Dal gandori recipe in marathi: खानदेश म्हटलं की प्रथम डोळ्यासमोर काय येतं? अहिराणी भाषा आणि अर्थात येथील झणझणीत जेवण. खानदेशातील पदार्थ आजही आवडीने अनेक ठिकाणी खाल्ले जातात. यात शेवभाजी, डाळ बट्टी, निस्त्याची चटणी, शेंगदाण्याची पातळ चटणी, कळण्याचं पुरी-भरीत, तुरीचा घेंगा, बोरांची भाजी, केळीची भाजी, तूरडाळीचे भेंडके हे पदार्थ तर तुफान लोकप्रिय आहेत. पण, खानदेशची स्पेशल डाळ गंडोरी. कधी ट्राय केली आहे का? नसेल तर एकदा तरी जरुर करुन पाहा. रोजच्या साध्या जेवणात केली तर जेवणाची चव आणि लज्जत काही औरच होते. म्हणूनच, खानदेशी स्टाइल डाळ गंडोरी कशी करायची ते पाहुयात.

खानदेशी स्पेशल डाळ गंडोरी साहित्य

१/२ कप तूरडाळ
१/२ कप पालकाची पाने चिरून
१/२ कप आंबट चुका पाने चिरून
१/२ कप मेथी पाने चिरून
२ काटेरी वांगी
२ हिरवे टोमॅटो
२-३ हिरव्या मिरच्या
१ टेबलस्पून आळ लसूण पेस्ट
२ टेबलस्पून शे दाणे
२ टेबलस्पून शेंगदाणा कूट
२ कांदे बारीक चिरून
१०-१२ खोबऱ्याचे काप
१/४कप किसलेले खोबरे
७-८ कडीपत्ता पाने
२ टेबलस्पून तेल
१ टीस्पून जीरे मोहरी
१/४ टीस्पून हळद
१/८ टीस्पून हिंग
१ टीस्पून धने जीरे पावडर
१ टीस्पून काळा मसाला
१-२ कप पाणी…आवश्यकतेनुसार
१/२ टीस्पून मीठ..चवीनुसार

खानदेशी स्पेशल डाळ गंडोरी कृती

१. सर्वात प्रथम भाज्या स्वच्छ धुवून चिरून घ्या. तुरडाळ स्वच्छ धुवून घेतली, हिरवे टोमॅटो घ्या. वांग्याच्या आणि टोमॅटोच्या फोडी करून घेतल्या.

२. कुकरमध्ये तेल घालून त्यात चिरलेल्या भाज्या, डाळ, मिरच्या घालून तीन शिट्ट्या काढून शिजवले. नंतर छान घोटून घेतले.

३. कढईत तेल घालून त्यात जीरे मोहरी हिंग,कडीपत्ता कांदा,खोबऱ्याचे काप,शेंगदाणेे,किसलेले खोबरे घालून छान परतले. त्यात हळद, आलं लसूण पेस्ट, काळा मसाला,धने जीरे पावडर घालून त्यात घोटलेले साहित्य,दाण्याचे कुट घालून छान मिक्स केले. त्यात मीठ आणि पाणी घालून छान उकळी आणली.

हेही वाचा >> मालवणी मसाला पावभाजी; घरीच बनवा हॉटेलसारखी चमचमीत पावभाजी, नोट करा सोपी रेसिपी

४. सर्व्हिंग बाउलमध्ये डाळ गंडोरी काढून घेतली. आंबट तिखट चवीची डाळ गंडोरी गरम गरम भाकरी, कांदा, भातासोबत मस्त लागते.