पुणे : मुंबईसह कोकण किनारपट्टीला पुन्हा उष्णतेच्या झळा आणि असह्य उकाडयाचा सामना करावा लागणार आहे. अरबी समुद्रावरून आद्र्रतायुक्त उष्ण वारे किनारपट्टीवर येत असल्यामुळे गुरुवार, २५ एप्रिलपर्यंत किनारपट्टीवर उकाडा जाणवण्याचा अंदाज आहे. राज्याच्या अन्य भागात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अरबी समुद्रावरून मोठया प्रमाणावर बाष्पयुक्त उष्ण वारे किनारपट्टीवर येत आहे. त्यामुळे पुढील चार दिवस किनारपट्टीवर उकाडा जाणवणार आहे. तापमानात फारशी वाढ होणार नसली तरीही आद्र्रता वाढल्यामुळे असह्य उकाडयाचा सामना करावा लागण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्यपी म्हणाले, पश्चिमी थंड वाऱ्यांमुळे उत्तर भारतातील तापमानात घट झाली आहे. त्यामुळे गुजरातला लागून असलेल्या उत्तर कोकणात तापमानात काहीशी घट होईल. मुंबईपासून दक्षिणेकडे किनारपट्टीवर तापमान वाढ कमी होईल, पण बाष्पयुक्त वाऱ्यामुळे उकाडा वाढेल. 

हेही वाचा >>> आरटीई अंतर्गत बदलांमुळे विद्यार्थ्यांच्या चौथी, सातवीनंतरच्या शिक्षणाचे काय होणार?

वाशिममध्ये सर्वाधिक ४३.६ अंश तापमान

विदर्भात रविवारी पारा सरासरी ४० अंशांवर होता. वाशिममध्ये राज्यातील सर्वाधिक ४३.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राला रविवारी उकाडयापासून काहीसा दिलासा मिळाला. कमाल तापमानात एक ते दीड अंशांनी घट होऊन सरासरी कमाल तापमान ३९ अंशांवर आले होते. किनारपट्टीवर सरासरी तापमान ३३ अंशांवर राहिले. मुंबईत ३२.२ तर डहाणूत ३४.९ अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे.

राज्यात चार दिवस पाऊस :

राज्याच्या अन्य भागात पुढील चार दिवस वादळी वाऱ्यासह मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. मराठवाडयात तुरळक प्रमाणात गारपीट होऊ शकते, असेही हवामान विभागाने म्हटले आहे.