पुण्यात पोर्श कार बेदरकारपणे चालवून अल्पवयीन चालकाने एका दुचाकीला धडक होती. या घटनेत दोघांचा मृत्यू झाला होता. तसेच या घटनेनंतर पोलिसांनी आरोपी वाचवण्याचा प्रयत्न केला, असा आरोप देखील करण्यात आला. याचे तीव्र पडसाद उमटत असताना आता याप्रकरणी पोलिसांकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे.

एनएनआयने दिलेल्या वृत्तानुसार याप्रकरणी दोन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. येरवडा पोलीस
ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल जगदाळे आणि सहायक पोलीस निरीक्षक विश्वनाथ तोडकरी अशी पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. ही घटना घडल्यानंतर दोघांनी या घटनेची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला दिली नाही, असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशावरून ही कारवाई करण्यात आली आहे.

रविवारी ( १९ मे रोजी ) पहाटे आलिशान पोर्श कार बेदरकारपणे चालवून अल्पवयीन चालकाने एका दुचाकीला धडक होती. या अपघातात दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्टा या दोघांचा मृत्यू झाला होता.

दरम्यान, आज सकाळी पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या घटनेसंदर्भात पोलिसांनी आत्तापर्यंत काय तपास केला, यासंदर्भात सविस्तर माहिती दिली होती. तसेच हा अपघात घडल्यानंतर पोर्श या गाडीतील ड्रायव्हर बदलण्याचा प्रयत्न करण्यात आला. अल्पवयीन मुलाच्या वडिलांनी त्यांचा मुलगा गाडी चालवत नव्हता हे दाखवण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती चौकशीत समोर आल्याचंही पुणे पोलीस आयुक्तांनी सांगितलं होतं.

हेही वाचा – ‘दोन एफआयआर का, गाडीत किती लोक होते, आरोपीला पिझ्झा दिला का?’; पोर्श कार अपघात प्रकरणात पोलीस आयुक्तांची महत्वाची माहिती

“आलिशान पोर्श कार बेदरकारपणे चालवल्यानंतर घडलेल्या अपघाताच्या घटनेत दोघांचा मृत्यू झाला. यानंतर १७ वर्षीय अल्पवयीन तरुणाऐवजी गाडीचा ड्रायव्हर बदलण्याचा प्रयत्न केला गेला. जेणेकरून अल्पवयीन तरुण अडचणीत येऊ नये, त्यासाठी हा प्रकार केला गेला असावा. सुरूवातीला ड्रायव्हर गाडी चालवत असल्याचं त्यानं सांगितलं होतं. मात्र, आम्ही आता या घटनेचा तपास करत असून ड्रायव्हरने कोणाच्या दबावाखाली हे वक्तव्य केलं, याचाही शोध घेणार आहोत”, असं पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले होते.

पुढे बोलताना त्यांनी पोलीस ठाण्यात आरोपीला पिझा खायला दिला, या आरोपावरही प्रतिक्रिया दिली. “आरोपीच्या पालकाने अल्पवयीन मुलाला गाडी चालवण्यास दिली, याचाही तपास सुरू असून या प्रकरणात कारवाई करण्यास दिरंगाई झाली किंवा कोणी मॅनेज झाले असा काही आरोप होत आहे. मात्र, आम्ही यावर सांगतो की, अशा प्रकारच्या घटनांमध्ये कायद्याच्या मार्गावर पोलीस चालत आहेत. यामध्ये दिरंगाई झाली किंवा कोणी मॅनेज झालं असं म्हणणं योग्य नाही. आता सुरुवातीला ३०४ कलम का लावण्यात आलं नाही, तसेच आरोपीला पिझ्झा खाण्यासाठी दिला का? याबाबत चौकशी सुरू आहे”, असं ते म्हणाले.