पिंपरी-चिंचवड महापालिकेत १७ वर्षांपूर्वी समाविष्ट झालेल्या गावांमध्ये अपेक्षित विकास झाला नसल्याचा कांगावा त्या गावांमध्ये सुरू असताना नव्याने २० गावांचा समावेश करण्याच्या प्रस्तावावरून बऱ्याच नाटय़मय घडामोडी झाल्या. तीव्र विरोधाची दखल घेऊन माजी उपमुख्यमंत्री व येथील कारभारी अजित पवार यांनी पूर्वीच्या भूमिकेत बदल करत हिंजवडी, गहुंजेसह मोजक्याच गावांचा विचार करण्याच्या सूचना त्यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांना केल्या आहेत. त्यानुसार, सभेत सुधारित प्रस्ताव मांडण्यात येणार आहे.
देहू, आळंदी, चाकण, हिंजवडी, विठ्ठलनगर, म्हाळुंगे, निघोजे, मोई, कुरूळी, नाणेकरवाडी, खराबवाडी, कडाची वाडी, चिंबळी, केळगाव, खालुंबरे, गहुंजे, माण, मारूंजी, नेरे, जांबे ही गावे पालिकेत समाविष्ट करण्याचा प्रस्ताव गेल्या काही महिन्यांपासून पालिका सभेत मंजुरीसाठी आहे. मात्र, कोणत्याही निर्णयाविना तो सातत्याने तहकूब ठेवण्यात येत आहे. अजितदादांच्या सूचनेनुसार हा प्रस्ताव मांडण्यात आला होता. तथापि, संबंधित गावांमधील राष्ट्रवादीच्याच स्थानिक पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थांनी तीव्र विरोध केल्याने कोणताही निर्णय घेण्याचे व सक्तीचे पाऊल उचलणे अजितदादांनी टाळले होते. सत्तांतर झाल्याने नव्या सरकारची भूमिकाही महत्त्वाची असताना अजितदादांनी पूर्वीच्या भूमिकेत बदल केला आणि यापूर्वी जाहीर केलेली २० गावे महापालिकेत आणण्याऐवजी आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम असलेले गहुंजे आणि ‘आयटी हब’मुळे जगाच्या नकाशावर आलेले हिंजवडी या महत्त्वाच्या गावांसह लगतची गावे महापालिकेत समाविष्ट करण्याच्या सूचना अजितदादांनी केल्या आहेत. याबाबतचे सुधारित विषयपत्र सभेत मांडण्यात येणार आहे.