पी चिदम्बरम
ज्या पंतप्रधानांकडे ३७० किंवा ४०० हून अधिक जागा जिंकण्याचा आत्मविश्वास असतो, ते आपल्या विरोधकांबद्दल अशा पद्धतीने बेपर्वाईने खोटे बोलणारनाहीत. त्याउलट ते विरोधी पक्षांना चर्चेत सहभागी होण्याचे खुले आव्हान देतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वयंघोषित ‘बलवान’ नेते आहेत. ते अनेकदा आपल्या ५६ इंची छातीबद्दल नेहमीच अभिमानाने बोलतात. त्यांचे अनुयायी खान मार्केटमधल्या मंडळींवर काबू मिळवण्याची भाषा करतात. त्यांना शहरी नक्षलवाद्यांचे समूळ उच्चाटन करायचे आहे, तुकडे-तुकडे गँगचा नायनाट करायचा आहे, पाकिस्तानला धडा शकवायचा आहे, भारतातली महत्त्वाची भाषा म्हणून इंग्रजीचे महत्त्व संपुष्टात आणायचे आहे. मुख्य प्रवाहातील माध्यमांना ताब्यात ठेवायचे आहे आणि भारताला जगात विश्वगुरू मानले जावे अशी त्यांची इच्छा आहे.

एक बलाढ्य नेता, लोकसभेत ३०३ जागा, आपापल्या राज्यात प्रचाराची धुरा सांभाळणारे १२ मुख्यमंत्री असे असताना पक्षाची स्वत:च्या बळावर ३७० जागांकडे (एनडीएसहित ४०० हून अधिक जागा) वाटचाल म्हणजे कसा डाव्या हाताचा मळ असायला हवा. पण त्याउलट, भाजपचे नेते खासगीत कबूल करत आहेत की, आता लोकसभेत ३७० जागा (एनडीएसह ४०० हून अधिक) सोडाच, भाजपला साधे बहुमत मिळाले तरी पुष्कळ झाले.

विषय का बदलले?

मोदींनी त्यांच्या प्रचाराची सुरुवात आत्मविश्वासाने आणि जोरदार केली. काँग्रेसचा जाहीरनामा ५ एप्रिल २०२४ रोजी प्रसिद्ध झाला होता; आधी मोदींनी त्याकडे तुच्छतेने दुर्लक्ष केले. भाजपचा जाहीरनामा १४ एप्रिल रोजी प्रसिद्ध झाला पण त्याचा प्रचार करण्याचा किंवा तो ‘साजरा करण्या’चा जरादेखील प्रयत्न झाला नाही. ‘मोदी की गॅरंटी’ असे या जाहीरनाम्याचे शीर्षक होते. त्यातील मजकुराच्या तपशिलाकडे दुर्लक्ष करून, आपल्या प्रचारसभेत मोदींनी रॅलीत ‘ही मोदींची गॅरंटी आहे’ अशा घोषणा देत सभांचा शेवट केला. मोदींनी किती गॅरंटी दिल्या, कोणकोणत्या गॅरंटी दिल्या, याचा नेमका आकडा आत्ता माझ्याकडे नाही, पण सामान्य लोकांच्या दोन प्रमुख चिंता असलेल्या वाढती महागाई आणि बेरोजगारांना रोजगार या मुद्द्यांबाबत मोदींनी कोणतीही गॅरंटी दिली नाही, हे मी खात्रीने सांगू शकतो. जातीय सलोखा, विकास, कृषी संकट, औद्याोगिक आजार, बहुआयामी दारिद्र्य, आर्थिक स्थैर्य, राष्ट्रीय कर्ज, घरगुती कर्ज, शैक्षणिक दर्जा, आरोग्यसेवा, भारतीय भूमीवरचे चिनी आक्रमण आणि अशा इतरही अनेक मुद्द्यांवर देशाच्या पंतप्रधानाने निवडणुकीच्या वेळी बोलले पाहिजे. पण मोदींनी या विषयांवर बोलणे जाणीवपूर्वक टाळले.

१९ एप्रिलला पहिल्या टप्प्यातील १०२ जागांसाठी मतदान पार पडले. आणि बहुधा २१ एप्रिल रोजी मोदींना अचानक साक्षात्कार झाला आणि त्यांनी राजस्थानमधील जालोर आणि बांसवाडा इथे जाहीर सभांमध्ये काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले, ‘काँग्रेस डावे आणि शहरी नक्षलवाद्यांच्या तावडीत सापडली आहे. काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात जे म्हटले आहे ते गंभीर आणि चिंताजनक आहे. काँग्रेसने सरकार बनवल्यास प्रत्येकाच्या मालमत्तेचे सर्वेक्षण केले जाईल, असे काँग्रेसनेच म्हटले आहे. आपल्या आयाबहिणींकडे किती सोने आहे, सरकारी कर्मचाऱ्यांकडे किती पैसा आहे, हे तपासले जाईल. आपल्या आयाबहिणींच्या मालकीचे सोने इतरांना वाटून दिले जाईल असेही काँग्रेसनेच म्हटले आहे. सरकारला अशा पद्धतीने तुमची मालमत्ता घेण्याचा अधिकार आहे का?’ असा अंदाज आहे की १९ ते २१ एप्रिल दरम्यान मोदींना काही माहिती (गुप्तवार्ता?) मिळाली ज्यामुळे त्यांना आपले गीअर्स बदलण्यास भाग पाडले.

खोटे अधिक मोठे होत गेले

वरील उताऱ्यातील प्रत्येक आरोप खोटा आहे. जसजसे दिवस सरत गेले, तसतसे मालमत्तेपासून सोन्यापर्यंत, मंगळसूत्रापासून ते स्त्रीधन आणि घरांपर्यंतचे खोटे अधिक मोठे होत गेले. मोदींनी आरोप केला की काँग्रेस लोकांची मालमत्ता ताब्यात घेईल आणि मुस्लीम, घुसखोर आणि ज्यांना जास्त मुले आहेत त्यांना वाटून टाकेल. दुसऱ्या रॅलीत, मोदींनी धर्म-आधारित कोटा आणि वारसा कर या विषयांवर उडी मारली. त्यांच्या खोटेपणाला अंतच नव्हता. एवढेच नाही, तर मोदींनी ‘म्हशींवर वारसा कर’ लावला जाईल यासारखी ‘मुक्ताफळे’ उधळली आणि वर ते असेही म्हणाले की एखाद्याकडे दोन म्हशी असतील तर एक काढून घेतली जाईल.

त्यांचे तात्कालिक उद्दिष्ट स्पष्ट होते. त्यांना भारतीय मुस्लिमांना काळ्या रंगात रंगवायचे होते आणि मतदारांचे ध्रुवीकरण करत हिंदू मतदारांना एकत्र आणायचे होते.

पंतप्रधान काय खोटे बोलत आहेत हे महत्त्वाचे आहेच, पण त्याहीपेक्षा पंतप्रधान असे खोटे का बोलत आहेत हे त्याहून जास्त महत्त्वाचे आहे. एक लक्षात घ्या, ते एकदाच खोटे बोलले आहेत, असे झालेले नाही, एकामागून एक अशी त्यांची खोट्याची मालिका सुरूच आहे. ज्या पंतप्रधानांना ३७० किंवा ४०० हून अधिक जागा जिंकण्याचा आत्मविश्वास असतो, ते आपल्या विरोधकांबद्दल अशा पद्धतीने बेपर्वाईने खोटे बोलणार नाहीत. ते विरोधी पक्षांना चर्चेत सहभागी होण्याचे खुले आव्हान देतील. मोदी ज्या ज्या खोट्या गोष्टींची शस्त्र म्हणून निवड करतात, त्यामागचे रहस्य उलगडले पाहिजे.

आत्म-शंका का?

समजा मोदींना ईव्हीएममधील गुपिते माहीत आहेत. त्यांच्या दृष्टीने काळजी करण्यासाठी कारणेही असू शकतात कारण २०१९ पेक्षा आजची परिस्थिती खूप वेगळी आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, यावेळच्या निवडणुकीत मोदींना निवडणुकीचे नॅरेटिव्ह म्हणजेच कथ्य ठरवता येत नाहीये. ते चर्चा सुरू करत नाहीयेत, तर काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर प्रतिक्रिया देत आहेत. तेही त्यांच्या मनातल्या म्हणजे काल्पनिक जाहीरनाम्यावर. दुसरे म्हणजे, ते त्यांच्या आश्वासनांची काँग्रेसच्या आश्वासनाशी तुलना वा बरोबरी करू शकत नाहीयेत आणि त्यातून मतदारांचे लक्ष वेधून घेऊ शकत नाहीयेत. तिसरे म्हणजे, लोक भाजपच्या कंटाळवाण्या घोषणांवर नाराज आहेत, पण ‘अच्छे दिन आनेवाले है’ सारखी नवी घोषणा मोदींना तयार करता आलेली नाही. चौथे, कमी मतदानाच्या टक्केवारीमुळे ते अस्वस्थ झाले असावेत. त्याचे निष्ठावंत मतदार मत द्यायला मतदान केंद्रांवर आले नाहीत हे त्याचे द्याोतक असू शकते. शेवटी, मतदान बूथवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांची अनुपस्थिती आणि संघाच्या शीर्षस्थांचे मौन यामुळे भाजपच्या छावणीत धोक्याची घंटा वाजली असावी.

या सगळ्या परिस्थितीचा काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. असा ‘नफा’ भाजपसाठी ‘निव्वळ तोटा’ ठरेल का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. २०२४ ची निवडणूक ही सगळी राज्ये (गुजरातचा संभाव्य अपवाद वगळता) जिंकून घेणारी सर्व निवडणूक नाही हे वास्तव मोदींनाही माहीत असण्याची शक्यता आहे. त्यांनी कदाचित असा निष्कर्ष काढला असेल की त्यांनी दिसून न येणारा नफा मोजण्यापेक्षा निव्वळ संभाव्य तोटा मोजावा. या विचारामुळे कदाचित ते चिंतेत पडले असतील आणि त्या चिंतेचे रूपांतर खोट्यात होत आहे.

लोक काय विचार करून मतदान करतील हे मी सांगू शकत नाही. पण मोदी खोटे बोलत आहेत हे लोकांना निश्चितच समजू शकते आणि ‘५६ इंची छाती’ असलेल्या नेत्यावर खोटे बोलायची वेळ येते याचे त्यांना आश्चर्य वाटते.

लेखक भारताचे माजी अर्थमंत्री आहेत.

संकेतस्थळ : pchidambaram.in ट्विटर : @Pchidambaram_IN