पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवून शिवसेनेच्या तीन नगरसेविकांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. तथापि, महिन्यानंतरही याबाबतीत कोणतीच हालचाल वा  चर्चा नसल्याने त्या कारवाईचे पुढे काय, असा मुद्दा राजकीय वर्तुळात उपस्थित करण्यात येत आहे.
मावळ लोकसभेच्या रिंगणातील शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या विरोधात शेकापचे उमेदवार आमदार लक्ष्मण जगताप यांचा प्रचार केल्याचा ठपका ठेवून उपनेते शशिकांत सुतार यांनी सेनेच्या नगरसेविका शारदा बाबर, सीमा सावळे व आशा शेडगे यांची पक्षातून हकालपट्टी केली. तत्कालीन परिस्थितीत संभाव्य सर्व शक्यतांचा विचार करून घाई न करता मतदानाच्या आदल्या दिवशी ही कारवाई करण्यात आली. तथापि, ही कारवाई अन्यायकारक असल्याचे सांगत आपण पक्षविरोधी काम केले नसल्याचा युक्तिवाद या नगरसेविकांनी केला होता. कारवाई झालेल्या दिवसापासून आजपर्यंत या विषयावर दोन्ही बाजूने उघडपणे कोणीही भाष्य केलेले नाही. शिवसेनेकडून विभागीय आयुक्त कार्यालयाकडे तक्रार केली नसल्याचे तसेच विभागीय आयुक्तांकडूनही कारवाईसंदर्भातील माहिती पालिकेकडे आली नसल्याचे सांगण्यात येते. तथापि, यासंदर्भात, सुतार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, त्यांनी दूरध्वनीला प्रतिसाद दिला नाही. नगरसचिव कार्यालयात चौकशी केली असता, आजही त्या नगरसेविकांचे स्थान शिवसेनेच्या म्हणूनच आहे. पक्षाकडून विभागीय आयुक्तांना कारवाईसंदर्भात अधिकृतपणे कळवल्यास पुढील कार्यवाही होऊ शकेल. मात्र, त्यांच्या नगरसेवकपदाला धक्का लागणार नाही, असे सांगण्यात आले.