Porsche Accident Pune Updates: पुण्यातल्या कल्याणी नगरमध्ये पोर्शे कारने दोघांना चिरडलं. ही कार साडेसतरा वर्षांचा अल्पवयीन मुलगा चालवत होता. या कारने ज्या दोघांना चिरडलं त्यांची नावं अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्टा अशी आहेत. कारने चिरडल्याने या दोघांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणात अल्पवयीन मुलाच्या वडिलांना अटक करण्यात आली आहे. मात्र अश्विनीचा मृतदेह पाहून तिच्या आईने रुग्णालयात अक्षरशः हंबरडा फोडला. कारण अश्विनीने तिच्या वडिलांच्या वाढदिवसानिमित्त सरप्राईज द्यायचं ठरवलं होतं. पण त्याआधीच तिचा अपघातात अंत झाला.

नेमकं प्रकरण काय आहे?

पुण्यातील कल्याणी नगर जंक्शन भागात रविवारी पहाटे नंबरप्लेट नसलेल्या पोर्श कारने मोटरसायकलला धडक दिली होती. या अपघातात दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी आता पुणे पोलिसांकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी अल्पवयीन आरोपीच्या वडिलांना छत्रपती संभाजीनगरमधून अटक केली आहे.

पोलिसांनी काय माहिती दिली आहे?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर मुलगा हा पुण्यातील प्रतिष्ठित बांधकाम व्यावसायिकाचा मुलगा आहे. तो दारुच्या नशेत कार चालवत होता आणि त्याने दोघांना उडवलं ज्यात त्या दोघांचा मृत्यू झाला. त्याच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. तसंच त्याला जामीनही देण्यात आला आहे. अशात एक महत्त्वाची माहिती समोर येते आहे. पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितलं की या प्रकरणातला आरोपी अल्पवयीन आहे. या प्रकरणात ज्या अश्विनी कोस्टाचा मृत्यू झाला तिचा मृतदेह ससून रुग्णालयात आणण्यात आला. तो मृतदेह पाहून तिच्या आईने आक्रोश केला.

हे पण वाचा- पुणे : नोंदणीविनाच ‘पोर्शे’ रस्त्यावर, अपघातग्रस्त मोटारीबाबत आरटीओकडून धक्कादायक माहिती समोर

काय घडलं ससून रुग्णालयात?

अश्विनी आणि अनिश या दोघांचे मृतदेह ससून रुग्णालयात आणण्यात आले. तसंच त्यांच्या नातेवाईकांना मृतदेह ताब्यात घेण्यासाठी बोलवण्यात आलं. अश्विनीचा मृतदेह पाहून तिच्या आईने टाहो फोडला. कारण अश्विनी वडिलांचा वाढदिवस असल्याने जबलपूरला येणार होती. तिच्या वडिलांना ती सरप्राईज देणार होती. १८ जूनला तिने जबलपूरला येण्याचं नक्की केलं होतं आणि वडिलांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी सरप्राईज पार्टीही ठरवली होती. मात्र त्याआधीच तिचा अपघातात अंत झाला. एका श्रीमंत बापाच्या मुलाने केलेल्या चुकीमुळे आम्ही आमची मुलगी गमावली. एखाद्या हुल्लडबाजाची शिक्षा आमच्या मुलीला झाली अशी प्रतिक्रिया अश्विनीच्या आईने दिली आहे.

अश्विनी कोस्टा मूळची जबलपूरची

अश्विनी कोस्टा मुळची जबलपूरची आहे. पुण्यातल्या वाडिया महाविद्यालयात तिने शिक्षण घेतलं. अश्विनी आणि अनिश जॉन्सन कंट्रोल कंपनीत काम करत होते. या दोघांची चांगली मैत्रीही झाली होती. त्यामुळे ते पार्टीसाठी वगैरे जात असत. पुण्यातली ही पार्टी मात्र त्यांची शेवटची पार्टी ठरली. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिलं आहे.

पोर्शे कारची नोंदणीच नाही

अपघातातील पोर्शे कार विनानोंदणी रस्त्यावर असल्याची माहिती समोर आली आहे. वेदांत जी कार चालवत होता त्या कारची नोंदणी झालेली नव्हती आणि तरीही वेदांत ती कार चालवत होता. अल्पवयीन मुलाने चालविलेली कार विनाक्रमांक व विनानोंदणी होती. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर म्हणाले, अपघातग्रस्त कार मुंबई डीलरने रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण न करताच दिली आहे. या अपघातात पोर्शे कारचा स्पीड १७० किमी प्रतितास असल्याची माहिती समोर आली आहे.