राज्यातील समाजकार्य महाविद्यालयांमधील साधारण पंधराशे शिक्षक गेले सहा महिने वेतनापासून वंचित असून महाविद्यालयांना समाजकल्याण विभागाकडून अनुदानच मिळत नसल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे.
राज्यात समाजकार्य अभ्यासक्रम चालवण्याचे शिक्षण देणारी ५५ महाविद्यालये आहेत. त्यामध्ये साधारण पंधराशेहून अधिक शिक्षक अध्यापन करत आहेत. या महाविद्यालयांमधील शिक्षकांना आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सप्टेंबर २०१२ पासून पगार देण्यात आलेला नाही. समाजकार्य महाविद्यालये ही समाजकल्याण विभागांतर्गत काम करत असतात. या महाविद्यालयांना समाजकल्याण विभागाकडून वेतन अनुदान देण्यात येते. मात्र, गेले सहा महिने महाविद्यालयांना हे अनुदान न मिळाल्यामुळे शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे पगार होऊ शकलेले नाहीत. यामध्ये तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचारीही आहेत.
सुरुवातीचे दोन महिने अनेक संस्थांनी त्यांच्याकडील फंडातून शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना पगार दिले. मात्र, सलग सहा महिने अनुदानच आले नसल्यामुळे संस्थाही अडचणीत आल्या आहेत. सध्या राज्यातील मोजक्याच संस्था अनुदान नसतानाही शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या पगाराचा खर्च उचलू शकत आहेत. याबाबत समाजकार्य महाविद्यालयातील शिक्षकांच्या प्रतिनिधी अंजली मायदेव यांनी सांगितले, ‘‘समाजकार्य महाविद्यालये ही समाजकल्याण विभागांतर्गत येत असल्यामुळे आम्हाला उच्च शिक्षणातील कोणत्याही योजना राबवायच्या असतील, तर अडचणी येतात. समाजकल्याण महाविद्यालयातील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना
निवृत्तिवेतनही मिळत नाही आणि सध्या तर सहा महिने नियमित वेतनही देण्यात आलेले नाही.’’
समाजकार्य महाविद्यालयांच्या विविध प्रश्नांवर आणि थकीत वेतन तातडीने मिळावे या मागणीसाठी या महाविद्यालयांमधील शिक्षक आणि कर्मचारी समाजकल्याण आयुक्तांच्या कार्यालयासमोर मंगळवारी निदर्शने करणार आहेत.