डॉ. श्रीरंजन आवटे

‘लोकशाही’ हा केवळ उद्देशिकेतील शब्द नाही. आजच्या प्रदूषित हवेत या प्राणवायूचे महत्त्व ओळखण्याची आवश्यकता आहे…

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा २००९ साली भारतात आले तेव्हा मनमोहन सिंग भारताचे प्रधानमंत्री होते. मनमोहन सिंग सुशिक्षित आणि सुसंस्कृत पंतप्रधान असल्याने ओबामांनी एक पुस्तक मनमोहनसिंग यांना भेट दिले. या पुस्तकावर लिहिले होते : जगातल्या सर्वांत जुन्या लोकशाहीकडून जगातील सर्वांत मोठ्या लोकशाहीला सप्रेम भेट. अमेरिकेला स्वातंत्र्य मिळाले अठराव्या शतकात तर भारताला विसाव्या शतकात. त्यामुळे अमेरिका सर्वांत जुनी लोकशाही आणि भारत सर्वांत मोठी लोकशाही. त्यावेळी सीताराम येचुरी उपस्थित होते. ते म्हणाले, ‘‘मिस्टर ओबामा, अमेरिका सर्वांत जुने लोकशाही राष्ट्रही नाही नि सर्वांत मोठे लोकशाही राष्ट्रही नाही.’’ ओबामा या वाक्यामुळे चमकले. येचुरींनी स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले की, ‘‘अमेरिकेला स्वातंत्र्य मिळाले इ.स. १७७६मध्ये मात्र सर्वांना मतदानाचा अधिकार दिला गेला इ.स. १९६४मध्ये. जोपर्यंत सर्वांना मतदानाचा अधिकार नाही तोवर लोकशाही कशी अस्तित्वात असू शकते!

भारताने संविधान लागू करताच १९५० सालीच सर्वांना मतदानाचा हक्क दिला. त्यातून कोणालाही डावलले नाही. विशेषत: सर्व स्त्रियांनाही मतदानाचा हक्क दिला गेला, हे महत्त्वाचे कारण युरोपात, अमेरिकेत मतदानाचा हक्क मिळावा म्हणून स्त्रियांना आंदोलने करावी लागली. ज्या ब्रिटिशांची आपण वसाहत होतो तिथेही स्त्रियांना मतदानाचा अधिकार मिळावा याकरता ‘सफ्राजेट’ चळवळ करावी लागली. त्यांना वेगवेगळ्या अटी, शर्ती घालत मतदानाचा हक्क दिला गेला.

हेही वाचा >>> अन्वयार्थ : वित्तीय नियोजन कोलमडले

भारतात मात्र अभूतपूर्व प्रकारे लोकशाही स्थापित झाली. त्याची सारी कहाणी ‘हाउ इंडिया बिकेम डेमॉक्रॅटिक’ या पुस्तकात इस्रायली प्राध्यापक ऑर्नीट शानी यांनी सांगितली आहे. तृतीयपंथी (पारलिंगी) लोकांना मतदानाचा हक्क द्यायचा की नाही असा प्रश्न उपस्थित होताच नेहरू म्हणाले की, दोनच बाबी महत्त्वाच्या आहेत एक म्हणजे वय वर्षे २१ असणे आणि भारताच्या भूभागात ६ महिने वास्तव्य (फाळणी झाल्यामुळे ही अट तेव्हा होती). लिंगभाव किंवा लैंगिक कल महत्त्वाचा नाही. (सुरुवातीला मतदानाचे वय वर्षे २१ होते. १९८६ साली ६१ व्या घटनादुरुस्तीने ते कमी करून वय वर्षे १८ इतके करण्यात आले.)

गावात जाऊन मतदार नोंदणी करताना वायव्येकडून आग्नेयेकडे नोंदणी करा, असा बाबासाहेब आंबेडकरांनी सल्ला दिलेला जेणेकरून गावकुसाबाहेरचे लोक मतदार यादीतून वगळले जाऊ नयेत. अनेकदा मतदार यादी तयार करण्यासाठी सरकारी कर्मचारी जात तेव्हा स्त्रिया स्वत:चे नाव सांगायला लाजत. अशा वेळी स्त्रियांची नोंद ‘अमुकची बहीण’, ‘तमुकची पत्नी’ या प्रकारे केली गेली; मात्र कोणीही मतदान प्रक्रियेतून वगळले जाता कामा नये, यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली गेली. अनेकांना जन्मतारीख ठाऊक नव्हती. वयासाठीचे कोणतेही प्रमाणपत्र नव्हते. त्यावेळी लोकांच्या मौखिक आठवणीतून नोंदी केल्या गेल्या. त्या साऱ्या प्रयत्नांमधून भारताची पहिल्या निवडणुकीसाठीची मतदार यादी तयार झाली. ही मतदार यादी तयार करण्याची प्रक्रिया वाचताना कोणीही थक्क होईल!

एक नवा देश आकाराला येत होता. उद्देशिकेवरील चर्चेनंतर नेहरू म्हणाले, ‘‘लोकशाही हेच आपले ध्येय आहे, लोकशाहीपेक्षा तसूभरही कमी प्रतीची राजकीय व्यवस्था आपल्याला नको.’’ नेहरूंना हुकूमशहा होता आले असते, मात्र लोकशाही मूल्यांवर त्यांची अपार निष्ठा होती. हुकूमशाहीने मानवतेचे काय नुकसान होते हे जगाने अनुभवले होते. त्यामुळेच नेहरू फासिझमचे धोके सांगत होते, तर आंबेडकर विभूतीपूजा देशाला घातक असल्याचा मुद्दा संविधान सभेत मांडत होते. लोकशाही हा केवळ संविधानाच्या उद्देशिकेतील शब्द नाही, तो देशाचा प्राणवायू आहे, हे संविधानाच्या निर्मात्यांना ठाऊक होते. आजच्या प्रदूषित हवेत या प्राणवायूचे महत्त्व ओळखण्याची आवश्यकता आहे.

poetshriranjan@gmail. com