भारताचे सर्वात वयोवृद्ध क्रिकेटपटू दत्ताजीराव गायकवाड यांचे १३ फेब्रुवारी रोजी निधन झाले. गायकवाड बडोद्याचे, त्यांच्या निधनानंतर दोनच दिवसांनी गुजरातच्याच राजकोट शहरात भारत आणि इंग्लंड यांच्यात कसोटी सामना सुरू झाला. तरीही पहिले दोन दिवस भारतीय खेळाडूंनी शोकनिदर्शक काळ्या पट्ट्या दंडावर परिधान केल्याच नाहीत. तिसऱ्या दिवशी बीसीसीआयला उपरती झाली. माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनीही या ढिसाळपणाकडे लक्ष वेधले. माजी कसोटीपटू व कर्णधार आणि माजी रणजीपटू दत्ताजीरावांची अशी अवहेलना खटकणारीच ठरते. कारण त्यांची कसोटी कारकीर्द माफक यशदायी ठरली, तरी ते उत्तम रणजीपटू होते. शिवाय बडोद्याला क्रिकेटमधील प्रमुख संघ घडवण्यात त्यांचे योगदान आणि मार्गदर्शन मोलाचे ठरले.

हेही वाचा >>> अन्वयार्थ : कर्जफेडीच्या विळख्यात पाकिस्तान

दत्ताजीरावांपेक्षा त्यांचे चिरंजीव अंशुमान गायकवाड हे अधिक प्रसिद्धी पावले. कारण दत्ताजीराव खेळले त्या काळात भारताला कसोटी क्रिकेट खेळण्यासाठी फारशी निमंत्रणेच मिळायची नाहीत. १९५२ ते १९६१ या काळात दत्ताजीराव ११ कसोटी सामने खेळले. त्यांत १८.४२ ची सरासरी आणि एक शतक ही आकडेवारी फार झळाळती नव्हे. परंतु दत्ताजींच्या बाबतीत आकड्यांपलीकडे दाखवण्यासारखे खूप काही आहे. त्या काळात विजय मांजरेकर, विजय हजारे, पॉली उम्रीगर, पंकज रॉय, नरी कॉन्ट्रॅक्टर, चंदू बोर्डे अशांच्या उपस्थितीत भारतीय संघात स्थान मिळवणे आणि ते टिकवणे अतिशय आव्हानात्मक होते. तरीदेखील दत्ताजींना नेतृत्वाची संधी मिळाली. कारण व्यक्तिमत्त्वात ऋजुता होती आणि क्रिकेटच्या बारकाव्यांची सखोल जाण होती. इंग्लंडच्या दौऱ्यावर भारतीय संघ त्यांच्या नेतृत्वाखाली चार कसोटी सामने खेळला आणि चारही सामन्यांत हरला. पण त्या दौऱ्यात दत्ताजीरावांनी बलाढ्य कौंटी संघांविरुद्ध ३४च्या सरासरीने ११७४ धावा केल्या आणि भारताची थोडीफार पत राखली.

हेही वाचा >>> संविधानभान : आभाळाची आम्ही लेकरे…

बडोदा ही त्यांची कर्मभूमी. १९४७ ते १९६१ या काळात ते बडोदा संघाचे आधारस्तंभ होते. त्यांच्या नेतृत्वाखाली बडोद्याने १९५७-५८ हंगामात रणजी करंडक जिंकला. एका सामन्यात सर्वाधिक २४९ धावा महाराष्ट्राविरुद्ध नोंदवल्या गेल्या. रणजीतील त्यांची ३६.४० ही सरासरी त्या काळात सरस मानली जायची. दत्ताजीराव उत्कृष्ट क्षेत्ररक्षक होते. तंत्रशुद्ध फलंदाज होते. त्याचबरोबर उत्तम मार्गदर्शक होते. किरण मोरे, इरफान पठाण अशा बडोद्याच्या प्रतिभावान कसोटीपटूंना त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ झाला. निवृत्तीनंतरही कित्येक वर्षे बडोद्यातील मोतीबाग मैदानात ते यायचे आणि युवा क्रिकेटपटूंना सल्ला द्यायचे, त्यांच्याकडून सराव करवून घ्यायचे. मुंबईविरुद्ध सर्वोत्तम खेळ करायला युवा रणजीपटूंना प्रोत्साहित करायचे. कारण त्यांच्या मते आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकण्यासाठी मुंबईसारख्या संघासमोर चांगला खेळ करून दाखवण्यास पर्याय नव्हता. दत्ताजीराव मुंबई आणि बडोदे अशा दोन्ही विद्यापीठ संघांकडूनही खेळले.