कोकण किनारपट्टीवर राहणा-या माणसासाठी शहाळं आणि काजू ही घरातलीच उत्पादनं…त्यांचा वापर करून केलेली ही भाजी भल्यभल्यांना भुरळ घालते. चला तर मग पाहुयात शहाळं- काजू मालवणी ग्रेव्ही कशी करायची..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शहाळं- काजू मालवणी ग्रेव्ही साहित्य

२ वाटी शहाळ्याचं खोबरं पातळ स्लाईस करून
१/२ वाटी तुकडा काजू
२ चमचे ओलं खोबरं
५ लवंगा, ५ काळी मिरी, १ ईंच दालचिनीचा तुकडा,१ हिरवी वेलची
१ चमचा धने, १/२ चमचा बडीशोप
१ चमचा लाल तिखट
१/४ चमचा हळद
१ चमचा चिंचेचा कोळ
१ चमचा गुळ
२ पळी तेल
मीठ आवश्यकतेनुसार
१ कांदा उभी स्लाईस करून
२ कांदे बारीक चिरून फोडणीकरिता
५-६ लसूण पाकळ्या, २ हिरव्या मिरच्या

शहाळं- काजू मालवणी ग्रेव्ही कृती

१. प्रथम शहाळ्याच्या खोबऱ्याच्या स्लाईस करून घ्याव्यात आणि काजू पाण्यात थोडा वेळ भिजत ठेवावे.

२. उभा कापलेला कांदा, पाच सहा लसणाच्या पाकळ्या, थोडे काजू आणि सर्व खडा मसाला थोड्याशा तेलात परतून नंतर खोबरे सुद्धा त्याबरोबरच तांबूस रंगावर परतून घ्यावे आणि मिक्सर मधून बारीक वाटून घ्यावे.

३. एका भांड्यात फोडणी करता तेल घालून त्यात बारीक चिरलेला कांदा परतून घ्या. नंतर हळद, मिरची घालून भिजवलेले काजू आणि शहाळ्याचे खोबरं आणि थोडसं पाणी आणि मीठ घालून पाच मिनिटं मंद आचेवर झाकून ठेवावे.

हेही वाचा >> गावरान खर्डा मांदेली; अलिबाग स्पेशल रेसिपी एकदा खाल तर खातच रहाल, लगेच नोट करा

४. त्यानंतर मिक्सर मधून वाटून घेतलेले वाटण त्यात घालून गुळ आणि चिंचेचा कोळ घालून छान उकळ काढून घ्यावी. कोथिंबीर आणि शहाळ्याच्या स्लाईसने सजवून सर्व्ह करावी.(पाच सहा तास मुरल्यानंतर ही आमटी वाढावी, ती जास्त चविष्ट लागते.) कोथिंबीर घालून भाजी सजवावी व गरम गरम खायला द्यावी.

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shahale kaju malvani curry recipe in marathi kaju curry recipe in marathi srk