पुणे : राज्‍यात शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) गैरप्रकारात एकूण ९ हजार ५३७ उमेदवारांचा समावेश आहे. मात्र, त्यातील काही उमेदवारांची पवित्र संकेतस्थळाद्वारे शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये शिक्षक म्‍हणून निवड झाली आहे. निवड झालेल्‍या उमेदवारांना नियमानुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्रासंदर्भात कार्यवाही करण्याबाबतच पत्र महाराष्ट्र राज्‍य परीक्षा परिषदेने पोलीस आयुक्‍तांकडे केली आहे. त्यामुळे गैरप्रकार केलेल्या उमेदवारांना शिक्षक भरतीमध्ये संधी मिळणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे.

टीईटी २०१८ आणि २०१९ मध्ये गैरप्रकार झाल्‍याचे उघडकीस आले होते. टीईटी २०१९ मधील गैरप्रकारामध्ये ७ हजार ८७४ उमेदवार, तर २०१८ मधील गैरप्रकारामध्ये १६६३ उमेदवार असे एकूण ९ हजार ५३७ उमेदवारांचा समावेश होता. या सर्व परीक्षार्थ्यांची परीक्षेतील संपादणूक रद्द करण्यात आली आहे. त्‍यांना या पुढील टीईटी परीक्षांना प्रतिबंधित करण्यात आले आहे. या प्रकरणी सायबर पोलीसांत गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा…राज्यात आठ दिवस पावसाचा मुक्काम; मोसमी वाऱ्यांबाबतही गुड न्यूज

या पार्श्वभूमीवर गैरप्रकारात सहभागी असलेले काही उमेदवार

राज्यातील शिक्षक भरती प्रक्रियेत न्‍यायालयाच्‍या आदेशान्‍वये स्‍व-प्रमाणपत्र भरुन सहभागी झाले आहेत. त्‍यापैकी काही उमेदवारांची या भरती प्रक्रियेत शिक्षक म्‍हणून निवड झाली आहे. टीईटी गैरप्रकाराप्रकरणी गैरमार्ग अवलंबलेल्या उमेदवारांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. तसेच दाखल केलेल्‍या गुन्‍ह्यामधील चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित उमेदवारांना चारित्र्य पडताळणीचा अहवाल देण्यात येऊ नये, असे परिषदेने पोलिसांना कळविले होते. मात्र, चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र देण्याचा अधिकार हा पोलिसांचा आहे. त्‍यामुळे टीईटी गैरप्रकारातील ९ हजार ५३७ उमेदवारांची यादी राज्यातील पोलीस ठाण्यांना जिल्हा कार्यालयामार्फत उपलब्ध करून द्यावी. टीईटी गैरप्रकारातील दाखल गुन्ह्यामध्ये समाविष्ट असलेल्या संबंधित उमेदवारांची वस्‍तुस्थिती पाहून नियमानुसार आपल्‍या स्‍तरावर चारित्र्य पडताळणीची कार्यवाही करावी, असेही राज्‍य परीक्षा परिषदेने पोलीस आयुक्‍तांना दिलेल्‍या पत्रात नमूद करण्यात आले आहे.