष्ठेचा समजला जातो. यंदाच्या महोत्सवात या पुरस्कारासाठी चुरस होती. त्यात फ्रान्सिस फोर्ड कपोला यांच्यासारख्या मान्यवर दिग्दर्शकांचाही समावेश होता. त्यामुळे पायलला मिळालेल्या पुरस्काराचे महत्त्व मोठे आहे.
अर्थात, पायलला पुरस्कार मिळाल्यानंतर ‘एफटीआयआय’मध्ये दहा वर्षांपूर्वी झालेल्या आंदोलनाच्या स्मृतीही आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ऑस्कर पुरस्कारप्राप्त ध्वनिआरेखक आणि संस्थेचे माजी विद्यार्थी रेसुल पुकुट्टी यांच्या ‘फेसबुक’वरील पोस्टमुळे ताज्या झाल्या. केंद्र सरकारने २०१५ मध्ये अभिनेते गजेंद्र चौहान यांची ‘एफटीआयआय’च्या अध्यक्षपदी नियुक्ती केली होती. या नियुक्तीवरून संस्थेतील विद्यार्थ्यांनी सरकारविरोधात तीन महिन्यांहून अधिक काळ आंदोलन केले होते. त्यात पायल कपाडियाचा सहभाग होता. यात तिच्यावर गुन्हाही दाखल झाला होता. मात्र, आता मिळालेल्या पुरस्कारानंतर ‘एफटीआयआय’ ज्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अखत्यारित येते, त्यांनीच प्रसिद्धिपत्रक प्रकाशित करून पायलला पुरस्कार मिळाल्याची माहिती दिली आहे. त्यातच पायलच्या चित्रपटाला भारत-फ्रान्स करारांतर्गत निधी मिळाल्याचे नमूद केले आहे. तसेच, ‘एफटीआयआय’नेही संस्थेच्या एक्स खात्यावरून पायलचे अभिनंदन केले आहे.

हेही वाचा – दहावीचा निकाल जाहीर, गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी १.९८ टक्के निकाल वाढला

यापूर्वी पायलला दोन वेळा कान महोत्सवात संधी मिळाली होती. २०१८ मध्ये पायलचा ‘आफ्टरनून क्लाउड’ हा लघुपट ‘एफटीआयआय’नेच कान महोत्सवाला पाठवला होता. त्या लघुपटाची स्पर्धात्मक विभागात निवड झाली होती. त्यानंतर आता पायलच्या चित्रपटाला कान महोत्सवात सर्वांत प्रतिष्ठेचा ‘ग्रां प्री’ पुरस्कार मिळाला आहे. त्याशिवाय २०२१ मध्ये पायलचा ‘अ नाइट नोइंग नथिंग’ हा माहितीपट कान महोत्सवात गोल्डन आय पुरस्कारविजेता ठरला होता. विशेष म्हणजे, हा माहितीपट आंदोलनाच्या काळातील पार्श्वभूमीवर बेतलेला होता.

हेही वाचा – पोर्श कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे नमुने कचऱ्यात फेकले; पोलीस आयुक्तांची धक्कादायक माहिती

‘एफटीआयआय’चा कानमध्ये दबदबा

यंदाचा कान महोत्सव ‘एफटीआयआय’च्या माजी विद्यार्थ्यांनी गाजवला आहे. पायलच्या चित्रपटाला मिळालेल्या पुरस्कारासह चिदानंद नाईक या विद्यार्थ्याच्या लघुपटाला पहिले पारितोषिक मिळाले. त्याशिवाय पायलचाच तत्कालीन सहाध्यायी मैसम अली याचा ‘इन रिट्रीट’ हा चित्रपट महोत्सवात दाखवला गेला. तर ज्येष्ठ छायालेखक आणि एफटीआयआयचेच माजी विद्यार्थी संतोष सिवन यांना त्यांच्या चित्रपट क्षेत्रातील योगदानासाठी महोत्सवात सन्मानित करण्यात आले.