Premium

पुणे : ‘मिकी आणि मेमसाहेब’ नाटकाची उद्या सुवर्णमहोत्सवपूर्ती

गद्धेपंचविशीत लिहिलेले आणि राज्य नाट्य स्पर्धेत मोहन गोखले यांना अभिनयाचे पारितोषिक मिळवून देणाऱ्या ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकरलिखित ‘मिकी आणि मेमसाहेब’ या नाटकाची सोमवारी (४ डिसेंबर) सुवर्णमहोत्सवपूर्ती होत आहे.

Mickey and Memsaheb
पुणे : ‘मिकी आणि मेमसाहेब’ नाटकाची उद्या सुवर्णमहोत्सवपूर्ती (छायाचित्र – लोकसत्ता टीम)

पुणे : गद्धेपंचविशीत लिहिलेले आणि राज्य नाट्य स्पर्धेत मोहन गोखले यांना अभिनयाचे पारितोषिक मिळवून देणाऱ्या ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकरलिखित ‘मिकी आणि मेमसाहेब’ या नाटकाची सोमवारी (४ डिसेंबर) सुवर्णमहोत्सवपूर्ती होत आहे. रंगभूमीवर अवघे आठ प्रयोग झालेल्या या नाटकाने मला नाट्यलेखनाकडे गंभीरपणे पाहण्याची नवी दृष्टी दिली, अशी भावना आळेकर यांनी व्यक्त केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिशुरंजन, पुणे संस्थेने थिएटर ॲकॅडमीच्या सौजन्याने तेराव्या राज्य नाट्य स्पर्धेत ‘मिकी आणि मेमसाहेब’ या नाटकाचा ४ डिसेंबर १९७३ रोजी भरत नाट्य मंदिर येथे शुभारंभाचा प्रयोग केला होता. ही घटना सोमवारी ५० वर्षे पूर्ण करीत आहे. डाॅ. जब्बार पटेल आणि श्रीधर राजगुरू निर्मितीप्रमुख असलेल्या या नाटकाचे दिग्दर्शन खुद्द सतीश आळेकर यांनी केले होते. डाॅ. मोहन आगाशे, जुईली देऊसकर आणि मोहन गोखले यांच्यासह या नाटकामध्ये दिलीप जोगळेकर, अजित दीक्षित, नंदू पोळ, रोहिणी भागवत, विभा देशमुख, मेधा अर्जुनवाडकर, मंजिरी परांजपे, सीमा धर्माधिकारी, दीपक ओक, दिलीप मिटकर, उदय लागू आणि सतीश घाटपांडे यांच्या भूमिका होत्या.

हेही वाचा – पुणे : महात्मा गांधी रस्त्यावर सराफ व्यावसायिकावर कोयत्याने वार

‘प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशन’मधून (पीडीए) बाहेर पडून तरुण कलाकारांनी २७ मार्च १९७३ रोजी ‘थिएटर ॲकॅडमी’ संस्था सुरू केली. या नव्याने स्थापन झालेल्या संस्थेला राज्य नाट्य स्पर्धेत स्थापन करण्यासाठी नवे नाटक हवे होते. बायोकेमिस्ट्री विषय घेऊन एम. एस्सी. करत असताना १९७२ मध्ये हे नाटक लिहून झाले होते. त्यामुळे हेच नाटक स्पर्धेत करायचे ठरले आणि ४ डिसेंबर १९७३ रोजी त्याचा पहिला प्रयोग झाला. रवींद्र साठे यांच्या आवाजात ‘हंसध्वनी’ रागातील बंदिश हे या नाटकाचे एक वैशिष्ट्य ठरले, अशी आठवण सतीश आळेकर यांनी सांगितली.

त्या वेळी कोणतीही नवी संस्था नोंदणीकृत झाल्यानंतर तिला तीन वर्षांनी राज्य नाट्य स्पर्धेत नाटक करता येईल, अशी शासनाची अट होती. नाटक तर करायचेच होते. मग, आम्ही या कायद्यातून पळवाट शोधली. अण्णा राजगुरू यांची शिशुरंजन, पुणे या संस्थेची निर्मिती असल्याचे दाखवून हे नाटक केले होते, असे आळेकर यांनी सांगितले.

हेही वाचा – मागासवर्ग आयोगाच्या सदस्यपदाचा राजीनामा देणाऱ्या ॲड. बालाजी किल्लारीकर यांनी का घेतली शरद पवारांची भेट?

याच कालखंडामध्ये नॅशनल सेंटर फाॅर परफाॅर्मिंग आर्ट्स (एनसीपीए) संस्थेच्या कुमुद मेहता यांनी पुण्यामध्ये (राष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्था-एफटीआयआय) येथे ज्येष्ठ रंगकर्मी सत्यदेव दुबे यांची नाट्यलेखन कार्यशाळा घेतली होती. त्यामध्ये मी हे नाटक वाचले होते. माझ्यासह महेश एलकुंचवार (रूद्रवर्षा), गो. पु. देशपांडे (उद्ध्वस्त धर्मशाळा), दिलीप जगताप (एक अंडं फुटलं), अच्युत वझे (चल रे भोपळ्या टुणूक टुणूक), शंकर शेष (और एक द्रोणाचार्य) आणि सुहास तांबे या नव्या पिढीच्या नाटककारांनी आपली नाटके वाचली होती. नाटक वाचन झाल्यानंतर जमलेल्या मान्यवरांनी त्या विषयी चर्चा करायची असे सत्र होते. चर्चा करणाऱ्यांमध्ये विजय तेंडुलकर, डाॅ. श्रीराम लागू, प्रा. पुष्पा भावे, शांता गोखले, कमलाकर नाडकर्णी, अमोल पालेकर, चित्रा पालेकर असे दिग्गज होते. या कार्यशाळेनंतर मी नाट्यलेखनाकडे गंभीरपणे पाहू लागलो, अशा स्मृतींना आळेकर यांनी उजाळा दिला.

नाटक ही समूह कला आहे. नाटककाराचे शब्द वाहून नेणारा नट हा लमाण आहे, या डाॅ. श्रीराम लागू यांच्या मताशी मी सहमत आहे. कलाकारांनी हे नाटक सादर केले म्हणून मी नाटककार झालो. हे नाटक करून पैसा मिळणार नव्हता आणि लोकप्रियतादेखील. तरीही कलाकार या नाटकामध्ये काम करण्यास तयार झाले. प्रवाहाविरुद्ध पोहण्याची शक्ती देणाऱ्या या नाटकामुळे बंडखोरी यशस्वी झाली, असे आता मागे वळून पाहताना निश्चितपणे म्हणता येईल. – सतीश आळेकर, ज्येष्ठ नाटककार

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: The play mickey and memsaheb will celebrate its golden jubilee tomorrow pune print news vvk 10 ssb

First published on: 03-12-2023 at 12:36 IST

आजचा ई-पेपर : पुणे

वाचा