पुण्यातील कोंढवा परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास इमारतीची सीमा भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 15 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेत मृत्यू पावलेले बिहार येथील आहेत. या ठिकाणी थांबलेले मजूर हे काम नसल्याने घरीच होते. त्यांना पुन्हा त्यांच्या गावीदेखील जायचे होते. मात्र, त्यांना मागील काही महिन्यापासून पैसे मिळाले नव्हते. जर त्या सर्वाना वेळेवर पैसे मिळाले असते. तर गावाकडे गेले जाऊन शेतामध्ये काम केले असते. कारण पावसाळ्याच्या दिवसात काही दिवस बांधकाम बंद ठेवले जाते. अशी धक्कादायक माहिती या घटनेत मृत्यू झालेले अवधूत सिंग यांचे नातेवाईक नारायण सिंग यांनी दिली. नारायण सिंग हे चाकण येथे कामाला असून घटनेची माहिती मिळाल्यानंतर ससून येथील शवागारात आले होते. त्यावेळी त्यांनी ही धक्कादायक माहिती दिली.

यावेळी नारायण सिंग म्हणाले की, ”अवधूत सिंग हे मागील दीड महिन्यापासून पुण्यात एकटेच राहत होते. आज मध्यरात्री ही दुर्दैवी घटनेत त्यांचा मृत्यू झाला. जर ठेकेदारकडून पैसे मिळाले असते, तर त्यांच्यासह सर्व जण पावसाळ्यात काही दिवस गावाकडे जाणार होते.” हे सांगताना त्यांचा कंठ दाटून आला होता. दरम्यान, या प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी देखील त्यांनी केली.

याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच या घटनेबद्दल आपल्याला अतीव दुःख झाले आहे असेही त्यांनी म्हटले आहे. कोंढवा भागात भिंत कोसळून १५ जणांचा मृत्यू झाला ही अत्यंत क्लेशदायक घटना आहे. या सगळ्यांच्या दुःखात मी सहभागी आहे असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

Story img Loader