‘भरधाव आलिशान मोटारीच्या धडकेत मोटरसायकलवरून निघालेले दोघे जण ठार’ ही बातमी परवा कळल्यापासून पुणेकर अस्वस्थ आहेत. एक अल्पवयीन मुलगा वडलांची अजूनही नोंदणी न झालेली आलिशान मोटार घेऊन ‘पार्टी’ करायला बाहेर पडतो काय, ‘पार्टी’ झाल्यावर १६० किलोमीटर प्रतितास वेगाने गाडी चालवतो काय, वेगामुळे नियंत्रण सुटून रस्त्यावरून चाललेल्या दुचाकीला उडवतो काय आणि त्या धडकेने दुचाकीवरील दोघे जण हवेत फेकले जाऊन मग जमिनीवर जोरात आपटल्याने मृत्युमुखी पडतात काय! सुन्न करणारा हा प्रकार ज्या कल्याणीनगर, कोरेगाव पार्क परिसरात झाला, तेथे अनेक पब, रेस्टॉरंट आहेत. विशेषत: शनिवारी रात्री तेथे तरुणाईची अलोट गर्दी असते. ही ‘पार्टी’प्रेमी तरुणाई ‘पार्टी’ करून बाहेर पडल्यानंतर मात्र अनेकदा इतकी बेधुंद होते, की आपल्यामुळे आजूबाजूच्यांना त्रास होत असेल वगैरे जाणवण्याइतपत ते भानावरच नसतात. ज्या तरुण लोकसंख्येच्या लाभांशाची ‘डेमोग्राफिक डिव्हिडंड’ वगैरे म्हणून आपण चर्चा करतो, त्या पिढीचे हे सुटलेले भान रस्तोरस्ती आपल्या बेमुर्वतखोर वर्तनाने उच्छाद मांडते आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कल्याणीनगरमध्ये घडलेला प्रकार यातीलच. यातील आरोपींना शिक्षा देण्याचे काम न्यायव्यवस्थेचे आणि त्यांना योग्य शिक्षा मिळेल, यासाठी योग्य पद्धतीने तपास करण्याचे काम पोलिसांचे आहे. मात्र, यानिमित्ताने एकूणच व्यवस्थेसमोर जे प्रश्न उभे ठाकले आहेत, त्यांची चर्चा करणे नितांत गरजेचे आहे. जेथे अपघात झाला, त्या परिसरातील रहिवासी, सामाजिक संघटना, राजकीय पक्ष आदींनी आंदोलने केली, मागण्या केल्या आणि अनेक प्रश्नही उपस्थित केले. त्यांची तड लावताना आपल्याला आणखी एका व्यापक प्रश्नाचे उत्तर शोधावे लागणार आहे, तो म्हणजे नियोजनबद्ध विस्ताराऐवजी सुजल्यासारखी वाढणारी शहरे खरेच व्यवस्थेच्या नियंत्रणात राहिली आहेत का? उदाहरणादाखल व्यवस्थेच्या नियंत्रणाचा या घटनेच्या अंगाने विचार करायचा, तर पुणे शहरात एकूण किती पब आहेत, हे कोणत्याच संबंधित यंत्रणेला माहीत नाही, अशी आजची स्थिती आहे. असे असेल, तर तेथे अल्पवयीनांना मद्या मिळणार नाही, ती दिलेल्या वेळेपेक्षा अधिक काळ सुरू राहणार नाहीत, तेथे अवैध धंदे चालणार नाहीत आदी अपेक्षा व्यवस्थेकडून सामान्य माणूस करू शकेल का? बरे, त्यातून अपघातासारखी स्थिती उद्भवली, तर अपघात करणारा कुणा तरी बड्या बापाचा बेटा आहे, म्हणून त्याला व्यवस्थेकडूनच नियमांतील शक्य तेवढ्या पळवाटा शोधून दिले जाणारे ‘संरक्षण’ आणि बळी गेलेल्या सामान्यांकडे मात्र दुर्लक्ष, हेच वाट्याला येणार का? नियोजनबद्ध विस्तारात सामाजिक अनारोग्यावर उपाय तरी शोधता येतात, सूज असेल, तर मात्र ती ठुसठुसतच राहते. अशा सामाजिक अनारोग्यावर मोठी शस्त्रक्रियाच करावी लागते. पुण्यासारख्या शहरात सामाजिक संघटना आणि नागरिकांचा दबावगट अद्याप कार्यरत आहे म्हणून व्यवस्थेला त्याची दखल तरी घ्यावी लागते, हे त्यातल्या त्यात सुदृढ लक्षण. अर्थात, ही सुदृढता अधोरेखित करताना ती व्यापक असावी, अशी अपेक्षाही गैरलागू नाही. म्हणूनच, या घटनेच्या निमित्ताने एकदा समाज म्हणून आपल्या वर्तनाचेही अवलोकन करणे गरजेचे आहे.

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta anvyarth accident disorder and restlessness amy