पुण्यात गेल्या पाच-सहा दिवसांपासून पावसाला सुरूवात झाली खरी, पण त्याला जोर नसल्याने सरासरीच्या तुलनेत प्रत्यक्षात पडलेल्या पावसाची तूट अजूनही कायमच आहे. विशेष म्हणजे जून महिन्यात सरासरीच्या दीडपटीपेक्षा जास्त पाऊस पडल्यानंतरही आज ही स्थिती आहे. पुढील आठवडाभरातही पुण्यात हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
राज्याच्या इतर भागाप्रमाणे पुण्यातही पावसाने जूनच्या अखेरीस आणि जुलै महिन्यात दडी मारली होती. त्यानंतर त्याने गेल्या पाच-सहा दिवसांत पुण्यात हजेरी लावली. मात्र, हलकाच पाऊस पडत असल्याने आधीची तूट भरून काढण्यासाठी त्याचा विशेष उपयोग झाला नाही. त्यामुळे आजही पुणे शहरात पावसाची २४ मिलिमीटरची तूट आहे. १ जून ते २४ जुलै या काळात पुण्यात सरासरी २७३.८ मिलिमीटर इतका पाऊस पडतो. प्रत्यक्षात मात्र केवळ २४९.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. लोहगाव येथे २३५.८ मिलिमीटर, तर पाषाण येथे ३२१.८ मिलिमीटर पाऊस नोंदवला गेला आहे.
जून महिन्यात पुण्यात मोठा पाऊस पडला होता. या महिन्याची सरासरी १३७.७ मिलिमीटर आहे, त्या तुलनेत तेथे २११.२ मिलिमीटर पाऊस पडला. त्यानंतर जुलै महिन्यात त्याचे प्रमाण कमी झाले. या महिन्यात २४ तारखेपर्यंत पावसाची सरासरी १३६.१ मिलिमीटर इतकी आहे. प्रत्यक्षात पडलेल्या पावसाचा आकडा केवळ ३८.६ मिलिमीटर आहे. पुढच्या आठवडय़ाभरात दमदार पाऊस पडला तरच ही तूट भरून निघण्याची शक्यता आहे, असे पुणे वेधशाळेकडून सांगण्यात आले.

आठवडाभर हलक्या सरींची शक्यता
पुण्यात काही दिवसांपासून पाऊस सुरू झाला आहे. शुक्रवारी दिवसभरात पुण्यात २ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. शनिवारनंतर (२५ जुलै) महाराष्ट्रासह देशाच्या दक्षिण भागात पावसाचा जोर वाढेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र, पुण्याच्या परिसरात ३० तारखेपर्यंत हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल, असाच अंदाज देण्यात आला आहे.

पुण्यात पडलेला पाऊस (आकडे मिलिमीटरमध्ये) :
सरासरी        प्रत्यक्ष पाऊस        तूट / अधिक्य
जून                १३७.७        २११.२            अधिक ७३.५
जुलै (१ ते २४)        १८४.०        ३८.६                उणे १४५.४
एकूण            २७३.८        २४९.८            उणे २४