मध्यमगती गोलंदाजाची धाव व चेंडू टाकण्याची तशीच झटपट शैली यामुळे मूळचे फिरकी गोलंदाज असूनही डेरेक अंडरवूड यांची गोलंदाजी भल्याभल्या फलंदाजांना चकवा देत असे. ते इंग्लंडचे सर्वात यशस्वी कसोटी फिरकी गोलंदाज ठरले. केरी पॅकर सर्कस आणि दक्षिण आफ्रिकेचा बंडखोर दौरा हे मोह टाळले असते, तर अंडरवूड यांनी ३०० बळींचा पल्ला सहज ओलांडला असता. पण ते आवरता न आल्यामुळे त्यांची कारकीर्द २९७ बळींपाशी समाप्त झाली. ३०० बळी व त्या वेळचे सर्वाधिक यशस्वी इंग्लिश गोलंदाज फ्रेड ट्रुमन यांचे ३०७ बळी ही दोन उद्दिष्टे हाकेच्या अंतरावर राहिली. अर्थात क्रिकेटवर निस्सीम प्रेम आणि ऋजू स्वभाव यांमुळे त्याविषयी अंडरवूड यांना कधी विषाद वाटल्याचे दिसले नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> अन्वयार्थ : पुन्हा कान टोचले; आता तरी सुधारा..

१९६६ ते १९८२ या काळात ८६ कसोटी सामन्यांमध्ये त्यांनी २५.८३च्या सरासरीने २९७ बळी मिळवले. प्रथम श्रेणी क्रिकेटची संपूर्ण कारकीर्द ते इंग्लिश कौंटी केंटकडून खेळले. या क्लबसाठी त्यांनी जवळपास अडीच हजार बळी मिळवले. अंडरवूड यांची डावखुरी फिरकी गोलंदाजी शैली पाहणे हा अत्यंत सुखद अनुभव होता. त्यांची धाव मध्यमगती गोलंदाजासारखी असे आणि मध्यमगती गोलंदाजाप्रमाणेच झटक्यात चेंडूफेकही व्हायची. रूढार्थाने पारंपरिक धिमी फिरकी गोलंदाजी त्यांनी कधी केली नाही. पण चेंडू आणि दिशेवर नियंत्रण विलक्षण होते. पावसामुळे खेळपट्टी ओली झाली असेल, तर  अंडरवूड यांची गोलंदाजी कर्दनकाळ ठरायची. त्यांच्या या वैशिष्टयामुळेच अंडरवूड यांना ‘डेडली’ ही उपाधी केंटमधील त्यांच्या सहकाऱ्यांनी दिली आणि ती क्रिकेट जगतातही स्वीकारली गेली. फिरकी गोलंदाजी उत्तम खेळणाऱ्या भारतीय संघाविरुद्ध आणि त्यातही विक्रमवीर सुनील गावस्कर यांच्याविरुद्ध अंडरवूड विलक्षण प्रभावी ठरत. १९७२-७३मध्ये भारतात झालेल्या मालिकेत त्यांनी गावस्कर यांना १० डावांत ४ वेळा बाद केले. एकूण कारकीर्दीमध्ये अंडरवूड यांच्या गोलंदाजीवर गावस्कर १२ वेळा बाद झाले. गावस्कर यांना त्यांच्यापेक्षा अधिक वेळा कुणीही बाद केलेले नाही. म्हणूनच वेस्ट इंडिजचे अँडी रॉबर्ट्स आणि इंग्लंडचे डेरेक अंडरवूड हे आपण ज्यांच्याविरुद्ध खेळलो असे दोन सर्वाधिक अवघड गोलंदाज, असे गावस्कर आजही म्हणतात. अंडरवूड हे भारताप्रमाणेच ऑस्ट्रेलियातही यशस्वी ठरले. बिशनसिंग बेदींप्रमाणे वैविध्य आणि वळण त्यांच्या गोलंदाजीमध्ये दिसून येत नसे. पण वेगात बदल करून ते फलंदाजांस जेरीस आणत. १९७१मध्ये वयाच्या २५व्या वर्षी कसोटी क्रिकेटमध्ये १०० बळी आणि प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये १००० बळी अशी दुहेरी कामगिरी त्यांनी करून दाखवली. सप्टेंबर १९६९ ते ऑगस्ट १९७३ या काळात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वोत्तम गोलंदाज ठरलेले डेरेक अंडरवूड यांचे नुकतेच निधन झाले.

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: England spin legend derek underwood passes away zws
Show comments