गणेश मतकरी

‘वाचवतही नाही, पण थांबताही येत नाही’ अशी वर्णनं असलेली ही कादंबरी काही जणांनी न वाचणंच बरं! पण जे जाणतेपणी ती वाचतील, त्यांना ४० वर्षांपूर्वीच्या अमेरिकेत आपला आजचा काळ दिसेल..

BJP tukde-tukde gang Kanhaiya Kumar interview delhi lok sabha election
“मी तुकडे-तुकडे गँगचा असेन तर मोदी मला अटक का करत नाहीत?”; कन्हैयाचं भाजपाला आव्हान
Watch waiter’s priceless reaction to sketch artist's sweet surprise
न मिळालेल्या कौतुकाची पोचपावती! कलाकारानं हॉटेलच्या बिलवर रेखाटलं वेटरचं सुरेख चित्र; चेहऱ्यावर उमटलं सुंदर हास्य, Video Viral
savita prabhune on caste Discrimination in industry
“तुम्ही विशिष्ट आडनावाचे…”, भेदभावाबद्दल सविता प्रभुणे यांचं स्पष्ट मत; म्हणाल्या, “मला उलट या इंडस्ट्रीचा…”
raj thackray mns latest news
मनसेच्या विश्वासार्हतेला उतरती कळा; बदलत्या भूमिकेमुळे पदाधिकारी-कार्यकर्त्यांत संभ्रम

‘द शार्ड्स’मधे लेखकाबरोबरच प्रमुख पात्रही असलेल्या ब्रेट इस्टन एलिसने कथेच्या ओघात मांडलेली ही भूमिका या संपूर्ण कादंबरीलाच लागू पडते असं म्हणायला हरकत नाही. वरवर पहाता कादंबरी खरी, आत्मचरित्रात्मक असल्याचा आभास निर्माण करते, आणि खात्रीने, त्यातला काही भाग तसा असेलही. वातावरण, व्यक्तिरेखा, ब्रेट आणि त्याच्या समवयस्क मित्रमंडळींची ( ‘लेस दॅन झीरो’ या त्याच्या पहिल्या कादंबरीतून नजरेला पडलेली ) अतिश्रीमंती लाइफस्टाइल, काळ, संगीत /चित्रपट यांचे खोऱ्याने संदर्भ, या साऱ्या गोष्टी पूर्णपणे खोटय़ा नक्कीच नसणार. कादंबरीतला ब्रेट आपल्याला खोटं सांगत नाहीये, तर सत्य अधिकच रंगवून सांगतोय. एलिसच्या तरुणपणाची, वयात येण्याच्या काळाची, ही एक ‘एग्झ्जरेटेड व्हर्जन’ आहे. आणि ब्रेट हा स्वत:च्याच आयुष्याचा ‘अनरिलाएबल नॅरेटर’(अ-विश्वासार्ह कथनकर्ता) आहे.

ब्रेट इस्टन एलिस आणि चक पालानिक या दोघांना आधुनिक अमेरिकन साहित्याचे ‘बॅड बॉईज’ म्हणता येईल. दोघांच्याही कादंबऱ्या आधुनिक समाजातल्या विसंगती, आयुष्यातला फोलपणा, तोचतोचपणातून येणारी बधिरता, चमत्कृतीपूर्ण दृष्टिकोन, धक्कादायक प्रसंग आणि संकल्पना, आणि लेखकाचा गडद काळा दृष्टिकोन मांडतात, पण त्यांचे विषय हे बहुधा स्पेक्ट्रमच्या दोन टोकाचे असतात. चक पालानकच्या कहाण्या बहुधा सामान्य ( किंवा निदान सामान्य परिस्थितीतल्या) माणसांच्या असतात, तर एलिसचं जग हे अत्यंत वरच्या स्तरातलं, प्रचंड श्रीमंती आहे. ही श्रीमंती, या सुविधा, जे म्हणू ते करण्याची सोय आणि ताकद, या पार्श्वभूमीने एलिसच्या कथाविश्वातल्या पात्रांना नैतिक चौकटीपासून विलग केलंय. सामान्य माणसांचे नियम त्यांना लागू पडत नाहीत. आपल्या सुखासीन आयुष्याच्या प्रवाहात ही पात्र वाहात चालली आहेत. त्यांच्या आजूबाजूला समाजात काय घडतंय याची त्यांना ना जाणीव आहे, ना पर्वा.

ब्रेट इस्टन एलिसची पहिली कादंबरी ‘लेस दॅन झीरो’ ही वयाच्या एकविसाव्या वर्षी, तो कॅालेजात असताना प्रकाशित झाली. त्यात क्ले हा १८ वर्षांचा नायक आणि त्याचे मित्र-मैत्रिणी यांचं स्वैर, चैनी आयुष्य यांचं ग्राफिक चित्रण होतं. कादंबरीने एलिसला नाव मिळालं, पण खऱ्या अर्थाने तो ओळखला जाऊ लागला तो वादग्रस्त ठरलेल्या ‘अमेरिकन सायको’ या अत्यंत हिंसक कादंबरीने, आणि त्यावर आलेल्या तितक्याच वादग्रस्त चित्रपटाने. तिथला नायक पॅट्रिक बेटमनही वयाने थोडा मोठा, पण तशाच स्वैर जगणाऱ्या पिढीचा एक भाग आहे, वर तो सीरिअल किलरही आहे. हे गुन्हे तो प्रत्यक्षात करतो का ते भास आहेत, याबद्दल दुमत संभवतं.

‘ द शार्ड्स’ची गंमत अशी की, ती या दोन कादंबऱ्यांचं मिश्रण असल्यासारखी, आणि ‘लूनार पार्क’ या त्याच्या आणखी एका कादंबरीसारखी आत्मचरित्रात्मक असल्याचा आभास तयार करणारी आहे. वयाच्या सतराव्या वर्षी ‘बकली प्रेप स्कूल’ या लॉस एंजेलिसमधल्या श्रीमंती खासगी शाळेत बारावीला असणारा, आणि आपल्या फावल्या वेळात ‘लेस दॅन झीरो’ लिहिणारा तरुण ब्रेट त्याचा नायक आहे. ब्रेट होमोसेक्शुअल आहे, पण वेगळं पडण्याचा धोका पत्करावा लागू नये म्हणून हे सत्य त्याने दडवून ठेवलंय. एका हॉलीवूड निर्मात्याची सतत सेक्सचाच विचार करणारी मुलगी डेबी, ही त्याची गर्लफ्रेन्ड आहे, पण त्याबरोबरच मॅट आणि रायन, या दोन मुलांशीही त्याचे गुपचुप संबंध आहेत. सुझन आणि टॉम या शाळेत लोकप्रिय आणि आर्थिकदृष्टय़ा त्याच्याच स्तरात असलेल्या जोडीशी ब्रेटची जवळची मैत्री आहे. अशा परिस्थितीत दोन गोष्टी घडतात ज्या ब्रेटच्या आयुष्याच्या सुरक्षित बुडबुडय़ाला टाचणी लावतात. पहिली गोष्ट म्हणजे रॉबर्ट मॅलरी या देखण्या मुलाचं शाळेत आगमन, जो ब्रेटच्या वर्तुळाला मोठे हादरे देतो, आणि दुसरी गोष्ट म्हणजे ‘ट्रॉलर’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या सीरिअल किलरचा लॉस एंजेलिस मधला वाढता संचार. हे खून केवळ पेपरातल्या हेडलाइन्सपुरते उरत नाहीत तर ब्रेटच्या जवळजवळ येऊ लागतात. त्याच्या मित्रांमधलंच कोणीतरी गुन्हेगार किंवा भावी बळी आहे की काय, अशा संशयाने ब्रेट पछाडला जातो.

‘द शार्ड्स’ वाचणाऱ्यांसाठी ‘ट्रिगर वॉर्निग्ज’ची विशेष आवश्यकता आहे, कारण सर्वानाच हे पुस्तक चालेलसं, किंवा झेपेलसंही नाही. ड्रग्जचा सतत वापर, मुबलक सेक्स (स्ट्रेट आणि गे या दोन्ही प्रकारचा) आणि अतिशय टोकाचा, कधीकधी अंगावर काटा आणणारा हिंसाचार इथे बऱ्याच प्रसंगांत आहे. जर या गोष्टी तुम्हाला अजिबातच चालत नसतील, तर तुम्ही या कादंबरीपासून दूरच राहिलेलं बरं. पहिल्या दोन गोष्टींचं प्रमाण हे तिसरीपेक्षा अधिक आहे, कारण ही परिचित अर्थाने गुन्हेगारी वा रहस्य कादंबरी नाही. ब्रेटचं आयुष्य, त्याच्या शाळेतल्या भानगडी, त्याचं दुहेरी जगणं, त्याच्या मनातले ताणतणाव हा कादंबरीचा मुख्य भाग आहे, पण ट्रॉलर आणि त्याने केलेले खून मोजके असले, तरी त्यांचे तपशील भयानक आहेत. एका प्रसंगात एका परिचयातल्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर ब्रेट त्या व्यक्तीच्या वडिलांना भेटतो. ते त्याच्यासमोर फोटोंची एक चळत टाकतात आणि जे घडलं त्याचा अर्थ विचारतात. या प्रसंगात येणारं क्राइम सीनचं वर्णन वाचवतही नाही, पण थांबताही येत नाही, असं आहे. हे वाचून कोणाला असंही वाटू शकतं, की अशा सगळय़ा गोष्टींचा मुबलक वापर असलेल्या कादंबरीत रेकमेन्ड करण्यासारखं तरी काय आहे? तर नक्कीच आहे.

मला सर्वात इन्टरेस्टिंग वाटली ती त्याची मांडणी. मुळात त्यातलं सत्य आणि कल्पिताचं मिश्रण हा एक लक्षवेधी भाग तर आहेच, वर कथेतलं पात्र असलेला ब्रेट आणि ती कादंबरी लिहिणारा ब्रेट हे दुहेरी अस्तित्व अधोरेखित होणं, हेदेखील खास आहे. एकाच वेळी विद्यार्थी ब्रेटच्या जगाला जाणारे तडे, आणि अंतरावरून जे घडलं त्याचा अर्थ लावू पाहाणारा, मधल्या काळात अनेक अनुभवांना सामोरं गेलेला, अनेक पुस्तकं नावावर असलेला लेखक ब्रेट यांच्या मिश्रणातून कथानकाचे अनेक पैलू आपल्यासमोर उघड होतात. वर्तमानाच्या चौकटीचा संदर्भ असला, तरी मुख्य कथानक घडतं, ते १९८२ मधे, आणि हे सारे उद्योग करणारी मुलं अकरावी बारावीची आहेत हे आपल्याला पचायला थोडं ( किंवा खूप.. शेवटी ते तुम्ही कोण आहात यावर अवलंबून..) कठीण गेलं तरी काही वेळाने याची सवय होते आणि मग आपली नजर इतर गोष्टींकडे वळते. या साऱ्याच मुलांचं व्यक्तिचित्रण अतिशय बारकाईनं केलेलं आहे, आणि कथानकातला प्रक्षोभक भाग सोडला, तर ते ज्या प्रकारे शोकांताच्या दिशेने वाटचाल करत जातं ते गुंतवून टाकणारं आहे. तरुण ब्रेटचं विश्व वास्तवापासून भरकटलेलं आहे. जगात काय चाललंय हे त्याच्या खिजगणतीत नाही, पण त्याउलट संगीत, चित्रपट, साहित्य या सगळय़ाशी तो घट्ट जोडला गेलाय. तो काळ उभा करण्यात या सगळय़ा तपशिलाचा मोठा हात आहे. तरुण ब्रेटचं या काळात ‘लेस दॅन झीरो’ लिहित असणं, ज्यांना ती कादंबरी माहीत आहे, त्यांच्यासाठी वेगळाच परिणाम साधणारं आहे.

कादंबरीत अनेक प्रसंग लक्षात राहाण्यासारखे आहेत. एकच उदाहरण घ्यायचं, तर कथेतल्या एका महत्त्वाच्या वळणावर सुझनकडे होणारी पार्टी, हा जवळपास तीसेक पानं चालणारा, आणि आशयाच्या दृष्टीने केंद्रस्थानी असलेला प्रसंग लक्षात राहाण्यासारखा आहे. सर्व प्रमुख पात्रांच्या आयुष्यात काही ना काही महत्त्वाचं घडवणारा हा प्रसंग आहे, आणि केवळ एलिसच्या लेखनकौशल्यासाठीही तो पाहाण्यासारखा आहे. मला यात सर्वात प्रभावी वाटलं ते ब्रेटने टेनिस कोर्टवरच्या अंधारात उभं राहून समोर चाललेल्या घडामोडींचं केलेलं निरीक्षण. भांडणं, ड्रग्जच्या अमलाखाली चाललेल्या करामती, प्रेम, निराशा, सेक्स, फसवणूक, अशा अनंत घटकांना एकत्र आणणारा हा प्रसंग मुळातूनच वाचण्यासारखा आहे.

ब्रेट इस्टन एलिसची कादंबरी ४० वर्षांपूर्वी घडणारी असली, तरी ती आजची नाही असं काही मी म्हणणार नाही. त्यातल्या अनेक गोष्टींना आपण सरळ वा प्रतीकात्मक रीतीने वर्तमानाशी आणून जोडू शकतो. मला तर असंही वाटलं, की आज कदाचित ती त्यांच्यापेक्षाही आपल्यासाठी अधिक कालसुसंगत ठरू शकेल. त्यांच्याकडे तेव्हा असलेलं वातावरण पाहायला मिळेलशा शाळा आता आपल्याकडेही आहेत. ‘जागतिकीकरणा’नंतर मातबर होत गेलेला एक विशिष्ट वर्ग आणि त्यांच्या पुढल्या पिढय़ा, यांचं चित्रण आज करायचं म्हटलं, तर ते ‘द शार्ड्स’ मधल्या चित्रणापेक्षा फार वेगळं असणार नाही. पैशाला येणारं महत्त्व, नात्यांमधला वाढता उथळपणा, नीतिमत्तेचे हिशेब सोयीनुसार बदलत जाणं, पालक आणि मुलांमधला कमी होणारा संवाद, आणि शेवटी भलं-बुरं, सुख-दु:ख या साऱ्याचा अर्थ शून्यवत् होत एका बधिरतेकडे होत गेलेला प्रवास, हे चित्र आपल्यासाठी फार अनपेक्षित, कल्पनेपलीकडलं आहे का? मग एलिसने समोर धरलेला हा आरसा आज आपलंही प्रतिबिंब दाखवतोय असं म्हणणं वावगं ठरेल का ?

‘आय वॉज अ स्टोरीटेलर, ॲन्ड आय लाईक्ड डेकोरेटिंग ॲन अदरवाईज मन्डेन इन्सीडन्ट दॅट मेबी कन्टेन्ड वन ऑर टू फॅक्ट्स दॅट मेड इट इन्टरेस्टिंग टु बी रीटोल्ड.. दीज वेअरन्ट लाईज एग्झॉक्टली- आय जस्ट प्रीफर्ड द एक्झॉजरेटेड व्हर्जन.’ – ब्रेट इस्टन एलिस, ‘द शार्ड्स’
‘द शार्ड्स’

लेखक : ब्रेट इस्टन एलिस
प्रकाशक : द स्विफ्ट प्रेस
पृष्ठे : ६०८ ; किंमत : ७९९ रु.