गिरीश कुबेर girish.kuber@expressindia.com
@girishkuber

ऑस्ट्रियाचे धडे – ५

Counseling, Jealous, colleagues,
समुपदेशन : सहकाऱ्यांचा मत्सर करताय?
bihar man weds with mother in law
Video: जावयाचा सासूवर जडला जीव; सासऱ्याला कळताच लावले दोघांचे लग्न
chaturang
सांधा बदलताना : सोबतीचे बळ!
Itishree thinking about What do I really want is very important in relationship
इतिश्री : ‘मला नेमकं हवंय काय?’

आपल्याकडे  जे नाही असं बरंच काही तिथे असताना आपल्याकडे जे आहेच, त्याचाच हव्यास..

ऑस्ट्रियातल्या सफरीतला शेवटचा टप्पा होता इन्सब्रुक. रम्य अशा आल्प्स पर्वतराजीच्या पायथ्याचं शहर. रस्त्यानं इटली आणि जर्मनीच्या वाटेत असणारं. हिमशिखरांवरती खेळल्या जाणाऱ्या स्कीइंग या खेळासाठी हे शहर जास्त प्रसिद्ध आहे. पण आम्ही पोचलो तेव्हा टळटळीत ऊन होतं. वातावरणात उष्मा नव्हता. पण ऊन मात्र होतं. रस्त्यात डझनांनी हॉटेल्स आणि स्कीइंगची केंद्रं दिसत होती. त्यांच्या आसपासच्या मोठमोठय़ा घसरगुंडय़ा पाहून सुरुवातीला काही कळलं नाही. या शहरात मोठी माणसंसुद्धा घसरगुंडय़ा खेळतात की काय, असं वाटून गेलं. मोटारीचा चालक म्हणाला या स्कीइंगच्या घसरगुंडय़ा आहेत म्हणून. याच्या वरच्या टोकाला जायचं आणि बर्फावरनं घरंगळत यायचं असा हा खेळ. तो खेळला असाल ना कधी, या त्या मोटारचालकाच्या प्रश्नावर ओशाळून इतकंच म्हटलं, ‘शुमाकर जखमी झाल्यापासून नाही’. त्याला काय सांगणार रस्त्यातले खड्डे चुकवून ऑफिस आणि घर गाठणं हाच कसा आमचा सर्वात मोठा राष्ट्रीय खेळ आहे ते.

युरोपातल्या कोणत्याही शहरात इतिहास अंगावर येतो. म्हणजे आपल्या पायाखालच्या दगडानं कोणाच्या साम्राज्यातला महाल सजवला असेल, त्याला आधार दिला असेल ते काही सांगता येत नाही. हा प्रकार रोमसारख्या शहरात वारंवार होतो. इन्सब्रुक हे शहरही तसं ऐतिहासिक. या एकाच शहरात जवळपास डझनभर वस्तुसंग्रहालयं आहेत. ती सगळीच पाहणं केवळ अशक्य. म्हणजे त्यासाठी महिनाभर मुक्काम त्याच शहरात करायला हवा. आणि नुसतीच वस्तुसंग्रहालयं पाहायची असतील तर शहराचं काय?

इन्सब्रुक शहरही तितकंच पाहण्यासारखं. अगदी मध्यातनं नदी वाहते. चांगली खळाखळा. त्या पाण्याच्या प्रवाहाचा आवाज आसमंत व्यापून राहिलेला असतो. त्याविषयी तिथल्या एकाला विचारलं तर तो म्हणाला हे असंच असतं बारा महिने. वरती आल्प्समधनं वाहत येते ती. त्यामुळे पाण्याचा तोटा नाही. त्या नदीच्या पातळीवर आणि काही भागात वरती अशी हारीनं कलादालनं. काही स्थानिक खाद्यपदार्थ विक्रेते आपापली पालं मांडून बसलेले. दोघाचौघांकडे ब्ल्यू चीज पाहून राहवलं नाही. शेजारच्याकडे त्यांनी घरगुती बनवलेल्या वाईन्स होत्या विकायला. काही गिटार वाजवत बसलेले. मागे नदीचा असा मंद्र आणि मंदसा षड्ज आणि जोडीला हे असं काही. माणसं जथ्याजथ्यानं िहडत होती. वातावरण घुटक्या घुटक्यानं पीत होती. एखादी कोणती कमतरता तिथं शोधायचीच म्हटलं तर ती म्हणजे फक्त मारवा. घनगंभीरसा मारवा असता तर तिथल्या वातावरणात सदेह विरघळून जावं असंच वाटलं असतं. पण तो काही नव्हता आणि वातावरणात तशी काही गगनगहराईही नव्हती. होती ती एक उत्फुल्लता. एखाद्या प्रदेशातल्या माणसांचा गळा इतका कसा काय गाता असतो, हा एक प्रश्न तेवढा तिथं सारखा पडत होता.

तो विचारला तर तिथल्यानं इन्सब्रुक गावात भरणाऱ्या संगीत महोत्सवांची यादीच तोंडावर फेकली. त्या एका गावात तब्बल सहा संगीत महोत्सव भरतात.. तेही आंतरराष्ट्रीय पातळीवरचे.. हे ऐकून कान गार पडले. या गावात पुन्हा यायचं आणि ते या संगीत महोत्सवाचा मुहूर्त धरून.. हे नक्की झालं. या अशा गावांचं एक वैशिष्टय़ म्हणजे अशा ठिकाणी चालायचा अजिबात कंटाळा म्हणून येत नाही. चराती चरतो भग: .. म्हणजे चालणाऱ्याचं नशीब चालतं.. अशा अर्थाचं एक संस्कृत सुभाषित आहे ते बहुधा या वा अशाच गावांवरनं सुचलं असावं. तर एक दिवस चालत चालत भर दुपारी तिथल्या मंडई परिसरात गेलो.

बकाल असा एक चपखल शब्द आहे आपल्याकडच्या मंडयांचं वर्णन करण्यासाठी. पण तिथं त्याचा मागमूसही नव्हता. ती.. म्हणजे मंडई.. इतकी सुंदर होती की आपण चुकलो बहुधा असंच वाटून गेलं. पण नाही ती मंडईच होती. इंग्रजी सी आकाराची रचना. मधल्या चौकोनात काही नाही. तो मोकळा. एरवी कडेच्या दुकानदारांनी आपल्या दुकानातलं सगळं गबाळ तिथं रचायला हवं होतं. तसं काही नाही. म्हटलं हे कसले मंडईवाले. या इतक्या मोकळ्या जागेचं करणार काय?

दुपारी जेवणाची वेळ झाली तेव्हा त्याचं उत्तर मिळालं. एक वाद्यवृंदच होता मंडईचा. सगळे सामील झाले गाण्यात. त्यात अनागर असा एक मोकळेपणा होता. त्यामुळे आसपासच्या सगळ्यांना ते त्यात सामील व्हावं यासाठी आग्रह करत होते. आसपास दुकानांच्या कडेकडेनं छानशी पब्जसारखी रचना होती. बिअर, वाईन आणि हलकं काही खायला. त्यात मश्गूल असलेला सगळा वर्ग या गाण्यात सहभागी झाला. बघता बघता सगळा आसमंतच गाऊ लागला. माणसं एखाद्दुसरं माहीत असलेलं गाणं गायला जात होती. मधेच परत येऊन आपापल्या पेयाचा एखादा घोट घ्यायची आणि पुन्हा गायला. तासदोन तास हा आनंद सोहळा चालला असेल. शंभर टक्के उत्स्फूर्त. हे असं काही पाहून तोंडात बोटं तरी किती घालायची असा प्रश्न होता. वाटलं असेल आज काही विशेष. तसं बोलून दाखवलं तर हॉटेलातली ती छानशी सुबक सेवक म्हणाली.. हे आमचं रोजचंच.. मध्येच नाचाच्या दोन गिरक्या घेऊन ती परतली होती.

यांना आनंद तरी इतका कसला.. आणि अर्थातच का.. होतो हा प्रश्नच आहे. संपूर्ण ऑस्ट्रियाभर तो छळत होता. ‘हे असेच आहेत,’ असा आमच्यापुरता एक निष्कर्ष काढला आणि त्या प्रश्नाच्या उत्तराचा नाद सोडून दिला. तो किती योग्य होता हे परवा अरुण जेटली यांच्या निधनानंतर जाणवलं. एका परदेशी पत्रकारानं एका आंतरराष्ट्रीय दैनिकासाठी त्यांची घेतलेली मुलाखत नव्यानं वाचनात आली. त्या पत्रकारानं त्यांना विचारलं होतं : निवृत्तीनंतर काय करायची इच्छा आहे? त्यावर जेटली म्हणाले : दोनच ठिकाणी भरपूर राहाणार.. काश्मीर आणि ऑस्ट्रिया. असो.

तिथल्या वस्तुसंग्रहालयांचं नव्याने वर्णन करण्याची काही गरज नाही. कारण कौतुक तरी किती करायचं हा प्रश्न. पण एका वस्तुसंग्रहालयातला अनुभव मात्र नोंदवायला हवा. सुखद नव्हता तरी.

झालं असं की इन्सब्रुकच्या वास्तव्यात एका सायंकाळी स्वारोस्की या श्रीमंती क्रिस्टल वस्तूंसाठी ओळखल्या जाणाऱ्या कंपनीच्या वस्तुसंग्रहालयाला भेट देता आली. सर्वसाधारणपणे अशा बाजारपेठीय, म्हणजे लंडनच्या मादाम तुसा संग्रहासारखी अकलात्मक ठिकाणं टाळायची हे ब्रीद. पण इथे मोडलं. कारण स्वारोस्कीच्या या वस्तुसंग्रहालयात काही उत्तम मांडणशिल्पं (म्हणजे इन्स्टॉलेशन्स.. त्यासाठी इतका उत्तम मराठी शब्द ही लोकसत्तेतील सहकारी अभिजीत ताम्हणे याची निर्मिती) आहेत, असं सांगितलं गेलं म्हणून.

ते खरं होतं. तशी ती होती. खेरीज विविध गाजलेल्या चित्रपटांत गाजलेल्या भूमिका केलेल्या नायक/नायिकांचे क्रिस्टलचे बनवलेले कपडे, आभूषणं, कँडल इन द विंड गाणाऱ्या एल्टन जॉनचा क्रिस्टल शर्ट असं बरंच काही या वस्तुसंग्रहालयात आहे. त्याची मांडणी त्याहून सुंदर आहे. सगळं काही अंधारात. पण दिवा लावून केलेल्या अंधारात. बाजूला छोटय़ाशा फलकावर त्या कलाकृतीची माहिती. निवांत पाहता आलं सारं. काही गर्दीच नव्हती. माणसं पटापट पुढे सरकत होती त्यामुळे शांतपणे निरखता आलं सारं.

पण एकदम गर्दी लागली प्रदर्शनाची दालनं संपल्यावर. आणि सगळा ओळखीचा कोलाहल. जवळ गेल्यावर का ते कळलं. ते स्वारोस्कीचं विक्री दालनं होतं आणि अगदी दोनपाच युरोपासनं हजारो युरोपर्यंतचे स्वारोस्कीचे दागिने विकायला होते. संभाव्य गिऱ्हाईकांत नव्वद टक्के भारतीय. तिथल्या फुकट वायफायवरनं घरी भारतात दागिन्यांचे फोटो पाठवत होते आणि चर्चापरिसंवाद भरवून खरेदीचा निर्णय करत होते. वास्तविक या निर्णयात निर्णायक घटक किंमत हाच होता. पण तरी त्याची चर्चा. स्वारोस्की खरं तर आपल्याकडेही आहे आता. पण नाही. आपल्याकडे काय नाही असं बरंच काही तिथे असताना आपल्याकडे जे आहेच त्याचाच हव्यास. आम्ही तो मासळीबाजारी कोलाहल अचंबित होऊन पाहत होतो. आमचे चेहरे पाहून आमचा वाटाडय़ा म्हणाला : इंडियन्स आर अवर बिगेस्ट मार्केट.

खरं होतं त्याचं. आपण फक्त विकत घेणारे.. आणि विकायचं ठरवलं तरी आपण काय विकणार हा प्रश्नच. दुसऱ्या दिवशी पहाटे परतीच्या विमानात यातल्या काही खरेदीवाल्या भारतीयांच्या बरोबरीनं हा प्रश्न होताच.

(‘ऑस्ट्रियाचे धडे’ समाप्त)