लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांना केंद्रात महत्त्वाचे स्थान मिळवून देण्याची भाषा राष्ट्रवादी काँग्रेसने पुन्हा सुरू केली असून ‘साहेबांचे’ दिल्ली दरबारी वजन वाढावे तर अजितदादांनी राज्यात मुख्यमंत्रिपदी विराजमान व्हावे, अशी इच्छा नवे जलसंपदामंत्री शशिकांत शिंदे यांनी चिंचवड येथे व्यक्त केली. मंत्रिपदामुळे जबाबदारी वाढल्याचे सांगतानाच जिल्ह्य़ात ‘परिवर्तन’ घडवण्यासाठी आपली तयारी आहे, असे सूचक विधानही त्यांनी केले.
सातारा जिल्हा मंडळाच्या वतीने आमदार लक्ष्मण जगताप व महापौर मोहिनी लांडे यांच्या हस्ते सिक्कीम राज्यपालपदी नियुक्ती झालेल्या श्रीनिवास पाटील तसेच जलसंपदामंत्री शिंदेंचा सपत्नीक सत्कार झाला. चिंचवड नाटय़गृहातील कार्यक्रमास राजू मिसाळ, रजनी पाटील, अश्विनी जगताप, वैशाली शिंदे, सुनील जाधव आदींसह तुडुंब गर्दी होती.
शिंदे म्हणाले, महाराष्ट्राकडे दिल्लीचे नेतृत्व का येऊ नये. महाराष्ट्राने ते स्वप्न पाहायचेच नाही का, एकेक खासदार महत्त्वाचा असून यावेळी १५-१६ खासदार निवडून आणू. पिंपरी-चिंचवडशी संबंधित दोन जागा गेल्या, त्या परत मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करू. राष्ट्रवादीची ताकद नाही, अशी टीका किती दिवस ऐकायची. आपली ताकद दाखवून देऊ. एकजुटीने उभे राहू, कोणतीही अडचण येणार नाही. सामान्य घरातील कार्यकर्त्यांला साहेब व दादांनी आमदार केले, मंत्री केले. त्यांचा विश्वास सार्थ ठरवू. साहेब गोड बोलून तर दादा रेटून काम करतात. त्या दोघांचा आदर्श ठेवून आपली मिश्र कार्यपध्दती राबवू. पिंपरीचा विकास दादांमुळे झाला. विकासाचा दृष्टिकोन असलेल्या अजितदादांनी मुख्यमंत्री व्हावे, असे ते म्हणाले. श्रीनिवास पाटलांनी खुमासदार भाषणात पिंपरीत प्रशासकीय सेवेतील गतस्मृतींना उजाळा दिला. झामाबाई बारणे, शकुंतला साठे, मंगला कदम यांच्या कामाचे कौतुक केले. लक्ष्मण जगताप सातारचे जावई असल्याचे सांगत महमंद पानसरे, हनुमंत भोसले, विलास लांडे, आझम पानसरे, संजोग वाघेरे अशी एकेक नावे घेत त्यांची वैशिष्टय़े नमूद केली.
‘फॉर्मही मीच भरले अन सह्य़ा देखील ठोकल्या’
आपल्या काळातील ‘पोरंसोरं’ आता नेतमंडळी झाली आहेत, असे सांगत श्रीनिवास पाटील यांनी भन्नाट उदाहरणे दिली. त्या पोरांचे उमेदवारी अर्ज मीच भरायचो आणि त्यांच्या सह्य़ा देखील मीच ठोकायचो. आपल्या खांद्यावर बसूनच त्यांनी दुनिया बघितली. एका उपमहापौराला महापौराचा कोट घालायची तीव्र इच्छा होती. त्याला सांगितले, तू रविवारी ये, तुला कोट घालतो. तुझा भांगही पाडतो आणि महापौरांच्या खुर्चीत बसवून तुझा ‘झ्ॉक’ फोटोही काढतो. हे ऐकून सभागृहात हास्यकल्लोळ झाला.