राजेश बोबडे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देशाच्या विकासात नि:स्पृह कार्यकर्त्यांचे व प्रचारकांचे स्थान महत्त्वाचे आहे, असे तुकडोजी महाराजांचे म्हणणे आहे. त्यांच्या मते,‘‘आपले मिशन-आपली संघटना – जर प्रभावी असेल, कोणीही त्या चाकोरीत पाऊल ठेवो, त्याला हवे तसे घडविण्याची त्यांच्यात शक्ती असेल, तर कोणतीही हरकत राहणार नाही. पण ही गोष्ट अगदीच क्वचित घडणारी आहे. नादुरुस्त व्यक्तीला दुरुस्त करण्यापेक्षा, ज्या व्यक्तीचा स्वभावच सेवामय झाला आहे अशा व्यक्तीलाच प्रोत्साहन का देऊ नये?’’

‘‘पूर्वीच्या काळातील लोक हे जाणून होते, म्हणूनच त्यांनी भाट, गोसावी, किंगरीवाले, गोंधळी, पुराणिक, कीर्तनकार, भजनी, साधुसंन्यासी यांच्याद्वारे आत्मोन्नतीचा आणि देशोन्नतीचा प्रचार करवून घेतला. त्यांची आणि स्वत:चीही प्रतिष्ठा वाढविली आणि देशाचेही कल्याण साधले! देशातील सद्धर्म प्रचारकांनी धनार्जनाच्या मागे न लागता नि:स्पृहपणे कार्य करावे आणि समाजाने व सरकारने त्यांच्या जीवननिर्वाहाची योग्य काळजी वाहावी, अशी परंपरा ऋषिकालापासून आखण्यात व अबाधित राखण्यात आली होती. याच्या मुळाशी वरील दृष्टिकोनच होता. ‘आशाबद्ध वक्ता। भय ओतियांच्या चित्ता’ या संतवचनाप्रमाणे स्वत:च्या निर्वाहासाठी धनाची मागणी करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या उपदेशाचा समाजावर फारसा प्रभावच पडत नाही. तसेच सत्तेचे पाठबळ घेऊन अधिकारी या नात्याने उपदेश करणारेही आदराचे विशेष स्थान सहसा प्राप्त करू शकत नाहीत.’’

‘‘विलासी माणसाकडून सेवेचे व्याख्यान दिले गेले, तर ते निरर्थक व हास्यास्पदच ठरते. आमचे सरकारसुद्धा कित्येक आवश्यक गोष्टींचा प्रचार सक्रियतेने करू इच्छिते; पण तशा अनुरूप स्वभावाचे व ध्येयाचे लोक न मिळाल्यामुळे पैशांची बरबादी होऊन भरीव कार्य मात्र काहीच होत नाही. मोठय़ा पगाराचे थोर पदवीधर लोक नेमले तर ते जग दुरुस्त करू शकतील, ही कल्पनाच अस्वाभाविक आहे. जे लोक किंवा ज्या संस्था सेवाभावी व सत्प्रवृत्तीच्या असतील, त्यांना त्यांच्याच पद्धतीने कार्य करू दिले पाहिजे. सरकारने आपला दृष्टिकोन अवश्य जाहीर करावा, परंतु आडकाठी न करता कार्य करू द्यावे आणि ठरावीक वेळी त्याचे मूल्यमापन करावे. योग्य कार्य करणाऱ्यांना आवश्यक साहाय्य करावे, संरक्षण द्यावे, एवढेच!’’

महाराजांच्या मते याच पद्धतीने देशाचा विकास होऊ शकतो. अर्थात आणखीही विविध विचारी जनांची मते अजमावून देशाच्या नैतिक उन्नतीचा व जीवनविकासाचा प्रश्न हाताळला गेला पाहिजे. बाहेरच्या सुधारणा म्हणजे विकास नव्हे. समाजाच्या अंत:करणात ते संस्कार रुजवले नाहीत, तर तो डोलारा क्षणात धुळीस मिळतो आणि अंत:करणात संस्कार रुजवायचे तर, त्यासाठी त्या त्या विषयाचा जिव्हाळा असणाऱ्या सत्प्रवृत्त प्रचारकांचीच खरी आवश्यकता असते, हे कधीही विसरू नये. आपणाला हवे असलेले उद्याचे जग योग्य दर्जाचे प्रचारकच निर्माण करू शकतात, ही गोष्ट लक्षात घेऊन, सर्वानी गंभीरपणे हा प्रश्न सोडवावा, अशी अपेक्षा महाराज करतात.

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chintandhara the duty of the government is to help the sevabhav ysh