पुणे : उन्हाच्या झळांचा केळी पिकाला मोठा फटका बसत आहे. केळीची पाने होरपळत असून, सिंचनाची पुरेशी सोय नसलेल्या ठिकाणी खोड कमकुवत होत आहेत. त्यामुळे प्रामुख्याने जळगाव आणि सोलापुरात सुमारे १५ हजार हेक्टरवरील केळीच्या बागांचे नुकसान झाले आहे.

मागील काही दिवसांपासून तापमान ४० अंशांवर गेले आहे. तापमान वाढल्यामुळे सोलापूर जिल्ह्यात केळींची पाने होरपळत आहेत. पाने आणि खोडांमधून वेगाने बाष्पीभवन होऊन खोड कमकुवत होत आहे. घडाच्या ओझ्यांमुळे केळीची खोडे मोडून पडत आहेत. उजनी धरणातील पाणी कमी झाल्यामुळे धरणाच्या पाणलोटातील केळीच्या बागांना पाणी कमी पडत आहे. सिंचनासाठी पाणी कमी असलेल्या ठिकाणी नुकसानीचे प्रमाण जास्त आहे. सोलापुरात केळीचे क्षेत्र सरासरी १६ ते २० हजार हेक्टर आहे. त्यापैकी सुमारे पाच हजार हेक्टरला फटका बसला आहे, अशी माहिती करमाळयाचे कृषी अधिकारी संजय वाकडे यांनी दिली. वाशिंबे येथील प्रयोगशील शेतकरी अभिजित पाटील यांनी केळीचे नुकसान होत असल्याचे सांगितले आहे.

हेही वाचा >>> मुंबईत पुन्हा उष्णतेच्या झळा; राज्याच्या अन्य भागांत पावसाची शक्यता

केळीचे आगार असलेल्या जळगावात यापेक्षा वेगळी स्थिती नाही. जिल्ह्यात सध्या सुमारे ४० हजार हेक्टरवर केळीचे पीक आहे. उत्तर महाराष्ट्रात उन्हाचा जोर आहे. तापमान ४३ अंशांवर गेले आहे. वाढलेल्या उन्हामुळे केळीची खोडे मोडून पडण्याचा धोका वाढला आहे. कमकुवत झालेली खोडे वाऱ्याच्या एका झुळकेसमोरही टिकाव धरू शकत नाहीत. त्यामुळे सुमारे दहा हजार हेक्टरवरील केळीच्या बागांचे नुकसान झाले आहे, अशी माहिती केळी उत्पादक योगेश उभाळे (पिंपळगाव हरेश्वर, ता. पाचोळा) यांनी दिली.

नुकसानीची माहिती संकलित..

 जळगावमध्ये उन्हाच्या झळा आणि पाणीटंचाईमुळे नुकसान झालेल्या केळींच्या बागांची माहिती संकलित केली जात आहे. दोन दिवसांत नुकसानीचा निश्चित आकडा समजेल, अशी माहिती जळगावचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुरबान तडवी यांनी दिली.

उन्हाच्या झळांमुळे केळीची पाने आणि खोडांतून मोठया प्रमाणावर बाष्पीभवन होत आहे. पाने होरपळून गेल्यामुळे ऊन थेट खोडांवर पडत आहे. त्यामुळे खोड कमकुवत होऊन घडाच्या ओझ्यामुळे मोडून पडत आहे. सिंचनाची सोय असलेल्या ठिकाणीही केळीची वाढ मंदावली आहे. उत्पादनात मोठी घट येत आहे. – बाळासाहेब शिंदे, निवृत्त जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सोलापूर