राजेश अग्रवाल आणि सुमित जमवार. दोघेही भारतीय हे वेगळं सांगायची गरज नाही. अग्रवाल इंदूरचे आणि सुमित मूळचा बिहारचा, पण दिल्ली आयआयटीतला. अग्रवाल लंडनला असतात आणि सुमित केंब्रिजला. दोघांनीही साधारण एकाच वेळेस भारत सोडला. २००१च्या नंतर.

ताज्या इंग्लंड दौऱ्यात दोघांची भेट झाली. निवांत गप्पा झाल्या. स्वतंत्रपणे. पण तरी दोघांच्या सुरात एक समान स्वर होता. इकडे.. म्हणजे इंग्लंडमध्ये.. किती मोकळं वाटतं आणि हवं ते करता येतं. या दोघांच्या कथांतून आपल्या व्यथाच बोलतात खरं तर.

international dance day 2024
भारतीय नृत्यकलेचे स्वरूप कसे बदलत गेले? नृत्य केल्याने खरंच आरोग्य सुधारते का?
IPL 2024 Mumbai Indians vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
IPL 2024: धोनीच्या वादळी खेळीने आनंद महिंद्राही झाले चकित, माहीचे कौतुक करताना म्हणाले, “कृतज्ञ आहे की माझं नाव Mahi-ndra…”
According To Rohit Shikhar And Rishabh Are Dirty
VIDEO : रोहितने सांगितलं ‘या’ दोन क्रिकेटपटूंसह कधीच रूम शेअर करणार नाही; म्हणाला, “ते दोघे राहतात अगदी गचाळ…’
map
भूगोलाचा इतिहास: तो प्रवास अद्भूत होता!

अग्रवाल लंडनला आले तेव्हा पहिल्यांदा विमानात बसले. लंडनला काही दिवस नोकरी केली आणि व्यवसायाची कल्पना सुचली. हाती भांडवल शून्य. फक्त एक लॅपटॉप. त्याच्याच जिवावर त्यांनी परकीय चलनाच्या व्यवहारात हातपाय मारायला सुरुवात केली. आज त्यांचं मोठं कार्यालय आहे. थेम्सच्या किनाऱ्यावर. उद्योगाचा आकार चांगलाच विस्तारलाय. शंभरेक कर्मचारी आहेत. कथा इतकीच नाही. परदेशात जाऊन नाव काढणारे असे अनेक असतील. पण अग्रवाल व्यवसायातल्या यशावरच थांबले नाहीत. राजकारणात शिरले.

आज ते लंडनचे उपमहापौर आहेत. तिकडे महापौर म्हणजे आपला मुख्यमंत्री. सर्व अधिकार असलेला. त्यामुळे उपमहापौरपदालासुद्धा एक वजन आहे. महापौर आहेत सादिक खान. ते मूळचे पाकिस्तानचे आणि हे भारतीय. म्हणजे लंडनसारख्या महत्त्वाच्या शहराचा महापौर बाहेरचा आणि उपमहापौरही तसलाच. लंडनवासीयांना चालतं का हे? भूमिपुत्रांच्या हक्कांवर गदा वगैरे येत नाही? असं अग्रवाल यांना विचारलं आणि त्यांचा लंडनाभिमान उफाळून आला.

हा देश किती मोकळा आहे माहितीये का? राष्ट्रकुलातल्या ५४ देशांपैकी कोणत्याही देशाचा नागरिक इंग्लंडमध्ये अजूनही सहज निवडणूक लढवू शकतो. अगदी पंतप्रधानपदाचीसुद्धा. हा या देशाचा मोठेपणा. मी कोण होतो, इथे आलो तेव्हा? आज मला कुठे नेऊन ठेवलंय या शहरानं? हे फक्त लंडनसारख्या खऱ्या आंतरराष्ट्रीय शहरातच होऊ शकतं. अन्य देशीयांमुळे या देशाला अजिबात असुरक्षित वगैरे वाटत नाही. हा इतिहास आहे. १८९२ साली या देशात पहिल्यांदा एक भारतीय खासदार झाला. तो म्हणजे दादाभाई नवरोजी. तेव्हाही दादाभाईंच्या बुद्धिमत्तेचा इथं आदर व्हायचा. आजही तसंच आहे. तुम्ही कष्ट करा.. बौद्धिक/ शारीरिक कोणतेही.. आणि मोठं व्हा. तुम्हाला कोणीही अडवत नाही. इथल्या महापौरपदाची निवडणूक ही युरोपातली तिसऱ्या क्रमांकाची मोठी थेट निवडणूक असते. फ्रान्स, पोर्तुगाल या देशांच्या अध्यक्षीय निवडणुकांनंतरचा क्रमांक लंडनचाच. लंडनमध्ये आज सहा लाख भारतीय आहेत. या एका शहरात तब्बल ३०० भाषा बोलल्या जातात. ५० विद्यापीठं या एकटय़ा शहरात आहेत. पाच विमानतळ आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे ४० टक्के लंडनवासी हे परदेशी नागरिक आहेत. कोणीही निवडून येऊ शकतो या शहरातून.. तुम्हीसुद्धा महापौर, पंतप्रधान होऊ शकता.

हे शेवटचं वाक्य अग्रवाल माझ्या सहकाऱ्याकडे पाहून म्हणाले. तो बंगळूरुचा. त्याआधी विषय निघाला होता, लंडनमध्ये दक्षिण भारतीयसुद्धा किती आहेत ते वगैरे. त्याचा संदर्भ घेत अग्रवाल त्याच्याकडे पाहून असं म्हणाले. त्याला खरंच वाटेना.

तो खास कर्नाटकी हेल काढत म्हणाला : मै गौड.. आय कांट इव्हन इमॅजिन सम टमिळ  फेलो बिकमिंग बंगलूरु मेयर.

खरंच होतं त्याचं. अग्रवालनीसुद्धा ते मान्य केलं. त्यांना म्हटलं : तुम्ही.. म्हणजे लंडनवासी इतके उदारमतवादी आहात तर ब्रेग्झिट घडलंच कसं?

ते म्हणाले : आम्ही कुठे पाठिंबा दिला? लंडनचा विरोधच होता ब्रेग्झिटला. इथल्या ६० टक्के नागरिकांना युरोपातच राहायचंय. मनानी ते आंतरराष्ट्रीयच आहेत. पण इंग्लंडच्या अंतरंगात या विषयावर बरीच प्रचाराची हवा तापवली गेली आणि हा ब्रेग्झिटचा धक्का बसला.

त्यांना विचारलं : भारतात परत यायचा विचार.

कसंनुसं हसले अग्रवाल.

*    *     *    *

याच्या बरोबर विरोधात सुमितची कथा. हा हुशार विद्यार्थी दिल्लीच्या आयआयटीचा. वडील तिथेच प्राध्यापक. मूळचा अभियंता. मग वित्त क्षेत्रात शिरला. अगदी स्टेट बँकेपासनं सगळ्या ठिकाणी उच्चपदी नोकरी केली.

आणि आता केंब्रिजला जाऊन त्यानं कंपनी काढलीये. कशासाठी? तर माणसांच्या जनुकांचा अभ्यास करण्यासाठी. फार मोठय़ा कामात तो मग्न आहे. २००३ साली आठवतंय अमेरिकेचे अध्यक्ष बिल क्लिंटन वगैरेंच्या उपस्थितीत First Book Of Life असं सांगत एका भव्य प्रकल्पाची सांगता झाली. माणसाच्या शरीरातल्या जनुकांचा अभ्यास आणि त्यांचं संपूर्ण आरेखन त्यात होतं. सुमित आता त्याच प्रकल्पाला पुढे नेतोय.

म्हणजे आपण आपण का असतो, याचं उत्तर तो शास्त्रीयदृष्टय़ा शोधतोय. आपण काळे, गोरे, कुरळ्या केसांचे, सरळ नाकाचे, नकटे, उंच, बुटके वगैरे वगैरे असतो, आपल्यातल्या काहींनाच कसला तरी आजार होतो, काहींना तशाच अवस्थेत काहीही होत नाही, काहींचा घसा दही खाल्लं की लगेच धरतो तर काहींना बर्फ कडाक्कड चाऊन खाल्ला तरी काही होत नाही.. काहींना विशिष्ट औषध लागू पडतं तर काहींना ते पिंपभर प्यायले तरी काही गुण येत नाही..

हे सगळं आपल्या शरीरातल्या जनुकांमुळे होतं.

त्याचा अभ्यासच झालेला नाहीये का?

तर तसं नाही. झालाय. या क्षेत्राचा अभ्यास झालाय. त्याचमुळे तर औषध निर्माण क्षेत्र विकसित होत गेलं. आज शस्त्रास्त्रांच्या खालोखाल आर्थिकदृष्टय़ा बलाढय़ असलेलं हे क्षेत्र जनुकाभ्यासाच्या आधारानेच पुढे गेलं.

पण पंचाईत अशी की हा जो काही अभ्यास झालाय तो पाश्चात्त्यांच्या जनुकांचा. युरोपीय आणि अन्य पाश्चात्त्य देशांतील माणसं निवडून त्यांच्या जनुकांची साखळी अभ्यासली गेली. त्यांच्याच आधारे औषधं आदी विकसित होत गेली.

आणि आता असं लक्षात आलंय की आशियाई, आफ्रिकी खंडातल्या नागरिकांत आणि युरोपीय, पाश्चात्त्य नागरिकांत प्रचंड फरक आहे. म्हणजे एखाद्या गोऱ्या व्यक्तीस जे वैद्यकीय नियम लागू होतील ते आणि तसे आपल्या राजस्थानातल्या वा आफ्रिकेतल्या व्यक्तीस लागू होतील असं नाही. याचं कारण या दोन्हींचे शरीरधर्म एकच असले तरी त्यांच्या रक्तातल्या जनुकांत मोठा फरक असतो. याचा अर्थ असा की एखाद्या विशिष्ट आजारासाठी युरोपीय व्यक्तीस जे औषध लागू होईल ते तसंच्या तसं आफ्रिकेतल्या काँगो खोऱ्यातल्या किंवा आपल्या कावेरी खोऱ्यातल्यास लागू होईल याची काहीही शाश्वती नाही. किंबहुना ते तसं होतच नाही. याचा अर्थ जनुकांचा अभ्यास पूर्ण झाला की औषध निर्माणशास्त्रच बदलेल.

सुमित नेमकं तेच करतोय. भारतात अनेक ठिकाणी त्याने जनुकांचे नमुने गोळा करण्यासाठी छोटी केंद्रे उभारलीयेत. अनेक देशांचं आर्थिक सहकार्य त्याच्या प्रयोगाला आहे. पहिल्या प्रयोगासाठीच जवळपास २३ हजार कोटी रुपये लागले. एकटय़ा ब्रिटन सरकारनंच पाचेकशे कोटींचा भार उचललाय. अमेरिका, सिंगापूर, बडय़ा औषध कंपन्या त्यासाठी मदत करतायत.

तू केंब्रिजच का निवडलंस या संशोधनासाठी?

इथल्या वातावरणातच ना एक अभ्यासू शांतता आहे. पूर्वी आपल्याकडे आयआयटीत होतं तसं चमकदार, बौद्धिक वातावरण आहे. संशोधकांची कदर केली जाते. त्यांना कमीत कमी त्रास होईल यासाठी सरकार, नगरपालिका प्रयत्न करतात. आणि मुख्य म्हणजे विज्ञानाविषयी प्रचंड आदर आहे.. सरकारलाही. संशोधकांना कसलाही त्रास होत नाही.

खरंच असणार त्याचं. न्यूटन केंब्रिजचाच आणि अलीकडेच वारले ते स्टीफन हॉकिंगही तिथलेच. आता सुमितचं सगळं कुटुंबच तिकडे आलंय. भाऊही असाच संशोधक आहे. तोही तिकडे आहे.

त्यालाही शेवटी तोच प्रश्न विचारला : भारतात का नाही काढत कंपनी?

कसंनुसं हसला तो. तसाच अग्रवालांसारखा.

गिरीश कुबेर

girish.kuber@expressindia.com

twitter: @girishkuber