उल्हास पवार (काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, महाराष्ट्र राष्ट्रभाषा प्रसार समितीचे अध्यक्ष)

Ambedkarist activists active in support of Mavia Discuss the danger of changing the constitution
‘मविआ’च्या समर्थनार्थ आंबेडकरवादी कार्यकर्ते सक्रिय; राज्यघटना बदलली जाण्याच्या धोक्याची चर्चा
gondia bhandara lok sabha constituency, bjp, ajit pawar ncp, office bearers, reconciliation, booth karyakartas confused, lok sabha 2024, election 2024, polling booth, mahayuti, politics news, marathi news, bhandara gondia news,
तुझं माझं जमेना, तुझ्या वाचून… गोंदिया-भंडारात भाजप–राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांचे मनोमिलन, बूथ कार्यकर्ते मात्र संभ्रमात
Arvind kejriwal private secretary Bibhav Kumar
केजरीवालांची सावली म्हणून ओळखले जाणारे बिभव कुमार नेमके कोण?
shashikant shinde
निष्ठा बदलली नाही म्हणून होणाऱ्या परिणामांना भीत नाही; शशिकांत शिंदे यांचा कणखर बाणा

वाङ्मयीन विचार हेच प्रगल्भ ज्ञानाचे द्वार आहे. माणसाच्या जीवनात भेडसावणाऱ्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला वाचन संस्कृतीतून मिळतात. भागवत धर्मातील विविध ग्रंथांपासून ते महात्मा गांधी, विनोबा भावे, साने गुरुजींपर्यंत अनेकांनी आपल्या विचारांतून वैश्विक मानवतेचा संदेश दिला. आजच्या काळात अपुऱ्या वाचनावरच अनेकांच्या जीवनात अतिरंजीत अस्मिता जाग्या होतात. परंतु लहानपणी घरामध्ये असलेले संतसाहित्याचे वातावरण आणि राष्ट्र सेवादलाचे संस्कार यामुळे मी साहित्यातील किंबहुना संतवाङ्मयातील व्यापकतेमध्ये असलेल्या वैश्विक मानवतेचा शोध घेऊ शकलो. राजकारणातील प्रवासातही वाचनाने दिलेले संस्कार कधीही न विसरता नानाविध अनुभवांनी ज्ञानसमृद्ध होत वाटचाल करीत गेलो.

आमच्या घरामध्ये माझ्या वडिलांना (शिवरामपंत) वाचनाची आवड होती. बाबुराव अर्नाळकर यांची पुस्तके, संगीत नाटक, गद्य नाटकांची नानाविध पुस्तके ते वाचत. आईचे (शांताबाई) शालेय शिक्षण कमी झाल्याने तिने प्रौढ शाळेत शिक्षण घेतले आणि लोकवाङ्मयाचे वाचन करण्याची तिला गोडी लागली. तिचे पाठांतर जबरदस्त होते. त्यामुळे आमच्या घरी लक्ष्मी रस्त्यावरील ग. ल. ठोकळ प्रकाशनाची अनेक पुस्तके होती. याशिवाय घरामध्ये मी हरिपाठ, अभंग, कीर्तने लहानपणापासून ऐकत असल्याने मला संतवाङ्मयाविषयी उत्सुकता निर्माण होऊ लागली. त्यावेळी ग. ह. पाटील यांच्या कविता आमच्या तोंडपाठ असत. त्यामुळे वाचन, चिंतन, मनन आणि पाठांतर असा साहित्य समजून घेण्याचा मार्ग मी अवलंबिण्याची सुरुवात केली. नाना पेठेतील चर्च ऑफ स्कॉटलंड मिशन येथे मराठी माध्यमात बेनेइस्त्राईल स्कूलमध्ये माझे प्राथमिक शिक्षण झाले. त्यावेळी इयत्ता चौथीपर्यंत आम्हाला ह. स. गोखले, दत्तात्रय घाटे उर्फ दत्तकवी यांच्या कविता होत्या. त्यामुळे शाळेच्या स्नेहसंमेलनात आम्ही कविता पाठ करून त्यावर नृत्याचे कार्यक्रम सादर करीत असू. त्यानंतर माध्यमिक शिक्षणाकरिता मी राजा धनराज गिरीजी हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला. तेथे वा. भा. पाठक, आचार्य अत्रे यांच्या कविता मी म्हणायचो. साने गुरुजींच्या कथा, श्यामची आई, बालकवींच्या कविता, बा. सी. मर्ढेकर, कवी यशवंत, राम गणेश गडकरी, अच्युतराव कोल्हटकर यांचे साहित्य मी शाळा आणि महाविद्यालयीन जीवनात वाचले.

शालेय जीवनापासून राष्ट्र सेवादलाचा कार्यकर्ता असल्याने महात्मा गांधींबद्दल मी ऐकत होतो. त्यामुळे पुढे व्हिनस प्रकाशन, साधना प्रकाशनासारख्या अग्रगण्य साहित्य संस्थांच्या सहकार्याने ते साहित्य वाचण्याची संधी मला मिळाली. स्वामी विवेकानंदांपासून आचार्य अत्रेंचे आत्मचरित्र आणि वि. द. घाटे यांची पुस्तके मला आवडत होती. तर, संत तुकाराम गाथेपासून सर्व संतवाङ्मय माझ्या बुकशेल्फमध्ये आहे. साने गुरुजी यांचे ‘भारतीय संस्कृती’ हे पुस्तक मला फार आवडले. अक्षरश: त्या पुस्तकाची मी पारायणे केली असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. राष्ट्र सेवादलामुळे महात्मा गांधीजींचा माझ्यावर फार मोठा प्रभाव होता. त्यामुळे पं. जवाहरलाल नेहरू यांनी इंदिरा गांधी यांना लिहिलेल्या पत्रांचे ‘लेटर्स टू इंदिरा’ या पुस्तकाचा ‘इंदिरेस पत्र’ हा मराठी अनुवाद मला आवडला. वाचनसंस्कृती बळकट असल्याने त्यावेळी जे परिसंवाद आणि वादविवाद होत असत, त्यात अभ्यास, चिंतन आणि वैचारिक संघर्षांची प्रतिमा दिसत असे. त्यामुळे विचार संघर्षांच्या ईर्षेने आणि विचार सौंदर्य वाढविण्याकरिता वाचन करणाऱ्या अनेक मंडळींशी माझा संबंध येत होता. बाळासाहेब भारदे, दा. न. शिखरे, ताराबाई साठे, आचार्य काकासाहेब कालेलकर यांचे साहित्य म्हणजे मराठी साहित्याला लाभलेली अप्रतिम देणगी होती. तसेच ह. ना. आपटे यांची ‘पण लक्षात कोण घेतो’ ही कादंबरी आणि यशवंतराव चव्हाण यांच्या ‘कृष्णाकाठ’ या आत्मचरित्राचे खंड मी आजही जपून ठेवले आहेत. तब्बल ७० वर्षांपूर्वी मामा वरेरकर यांनी हुंडा प्रथेवर भाष्य करताना लिहिलेल्या ‘हाच मुलाचा बाप’ या नाटकाने मी भारावून गेलो होतो. त्यामुळे एखाद्या लेखकाचे विचार समजून घेण्यासाठी आपण सातत्याने वाचायला हवे, असे मी मनाशी पक्के केले.

मराठी जशी माझी मातृभाषा आहे तशी िहदी ही राष्ट्रभाषा. त्यामुळे िहदी हीदेखील माझ्या तितकीच जवळची भाषा. भाषावार प्रांतरचना केवळ भांडणे करण्याकरिता नाही, तर एकमेकांच्या भाषेतील चांगल्या गोष्टींची देवाणघेवाण आणि आदर करण्याकरिता असावी, असे मला नेहमी वाटते. जी. ए. कुलकर्णी, वा. सी. बेंद्रे यांनी केलेले लेखनही मी वाचले आहे. याशिवाय िहदी साहित्यातील डॉ. रामकुमार वर्मा यांच्या ‘औरंगजेब की आखरी रात’, मुन्शी प्रेमचंद यांचे ‘गोदान’, ‘गोधुळी’ तसेच सुमित्रानंदन प्रेम, मत्रीशरण गुप्त यांची अनेक पुस्तके मी वाचली आहेत. नाथमाधवांपासून ते गो. नी. दांडेकर यांच्यापर्यंत विविध लेखकांच्या ऐतिहासिक कादंबऱ्या मला आवडतात. उत्तम वाचनामुळेच आपण चांगले बोलू शकतो, याचा प्रत्यय मला अनेक ठिकाणी आला. त्यामुळेच मी माझ्या संपूर्ण आयुष्यात वाचन आणि पुस्तकांची कास कधीही सोडली नाही.

राजकारणामध्ये आल्यानंतर अनेक मंत्री आणि राजकीय व्यक्तींशी लोकाशी संबंध येत होते. राजकारणी मंडळी आपल्या स्विय सहाय्यकाकडून भाषण लिहून घेतात, असे आपल्याला दुरून वाटते. परंतु हा समज खोडून काढत वाचनसंस्कृती जपणारी अनेक दिग्गज मंडळी महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणात सक्रिय आहेत. शशवंतराव चव्हाण यांच्या कऱ्हाड या जन्मगावापासून दिल्लीतील घरात पुस्तकांनी कपाटे भरलेली असल्याचा अनुभव मी प्रत्यक्ष घेतला आहे. एकदा विठ्ठलराव गाडगीळ आणि मी त्यांना भेटायला दिल्ली येथे गेलो असताना त्यांनी जर्मन नटाचे आत्मचरित्र गाडगीळ यांना दिले आणि म्हणाले, हे उत्तम पुस्तक आहे नक्की वाच. त्यावेळी एक मोठय़ा पदावरची राजकारणी व्यक्ती वेळात वेळ काढून वाचन करते हा आदर्श माझ्यासह प्रत्येकाने घ्यायला हवा, असे मला वाटले. साहित्य, कला, संस्कृतीवर प्रेम करणारे अनेक नेते आजही महाराष्ट्रात आहेत. त्यांच्यामध्ये सुधाकरराव नाईक, शरद पवार, विलासराव देशमुख यांचा समावेश आहे.

राजकारणासह संतसाहित्याचा माझा वाचनप्रवास पाहता अनेक प्रकाशन संस्थांकडून मला विविध प्रकारची पुस्तके भेट मिळाली. ‘नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी..’ यामध्येच संतांनी श्रवणभक्ती आणि वाचनाचे महत्त्व सांगितले आहे. श्रवणभक्तीचे धडे वारकरी संप्रदाय आणि संतसाहित्यातून मिळाले असल्याने त्याचा उपयोग मला संपूर्ण आयुष्यात झाला. बाळासाहेब भारदे नेहमी म्हणत, शब्दार्थापेक्षा अन्वयार्थ आणि गर्भाथाला जास्त महत्त्व द्यायला हवे. त्यामुळे विचार, विवेक, वैराग्य आणि वैभव या गोष्टींतून एकत्रितपणे मांडणाऱ्या संतवाङ्मयात व्यापकता दिसून येते. पुस्तकांप्रमाणेच मासिके, पाक्षिके, साप्ताहिके यांची फार मोठी चळवळ आज नाहीशी होत आहे. किलरेस्कर, स्त्री, मनोहर, माणूस, नवयुग, अमृत, नवरंग या मासिकांतून अक्षर मेजवानीच वाचकाला मिळत असे. ती चळवळ पूर्वीप्रमाणे पुन्हा एकदा जिवंत व्हायला हवी, असे मला वाटते. व्यंकटेश माडगूळकर, शंकर पाटील, सुरेश भट आणि द. मा. मिरासदार यांचे साहित्य मला आवडते. तर शांता शेळके यांच्या कवितांनी मी भारावून जात असे. आळंदी येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा कार्याध्यक्ष या नात्याने तीन दिवस साहित्यिकांचा सहवास मला लाभला. शब्द व भाषा हे संस्कृतीचे उगमस्थान आहे. त्यामुळे हे वाचनभान नसेल, तर माणूस विकारी होऊ शकतो. त्याकरिता प्रत्येकाने श्रवणासोबतच भरभरून वाचन करायला हवे.