राज्यात एकीकडे पुन्हा एकदा करोना संकट डोकं वर काढत असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाउनसाठी पुढील आठ दिवसांचा अल्टीमेटम दिली आहे. रुग्णसंख्या नियंत्रणात राहावी यासाठी राज्य सरकार अनेक कठोर पावलं उचलताना दिसत आहे. दुसरीकडे पुण्यात कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या मुलाचा विवाहसोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. या सोहळ्यात हजाराहून अधिक नागरिक सहभागी झाले आणि नियमांचं सर्रासपणे उल्लंघन करण्यात आलं. विशेष म्हणजे या लग्नासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासह अनेक नेत्यांनी हजेरी लावली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यात करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी राज्यातील जनतेशी संवाद साधत येत्या आठ ते दहा दिवसांत परिस्थिती पाहून लॉकडाउनचा निर्णय घेतला जाईल, असं सांगितलं. त्यापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात जिल्ह्यातील करोनाबाधित रुग्ण परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. त्यामध्ये सोमवारपासून रात्री ११ ते सकाळी ६ पर्यंत संचारबंदी आणि 28 तारखेपर्यंत शाळा महाविद्यालय बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. तर लग्नसोहळा २०० लोकांमध्ये आणि सर्व नियम पाळून करण्याचे आवाहन केलं होतं.

मात्र त्याच दरम्यान कोल्हापूर येथील माजी खासदार धनंजय महाडिक यांचे चिरंजीव पृथ्वीराज आणि वैष्णवी यांचा विवाहसोहळा हडपसर येथील लक्ष्मी लॉन्स येथे मोठ्या थाटामाटात पार पडला. या सोहळ्यास शरद पवार, शिवसेना खासदार संजय राऊत, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार धैर्यशील माने, खासदार वंदना चव्हाण यांच्यासह उद्योगपती, क्रिडा क्षेत्रासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली होती.

विवाहसोहळ्यात २०० हून अधिक नागरिक सहभागी झाले होते, तर बहुतांश नागरिकांनी मास्क देखील घातलं नव्हतं. तसंच सोशल डिस्टंन्सिंगचा फज्जा उडाल्याचं पाहण्यास मिळालं. त्यामुळे या लग्न सोहोळ्याच्या निमित्ताने सर्वसामान्य नागरिकांना एक न्याय आणि राजकीय नेत्यांना वेगळा न्याय अशी चर्चा शहरात सुरु असून कारवाई होणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Coronavirus guildelines not followed in kolhapur mp dhananjay mahadik son marriage svk 88 sgy
Show comments