कायदेशीर व्यवस्थेत बेकायदा गोष्टींना स्थान नसावे ही आदर्श अपेक्षा झाली. त्याबरहुकूम आपली वाटचाल सुरू आहे का? नसेल तर त्याची कारणे काय? त्यासाठी नेमके कोण जबाबदार? व्यवस्था, समाज की त्यात सामील असलेले समूह व व्यक्ती? असले गंभीर प्रश्न खरेतर पडूच नयेत असाच सध्याचा काळ! या व्यवस्थेत वावरताना काही विपरीत घडले तर हळहळ व दु:ख व्यक्त करावे, चांगले काही निदर्शनास आले तर आनंद मानून घ्यावा. त्यापलीकडे फारसा विचार करायचा नाही. प्रश्न तर पडूच द्यायचे नाहीत. ते पडायला लागले की अकारण मेंदूला झिणझिण्या येतात. अस्वस्थ व्हायला होते. त्यामुळे बहुसंख्य या वाटेने जाण्याचे टाळतात. मात्र काही मोजक्यांची प्रश्नरूपी खोड काही केल्या जात नाही. किमान त्यांच्या तरी मेंदूची दमणूक व्हावी यासाठी काही गोष्टींकडे लक्ष वेधणे आवश्यक ठरते. त्यासाठी अर्थात आपल्याला फार दूर जायची गरजही नाही. अलीकडच्या काही दिवसांत घडलेल्या काही घटनांना उजाळा दिला तरी ते पुरेसे.

तो तब्बल १७ जणांचे जीव घेणारा घाटकोपरचा जाहिरात फलक. पूर्णपणे बेकायदा होता म्हणे! हे निष्पन्न केव्हा झाले, तर ही भयंकर आणि जीवघेणी घटना घडल्यावर. २५० टन पोलाद वापरलेला हा फलक एका दिवसात तर उभा राहिलाच नसेल. त्याला काही महिने तरी लागले असतील. मात्र, या काळात या नियमभंगाकडे कोणाचेच लक्ष गेले नाही? ही जागा कोणाच्या मालकीची हा मुद्दा तूर्तास बाजूला ठेवू, पण सरकारच्या मालकीची यावर तर साऱ्यांचे एकमत होईलच. मग या यंत्रणेला ही अवाढव्य उभारणी दिसली नसेल का? किंवा दिसूनही जे गप्प राहिले त्यांचे काय? त्यांच्यावर साधी निलंबनाची कारवाई तरी आजवर झाली का? एवढेच कशाला हा फलक ज्या पेट्रोल पंपालगत होता तो पंपही बेकायदेशीर होता, असे आता ‘ते’ सांगतात. अगदी काटेकोर नियम पाळून परवानगी मिळणाऱ्या या ज्वलनशील पदार्थांची विक्री करणारे केंद्र बोगस आहे हे कोणाच्याच लक्षात आले नाही यावर विश्वास तरी कसा ठेवणार?

मराठीतील सर्व संपादकीय बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta editorial pune porsche accident ghatkopar billboard collapse incident amy
First published on: 25-05-2024 at 04:33 IST