पुणे : मोसमी वाऱ्याच्या प्रगतीला पोषक वातावरण असून, येत्या २४ तासांत मोसमी वारे केरळमध्ये दाखल होतील, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

मोसमी वाऱ्याचा वेग काहीसा मंदावला होता. रविवारपासून (२६ मे) मोसमी वाऱ्यांनी फारशी प्रगती केलेली नव्हती. आता मोसमी वाऱ्यांच्या प्रगतीला पोषक वातावरण तयार होत असून, आता मोसमी वारे हळूहळू आगेकूच करीत आहेत. येत्या २४ तासांत मोसमी वारे केरळमध्ये दाखल होतील, असे हवामान विभागाने म्हटले आहे. येत्या २४ तासांत केरळसह दक्षिण अरबी समुद्र, मालदिवचा उर्वरित भाग, लक्षद्वीपचा उर्वरित भाग, ईशान्य आणि आग्नेय बंगालच्या उपसागरात नैऋत्य मोसमी वारे आगेकूच करतील, असेही हवामान विभागाने म्हटले आहे.

हेही वाचा – परदेशात नोकरी देण्याचे अमिष दाखवून तरुणाला अडीच लाखाना गंडा

हेही वाचा – मुंबई : नालेसफाईतील हलगर्जीप्रकरणी कंत्राटदारांवर कारवाई, एकूण ५४ लाख ६८ हजार रुपयांची दंड आकारणी

हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्यपी म्हणाले, की रेमल चक्रीवादळामुळे बंगालच्या उपसागरावरील बाष्प बांगलादेश आणि पश्चिम बंगालच्या दिशेने फेकले गेले आहे. त्यामुळे मोसमी वाऱ्याची बंगाल शाखेची आगेकूच काहीशी मंदावली होती. मस्करीन बेटांवरून येणाऱ्या नैऋत्य मोसमी वाऱ्याचा वेगही काहीसा कमी झाला होता. त्याचा परिणाम म्हणून मोसमी वाऱ्याची आगेकूच मंदावली होती. पुन्हा पोषक स्थिती तयार होत आहे. त्यामुळे मोसमी वारे केरळमध्ये वेळेत दाखल होतील आणि पुढील वाटचालही नियोजित वेळेनुसार होईल.